अतुलला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठपका. तिघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी
लखनौ : बंगळुरूस्थित एआय अभियंता अतुल सुभाष (३४) याच्या आत्महत्येप्रकरणी त्याची पत्नी निकिता सिंघानिया , सासू निशा आणि मेहुणा अनुराग यांना अटक करण्यात आली आहे. या तिघांवर अतुलला मानसिक त्रास देत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी निकिताला गुरुग्राममधून आणि निशा आणि अनुरागला अलाहाबादमधून अटक केली. याप्रकरणी निकिताचा मामा सुशील फरार आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले, तेथून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. यापूर्वी पोलिसांनी आरोपींना तीन दिवसांत हजर राहण्याचे निर्देश दिले होते.
गेल्या सोमवारी अतुल सुभाष याचा मृतदेह त्यांच्या बंगळुरू येथील फ्लॅटमध्ये सापडला होता. पोलिसांना घटनास्थळी २४ पानी सुसाईड नोट आणि ८० मिनिटांचा व्हिडिओ सापडला आहे. प्रत्येक पानाची सुरुवात "न्यायाची प्रतीक्षा आहे" या शब्दांनी होते. सुसाईड नोटमध्ये अतुलने मॅट्रिमोनी वेबसाइटद्वारे २०१९ साली निकिता सिंघानियासोबत लग्न केल्याचे लिहिले आहे. २०२० मध्ये त्यांच्या मुलाचा जन्म झाला. निकिता आणि तिच्या कुटुंबीयांनी पैशांसाठी वारंवार दबाव आणल्याचा आरोप त्यांनी केला. त्याने पैसे देण्यास नकार दिल्याने वाद वाढला.
२०२१ मध्ये निकिताने आपल्या मुलासह घर सोडले. २०२२ मध्ये, निकिताने अतुल आणि त्याच्या कुटुंबावर हुंड्यासाठी छळ, क्रूरता आणि अगदी खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप करून खटले दाखल केले. आपल्याकडून ३ कोटी रुपये उकळण्यासाठीच निकीताने हे सगळे केले असे सुसाईड नोटमध्ये अतुलने म्हटले आहे. सुसाईड नोटमध्ये अतुलने न्याय व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच निकिता आणि तीच्या आईने आपल्याला दोनदा आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोपही त्याने केला आहे.
अतुलचा भाऊ विकास कुमार याने निकिता, तीची आई निशा, भाऊ अनुराग आणि मामा सुशील यांच्यावर अतुलला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर समाजात हुंडाबंदी कायद्याचा गैरवापर आणि महिलांच्या छळासंदर्भातील कायदे यावर चर्चा सुरू झाली आहे. अनेक लोक या कायद्यांमध्ये सुधारणा करण्याची मागणी करत आहेत जेणेकरून त्यांचा गैरवापर रोखता येईल. कौटुंबिक वाद आणि कायदेशीर प्रक्रियेशी निगडीत मानसिक ताणतणाव याकडे या केसच्या माध्यमातून लक्ष पुन्हा वेधले गेले आहे. आता या प्रकरणात कसा न्याय मिळतो याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.