बेताळभाटी ग्रामसभेत प्रश्न विचारताना नागरिक. (संतोष मिरजकर)
मडगाव : बेताळभाटीच्या ग्रामसभेत गावातील कचरा संकलनावर चर्चा करण्यात आली. यावेळी घरोघरी कचरा संकलनावेळी ओला कचरा गोळा करण्याची मागणी करण्यात आली. या ग्रामसभेत प्रत्येक घरानिहाय दरमहिना दहा रुपये कचरा संकलन फी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बेताळभाटी ग्रामसभा रविवारी पंचायतीच्या सभागृहात सरपंच मिनू फर्नांडिस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी मागील ग्रामसभेच्या इतिवृत्ताचे वाचन करण्यात आले व त्याला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा ऑडिट अहवाल सादर करण्यात आला. त्यावेळी स्थानिकांनी पंचायतीकडे येणार्या महसुलापेक्षा खर्च जास्त होत असल्याचे दिसून येत असल्याने पुढील वर्षाच्या ऑडिट करताना जमा-खर्चाच्या दोन्ही बाजू समतोल राखण्याची मागणी केली. गावातील कचरा संकलनाचा विषय आला असता घरोघरी केवळ सुका कचरा गोळा केला जात असून ओला कचरा गोळा करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. त्यावेळी सचिवांनी यापुढील ग्रामसभेत हा मुद्दा घेण्यात येईल व चर्चेअंती निर्णय घेऊ असे स्पष्ट केले. तसेच गावातील कचर्याचे प्रमाण वाढत असल्याने मटेरिअल रिकव्हरी फॅसिलिटीची जागा आणखी वाढवण्यावर चर्चा करण्यात आली. यावेळी कचरा संकलनासाठीचा खर्च वाढत असल्याने महसुलासाठी प्रत्येक घरानिहाय दहा रुपयांचा कचरा संकलन कर घेण्याचा ठराव संमत करण्यात आला. याशिवाय गावातील इतर विकासकामांवरही चर्चा करण्यात आली.