पलायनाच्या दिवशीचे सर्व व्हिडिओ सार्वजनिक करण्याची काँग्रेस, आपची डिजीपींकडे मागणी
पणजी : क्राईम ब्रांचच्या कोठडीतून पलायन केलेल्या सिद्दिकी सुलेमानने व्हायरल व्हिडिअोत ज्यांची नावे घेतली आहेत, त्यांना बाजूला ठेवून वेगळ्या पथकामार्फत या प्रकरणाचा तपास व्हावा तसेच सुलेमान ज्या दिवशी पळाला त्या दिवशीचे सर्व सीसीटीव्ही व्हिडिअो पोलिसांनी प्रसारित करावे, अशी मागणी काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी सोमवारी पोलीस महासंचालक (डीजीपी) अलोक कुमार यांना भेटून केली.
प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष सुनील कवठणकर, प्रवक्ते तुलियो डिसोझा, आपचे नेते वाल्मिकी नाईक यांचा यात सहभाग होता. सिद्दिकी सुलेमानच्या पलायनात केवळ एकट्या अमित नाईकचा हात नाही. यात पोलीस खात्यातील उच्च पदस्थ आणि राजकारण्यांचा निश्चित सहभाग आहे. त्यामुळे स्वतंत्र पथकाद्वारे या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, असे सुनील कवठणकर म्हणाले.
सिद्दिकी सुलेमानच्या पलायन प्रकरणातून राज्यातील कायदा-सुव्यवस्था पूर्णपणे ढासळल्याचे दिसून आलेले आहे. याची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तत्काळ पदाचा राजीनामा द्यावा तसेच पोलिसांनी लवकरात लवकर सुलेमानला अटक करून त्याच्यामार्फत जमीन घोटाळे प्रकरणांत सहभागी राजकारण्यांचा शोध घ्यावा, अशी मागणीही कवठणकर यांनी केली.
दरम्यान, पोलिसांनीच मला हुबळी येथे आणले आणि एन्काउंटर करण्याची धमकी देऊन मला सोडले. मला सोडण्यात दहा ते बारा पोलिसांचा सहभाग आहे. मी गोव्यात परत यायला तयार आहे, पण सीबीआयमार्फत प्रकरणाचा तपास व्हायला हवा, अशी मागणी फरार सिद्दिकी उर्फ सुलेमान खान याने एका व्हिडिओमध्ये केली. त्याने या व्हिडिओच्या माध्यमातून पोलिसांसह एका आमदारावरही आरोप केले. काल प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन सिद्दिकीचा व्हिडिओ प्रसिद्ध केला होता.