सासष्टी : शांतादुर्गा फातर्पेकरीण जत्रोत्सवात मुस्लिम विक्रेत्यांना नो एंट्री

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
15th December, 06:01 pm
सासष्टी : शांतादुर्गा फातर्पेकरीण जत्रोत्सवात मुस्लिम विक्रेत्यांना नो एंट्री

मडगाव : फातर्पा येथील श्री शांतादुर्गा फातर्पेकरीण देवस्थानचा जत्रोत्सव यावर्षी वर्षाअखेरीस होत आहे. या निमित्ताने जत्रेच्या नियोजनासाठी महाजनांची बैठक आज रविवारी पार पडली. यात जत्रोत्सवावेळी मुस्लिम समाजातील विक्रेत्यांना स्टॉल लावण्यास परवानगी न देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.  

फातर्पा येथील श्री शांतादुर्गा फातर्पेकरीण देवस्थानातर्फे यावर्षीचा जत्रोत्सव ३१  डिसेंबर ते ४ जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. याच अनुषंगाने वार्षिक जत्रोत्सवाच्या आयोजनासाठी महाजनांची बैठक पार पडली. महाजनांच्या या बैठकीमध्ये जत्रोत्सवात स्टॉल्स लावण्याच्या मुद्द्यावर चर्चा केली जात असतानाच मुस्लिम समाजातील कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही वस्तूंच्या विक्रीसाठी स्टॉल्स उभारण्याची परवानगी ंन देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे यावर्षीच्या श्री शांतादुर्गा फातर्पेकरीण देवस्थानाच्या वार्षिक जत्रोत्सवात मुस्लिम समाजातील विक्रेत्यांना स्टॉल्स देण्यात येणार नाहीत. 

गेल्या काही महिन्यांपासून राज्यात हिंदू समाजातील लोक विविध मुद्द्यांवरुन एकत्र येऊ लागले आहेत. बांगलादेशातील हिंदूवरील हल्ल्यांवरुनही राज्यात निदर्शने करण्यात आली आहेत. या सर्व घटनांच्या  पार्श्वभूमीवर देवस्थानाकडून घेण्यात आलेला हा निर्णयावर समाजातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

हेही वाचा