तुर्कीने उत्तर सीरियातील मानबिज भाग ताब्यात घेतला आहे. तर अमेरिकेने मध्य सीरियात दहशतवादी संघटना आयसिसच्या ठिकाणांवर ७५ हून अधिक हवाई हल्ले केलेत.
दमास्कस : सीरिया आराजकतेच्या भक्ष्यस्थानी सापडला असून, येथे उद्भवलेल्या या अनिष्ट प्रसंगातही अनेक देशांनी स्वतःचा स्वार्थ बघत येथील अनेक भागांवर अप्रत्यक्षरित्या हक्क सांगितला आहे.
बंडखोरांनी अलेप्पोसह तीन प्रमुख शहरे ताब्यात घेतल्यावर आणि सीरियात सत्तापालट केल्यानंतर परदेशी सैन्याचा हस्तक्षेप वाढला आहे. येथे तुर्की, इस्रायल आणि अमेरिका यांसारख्या देशांनी आपला प्रभाव वाढवण्यास सुरुवात केली आहे. तुर्कीने उत्तर सीरियातील मानबिज भाग ताब्यात घेतला आहे. तुर्कीच्या बंडखोर सैन्याने कुर्दिश सीरियन डेमोक्रॅटिक फोर्सचा पराभव करून हा भाग ताब्यात घेतला. २०१६ मध्ये आयसिसला पराभूत केल्यानंतर कुर्दिश सीरियन डेमोक्रॅटिक फोर्सने हा परिसर ताब्यात घेतला होता. तुर्कीचे अध्यक्ष रेसेप एर्दोगन यांनी पत्रकार परिषद घेत, या मानबिजमधून दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची घोषणा केली.
इस्रायलने सिरियन राजधानी दमास्कसवर भीषण हल्ला करत १०० हून अधिक बॅलिस्टीक क्षेपणास्त्रे डागली आहेत. हे हल्ले बरजाह सायंटिफिक रिसर्च सेंटरजवळ झाले असून याठिकाणी रासायनिक शस्त्रांची निर्मिती केली जाते. इस्रायलचे परराष्ट्र मंत्री गिडॉन सार यांनीही हा हल्ला झाल्याच्या वृतास दुजोरा देण्यात आला आहे. या हल्ल्यांचा उद्देश शस्त्रास्त्रांचे तळ नष्ट करणे हा होता. असे केले नसते तर ही शस्त्रे बंडखोरांच्या हाती पडली असती. पुढे कदाचित या शस्त्रांचा वापर इस्रायलविरोधातही केला गेला असता, असे गिडॉन सार म्हणाले.
अमेरिकेने मध्य सीरियात दहशतवादी संघटना आयसिसच्या ठिकाणांवर ७५ हून अधिक हवाई हल्ले केले आहेत. यूएस सेंट्रल कमांडनुसार, या हल्ल्यांमध्ये बी-५२बॉम्बर आणि एफ-१५ ई लढाऊ विमानांचा वापर करण्यात आला. या हल्ल्यांमध्ये आयसिसचे अनेक सैनिक मारले गेले आणि त्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले. अमेरिका बऱ्याच काळापासून दहशतवादी संघटना आयसिसच्या विरोधात लढत आहे. अशा स्थितीत सत्तापालटानंतर अमेरिकेने या भागावर हल्ला करून आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
राष्ट्राध्यक्ष बशर अल-असाद देश सोडून रशियाला पळून गेले आहेत. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी असद आणि त्यांच्या कुटुंबाला राजकीय आश्रय दिला आहे. बंडखोरांनी सत्तापालट केल्यानंतर नागरिकांनी राष्ट्रपती भवनात घुसून लूटमार केली. बंडखोर दमास्कसच्या रस्त्यावर आनंदोत्सव साजरा करताना दिसले. यासोबतच राष्ट्राध्यक्ष असद यांच्या वडिलांच्या पुतळ्यांचीही मोडतोड केली तसेच अनेक ठिकाणी जाळपोळ करण्यात आली.
ऋषभ एकावडे