हवाई प्रवाशांच्या वाढीत गोवा देशात सहावा

राज्यसभेतील माहिती : महाराष्ट्र प्रथम, कर्नाटक दुसऱ्यास्थानी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
15th December, 11:52 pm
हवाई प्रवाशांच्या वाढीत गोवा देशात सहावा

पणजी : राज्यात एका वर्षात २२.५२ लाख हवाई वाहतूक करणारे प्रवासी वाढले आहेत. हवाई प्रवाशांच्या वाढीत गोवा देशात सहाव्या स्थानी आहे. या यादीत महाराष्ट्र प्रथम, दिल्ली दुसऱ्या, तर कर्नाटक तिसऱ्या स्थानी आहे. केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी राज्यसभेत दिलेल्या लेखी उत्तरातून ही माहिती मिळाली आहे. याबाबत खासदार नारायण अमीन यांनी अतारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
उत्तरात दिलेल्या माहितीनुसार, २०२२-२३ या आर्थिक वर्षात गोव्यातून ८५ लाख ९६ हजार ९३९ व्यक्तींनी देशांतर्गत, तर १ लाख १० हजार ५५७ जणांनी आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास केला होता. दोन्ही मिळून एकूण ८७.०७ लाख व्यक्तींनी हवाई प्रवास केला. २०२३-२४ या आर्थिक वर्षात गोव्यातून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली. उत्तरानुसार, २०२३-२४ या आर्थिक वर्षात गोव्यातून १ कोटी ८ लाख २० हजार ४०७ व्यक्तींनी देशांतर्गत, तर १ लाख ३९ हजार ९५९ जणांनी आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास केला होता. दोन्ही मिळून एकूण १ कोटी ९ लाख ६० हजार ३६६ व्यक्तींनी हवाई प्रवास केला. संपूर्ण देशाचा विचार करता २०२१-२२ ते २०२३-२४ या तीन वर्षांत हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या जवळपास दुप्पट झाली.
प्रवासीसंख्येत १४.६ टक्क्यांनी वाढ
संपूर्ण देशात २०२२-२३ मध्ये एकूण १५.९९ कोटी लोकांनी हवाई प्रवास केला होता. २०२३-२४ मध्ये या संख्येत १४.६ टक्क्यांनी वाढ झाली. यावर्षी १८.३२ कोटी लोकांनी हवाई प्रवास केल्याचे उत्तरात म्हटले आहे.

राज्य/प्रवासी संख्येतील वाढ (लाखांत)
महाराष्ट्र ८८.२२
दिल्ली ६०.७७
कर्नाटक ५०
तेलंगणा  ३९.४४
तामिळनाडू २५.७०
गोवा २२.५२
पश्चिम बंगाल २१.३५
गुजरात १९.४२
केरळ १७.९४
उत्तर प्रदेश १७.२५ 

हेही वाचा