सुरावली ग्रामसभेत नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना उपसरपंच दुरांदो. (संतोष मिरजकर)
मडगाव : सुरावली गावातील नागरिकांना कोकण रेल्वेकडून सर्व्हे क्रमांक टाकून नोटीसा पाठवण्यात आलेल्या आहेत. जमिनीच्या म्युटेशनचा विषय आहे. त्यावरील हरकतींना ३ जानेवारीला सुनावणी होणार आहे पण त्याआधी ही सुनावणी करण्याची मागणी केली जाणार आहे, अशी माहिती उपसरपंच लेस्ली दुरांदो यांनी दिली.
सुरावली पंचायतीची तहकूब करण्यात आलेली ग्रामसभा रविवारी घेण्यात आली. यावेळी सुरावली गावातील काही जमिनी संपादित करण्यात आल्याच्या नोटीसा जागा रेल्वे प्रशासनाकडून मालकांना आल्या आहेत. रेल्वे महामंडळाकडे कोणती जमीन संपादित करण्यात आली, याची योग्य कागदपत्रे नाहीत. त्याशिवाय अतिरिक्त जागा कोणत्या कारणासाठी वापरली जाणार आहे, नवा रेल्वे रुळ टाकण्यात येणार आहे का, याची माहितीही स्थानिकांना देण्यात आलेली नाही. आता जमिनींच्या नोटीसी आल्यानंतर नागरिकांकडून भीती व्यक्त करण्यात आल्या व हरकती घेण्याचे ठरवण्यात आले आहे.
पंच लेस्ली दुरांदो यांनी सांगितले की, ग्रामसभेत रस्त्यांवरील गाड्यांचा वेग करण्यासाठी आवश्यक त्याठिकाणी गतिरोधकाची उभारणी करण्यात यावी, रस्ते रुंद करण्यात यावेत तसेच अंडरपासची समस्या गॅबिन डिसोझा यांनी मागणी केली व या विषयावर चर्चा झाली. याशिवाय सुरावलीतील तळ्यांवरील गेटची उभारणी करण्याबाबत व ती बंद करण्याबाबत चर्चा झाली व त्यासंदर्भात ठराव याआधीच घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यासंदर्भात जलस्रोत खात्याला ठराव पाठवून देण्यात आले आहेत. वेस्टर्न बायपासच्या कामावेळी शेतजमिनींतून मातीचा भराव टाकण्यात आला होता. हा भराव काढण्यात यावा व ती पूर्ववत करण्याची मागणी ज्योकीम डायस यांनी केली. त्यानुसार ग्रामसभेत ठराव घेण्यात असल्याचे स्पष्ट केले.
रेल्वे अंडरपासचे एका बाजूचे काम पूर्णत्वास
सुरावलीतील रेल्वे अंडरपासच्या मार्गावर कोणत्याही प्रकारे पाणी जाण्याची सोय करण्यात आलेली नाही. पावसाळ्यात हा मार्ग वापरण्यात येऊ शकत नाही. त्यावर उपाययोजना करण्याचा मुद्दा चर्चेला आला असता, अंडरपासमधील पाणी काढण्याचे व त्यावर उपाययोजना करण्याच्या कामाला सुरुवात केलेली आहे. एका बाजूचे काम पूर्णत्वास आलेले असून लवकरच दुसर्या बाजूचे होईल, असे पंचायत मंडळाने स्पष्ट केले.