राज्यातील जनऔषधी केंद्रातून चार वर्षांत ६८ लाखांच्या औषधांची विक्री

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
10 hours ago
राज्यातील जनऔषधी केंद्रातून चार वर्षांत ६८ लाखांच्या औषधांची विक्री

पणजी : पंतप्रधान भारतीय जनऔषधी परियोजनेंतर्गत राज्यात आर्थिक वर्ष २०२०-२१ ते २०२३-२४ दरम्यान ६८ लाख रुपयांच्या औषधांची विक्री झाली आहे. या दरम्यान संपूर्ण देशातून ३८८१ कोटी रुपयांच्या औषधांची विक्री झाली.केंद्रीय रसायन राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी लोकसभेत दिलेल्या लेखी उत्तरातून ही माहिती मिळाली आहे. याबाबत खासदार डॉ. हेमंत सावरा यांनी अतारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
उत्तरात दिलेल्या माहितीनुसार, या योजनेंतर्गत २०२३-२४ अखेरीस गोव्यात एकूण १५ औषधालये आहेत. २०२९-२० दरम्यान या योजनेतील एकही औषधालय नव्हते. योजनेतील औषधालयांतून २०२०-२१ मध्ये २ लाख रुपयांच्या औषधांची विक्री झाली. २०२१-२२ मध्ये ४ लाख, २०२२-२३ मध्ये १२ लाख औषधांची विक्री झाली. तर २०२३-२४ मध्ये ४९ लाख रुपयांच्या औषधांची विक्री झाली.
चांगल्या दर्जाची जेनरीक औषधे स्वस्त दरात उपलब्ध करून देण्यासाठी पंतप्रधान भारतीय जनऔषधी परियोजना सुरू करण्यात आली होती. याद्वारे सुरू करण्यात आलेल्या जनऔषधी केंद्रात बाजारात उपलब्ध असणाऱ्या ब्रँडेड औषधांपेक्षा ५० ते ८० टक्के कमी दरात जेनरीक औषधे उपलब्ध आहेत. योजेअंतर्गत २०४७ प्रकारची विविध औषधे, शस्त्रक्रियेदरम्यान लागणारी ३०० उपकरणे उपलब्ध असल्याचे उत्तरात म्हटले आहे.
सर्वाधिक १,४५८ जनऔषधी केंद्रे केरळमध्ये
आर्थिक वर्ष २०२३-२४ अखेरीस संपूर्ण देशात १४ हजार ३२० जनऔषधी केंद्रे आहेत. यातील सर्वाधिक १,४५८ केंद्रे केरळमध्ये आहेत. तर सर्वात कमी १२ केंद्रे सिक्कीममध्ये आहेत. गेल्या चार वर्षांत संपूर्ण देशातून २०२३-२४ मध्ये सर्वाधिक १२५८ कोटी रुपयांच्या औषधांची विक्री झाली आहे. २०१९-२० ते २०२३-२४ दरम्यान केरळमधून सर्वाधिक ७९६.१९ कोटी रुपयांच्या औषधांची विक्री झाली. त्यानंतर कर्नाटक (७१४.२२ कोटी), उत्तर प्रदेश (६३१.२१ कोटी) या राज्यांचा क्रमांक लागतो.                                          

हेही वाचा