मडगाव : काँग्रेसमध्ये असताना २०२० मध्ये प्रतिमा कुतिन्होंच्या नेतृत्वात दुचाकी तिरडीवर टाकून 'राम नाम सत्य है' म्हणत आंदोलन करण्यात आले. याप्रकरणी हिंदुंच्या भावना दुखावल्याप्रकरणी प्रतिमा कुतिन्होंविरोधात गुन्हा नोंद झाला होता. न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉंरट जारी करण्यात आल्यानंतर रविवारी प्रतिमा कुतिन्हो यांना मडगाव पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे.
कॉँग्रेस पक्षात असताना सामाजिक कार्यकर्त्या प्रतिमा कुतिन्हो यांनी रस्त्यावर उतरत विविध आंदोलने केली होती. २०२० मध्ये जुलै महिन्यात दक्षिण गोवा जिल्हा महिला कॉँग्रेसतर्फे इंधन दरवाढ झाल्याचा निषेध नोंदवण्यात आला. यावेळी मडगाव ओल्ड मार्केटपासून दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली होती. त्यावेळी एका तिरडीवर दुचाकी ठेवून ती खांद्यावर उचलून घेत प्रतिकात्मक आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर फातोर्डा पोलिसांकडून हिंदू धर्मीयांच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आलेला होता.
तसेच याप्रकरणी चार्टशीटही जुलै महिन्यात दाखल करण्यात आलेली होती. न्यायालयात याप्रकरणी सुनावणी सुरू होती. न्यायालयाकडून या प्रकरणात प्रतिमा कुतिन्हो यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले. त्यानुसार मडगाव पोलीस शनिवारी प्रतिमा कुतिन्हो यांच्या निवासस्थानी त्यांना शोधण्यासाठी गेले होते पण त्या घरी आढळून आल्या नाहीत. त्यानंतर रविवारी सकाळी मडगाव पोलीस पुन्हा कुतिन्हो यांच्या घरी गेले व प्रतिमा यांना पोलिसांच्या गाडीतूनच मडगाव पोलिस ठाण्यात आणण्यात आले. सध्या मडगाव पोलिसांकडून प्रतिमा कुतिन्हो यांना ताब्यात घेण्यात आलेले असून सोमवारी न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे समजते. आपण राज्य सरकारविरोधात आवाज उठवत असल्याने पोलिसांकडून आपणास ताब्यात घेण्यात आले असे प्रतिमा कुतिन्हो यांनी म्हटले आहे.