मडगाव : नेसाय येथील औद्योगिक विकास वसाहतीनजीक जंक्शनवर रविवारी रात्री स्वयंअपघात दुचाकीचालक आल्वितो तावारिस (२४ , रा. सां जुझे दी अरीयाल) याला गंभीर दुखापत झाली व त्याचा मृत्यू झाला. मायना कुडतरी पोलिसांनी याप्रकरणाची नोंद केलेली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नेसाय येथील औद्योगिक विकास वसाहतीच्या जंक्शननजीक रविवारी रात्री मध्यरात्रीच्या सुमारास अपघात झाला. सां जुझे दी अरीयाल येथील रहिवासी असलेला आल्वितो तावारिस हा आपल्या व्हेस्पा या दुचाकीवरुन प्रवास करत असताना जंक्शननजीक त्याचा गाडीवरील ताबा सुटला. त्याच्या गाडीची धडक समोरील संरक्षक भिंतीला बसली. गाडी चालवताना हेल्मेट परिधान केलेले नसल्याने संरक्षक भिंतीला गाडीची धडक बसली त्यावेळी चालक आल्वितो याच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाली. यात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीचालक आल्वितो याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
मायना कुडतरी पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. अपघाती मृत्यू म्हणून याप्रकरणी मायना कुडतरी पोलिसांनी नोंद केलेली आहे व पुढील तपास केला जात आहे.