रायबंदर पोलीस चौकीतील घटना, गोमेकॉत उपचार सुरू
म्हापसा : पोलीस सेवेतून हकालपट्टी करण्यात आलेल्या आयआरबी पोलीस कॉन्सटेबल संशयित अमित नाईक याने फिनाईल प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सदर घटना आज रविवारी सकाळी ८ च्या सुमारास जुने गोवे पोलिसांच्या रायबंदर पोलीस चौकीमध्ये घडल्याचे समोर आले. संशयितावर सध्या गोमेकॉत उपचार सुरू आहेत.
जमीन घोटाळ्याप्रकरणी गुन्हा शाखेच्या कोठडीत असलेला सराईत गुन्हेगार सिद्दीकी उर्फ सुलेमान खान याला कोठडीतून पळून जाण्यात मदत करण्यात संशयित अमित नाईक या आयआरबी पोलीस कॉन्स्टेबलचा हात होता. एका पोलिसाच्या सहाय्याने पसार होत सिद्दीकीने गोवा पोलीस यंत्रणेला एक प्रकारे आव्हानच दिले आहे. दरम्यान संशयित अमित नाईक हा दि. १३ रोजी रात्री हुबळी पोलिसांना शरण आला होता. त्यानंतर शनिवारी १४ रोजी जुने गोवे पोलिसांनी त्यास अटक केली. अटक केल्यानंतर संशयिताला पोलिसांनी रायबंदर पोलीस चौकीतील कोठडीत ठेवले होते.
रविवारी सकाळी संशयिताने स्वच्छतागृहात जाण्याचा बहाणा केला. तिथे साफ-सफाईचे काम करणाऱ्या महिलेच्या हातातून फिनाईलची बाटली हिसकाऊन फिनाईल प्राशन केले. हा प्रकार समजताच पोलिसांनी संशयिताला गोमेकॉत दाखल केले. तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळाल्यावर उत्तर गोवा पोलीस अधीक्षक अक्षत कौशल व उपअधीक्षक सुदेश नाईक यांनी गोमेकॉत जाऊऩ संशयिताची चौकशी केली.
सिद्दीकी उर्फ सुलेमान खान पलायन आणि संशयित अमित नाईकने केलेला आत्महत्येचा प्रयत्न या दोन्ही प्रकरणांवर रविवारी दुपारी पोलीस अधिकार्यांची उच्च स्तरीय बैठक झाली. पोलीस महासंचालक अलोक कुमार यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक झाली असल्याचे समोर आले असून अधिकार्यांना विविध सूचना देण्यात आल्या आहेत.