गेल्यावर्षी केंद्राकडून एक पैसाही नाही : सक्षम अंगणवाडीसाठीही निधीत घट
पणजी : बाळंतपणानंतर महिलेच्या खात्यात थेट ५ हजार रुपये जमा करणाऱ्या पंतप्रधान मातृ वंदना योजनेंतर्गत गेल्यावर्षी गोव्याला एकही पैसा मिळालेला नाही. त्यामुळे आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये गोव्यातील एकाही महिलेला प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ मिळालेला नाही. राज्यसभेत एका उत्तरात सदर माहिती उघड झाली आहे. तसेच गोव्याला गेल्या वर्षीच्या तुलनेत सक्षम अंगणवाडी आणि पोषण निधीअंतर्गत कमी निधी मिळाला आहे.
२०२३-२४ वर्षापूर्वी मात्र गोव्याला या योजनेअंतर्गत केंद्राकडून निधी मिळाला आहे. लग्नानंतर पहिले अपत्य जन्माला आल्यास ५ हजार रुपये थेट पत्नीच्या खात्यात जमा केले जातात. दुसरे मूल मुलगी असल्यास ६ हजार रुपये जमा केले जातात. प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेंतर्गत नावनोंदणी झाल्यानंतर आर्थिक मदत देण्याची तरतूद सदर योजनेत आहे.
२०१९-२० मध्ये गोव्याला या योजनेअंतर्गत केंद्राकडून १ कोटी ४० लाख रुपयांचा निधी मिळाला. त्यानंतर २०२०-२१ मध्ये १२ लाख रुपयांचा निधी मिळाला. २०२१-२२ वर्षी १ कोटी ९ हजार रुपयांचा निधी गोव्याला मिळाला. २०२२-२३ मध्ये या योजनेंतर्गत गोव्याला १ कोटी ६१ लाख रुपयांचा निधी मिळाला. २०२३-२४ वर्षी गोव्याला एकाही पैशांचा निधी मिळालेला नाही. राज्यसभा खासदार फुलोदुवी नेतम यांच्या प्रश्नावर केंद्रीय महिला व बालविकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांनी ही लेखी माहिती दिली.
सक्षम अंगणवाडी आणि पोषण योजनेंतर्गत लहान मुलांसाठी तसेच त्यांच्या मातांसाठी धान्याची तरतूद सक्षम अंगणवाडी आणि पोषण योजनेत आहे. या योजनेंतर्गत ६ वर्षांपर्यंतच्या मुलांना जेवणासाठी कडधान्य देण्याची तरतूद आहे. तसेच गरोदर महिला आणि लहान मुलींसाठीही अन्नधान्य दिले जाते. लहान मुले शिकतात त्या अंगणवाड्यांचा दर्जा सुधारण्यासाठी मदत देण्याचीही तरतूद आहे.
अंगणवाडीसाठी गोव्याला मिळाले १३ कोटी ९५ लाख
सक्षम अंगणवाडी आणि पोषण योजनेंतर्गत २०२३-२४ मध्ये गोव्याला १३ कोटी ९५ लाख रुपये मिळाले आहेत. २०२२-२३ च्या तुलनेत हा आकडा कमी आहे. २०२२-२०२३ मध्ये या योजनेंतर्गत १४ कोटी ७१ लाख रुपये मिळाले. या योजनेंतर्गत २०१९-२० मध्ये गोव्याला १६ कोटी २ हजार आणि २०२०-२१ मध्ये २० कोटी ४४ लाख रुपये मिळाले होते. त्यानंतर २०२१-२२ मध्ये १० कोटी ८४ लाख रुपये आणि २०२२-२३ मध्ये १४ कोटी ७१ लाख रुपये निधी गोव्याला मिळाला होता.
पंतप्रधान मातृ वंदना योजनेंतर्गत गोव्याचा निधी
वर्ष निधी (कोटी)
२०१९-२० १.४०
२०२०-२१ ०.१२
२०२१-२२ १.०९
२०२२-२३ १.६१
२०२३-२४ ००
मिशन सक्षम अंगणवाडी योजनेसाठी निधी
वर्ष निधी (कोटी)
२०१९-२० १६.०२
२०२०-२१ २०.४४
२०२१-२२ १०.८४
२०२२-२३ १४.७१
२०२३-२४ १३.९५