चीनमधील कॉलेजमध्ये ‘लव्ह एज्युकेशन’!

चीन

Story: विश्वरंग |
14th December, 12:40 am
चीनमधील कॉलेजमध्ये ‘लव्ह एज्युकेशन’!

चीनने एकापेक्षा अधिक मुले जन्माला घालण्यापासून लोकांना परावृत्त केले होते. याच पॉलिसीने चीनला आता गोत्यात आणले आहे. परिणामी देशातील ज्येष्ठ नागरिकांची संख्या सातत्याने वाढत आहे. विशेषत: तरुणांनी, नवदाम्पत्यांनी मुलांना जन्म द्यावा, यासाठी अक्षरश: वाट्टेल ते प्रयत्न चीन सरकार करीत आहे; पण त्यात अद्यापही त्यांना यश आलेले नाही.

‘काहीही करा; पण मुले जन्माला घाला,’ या आपल्या नव्या धोरणाचा पाठपुरावा करताना चीन सरकारने आता चक्क महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये ‘लव्ह एज्युकेशन’चा नवा अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. चीनमधील तब्बल ५७ टक्के तरुण लग्न करण्यास इच्छुक नाहीत. नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणाने ही बाब पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. बेरोजगारी, करिअर घडवण्यातल्या अडचणी आणि जोडीदाराचे नको असलेले ओझे यामुळे चिनी तरुण लग्न करण्यास इच्छुक नाहीत. आपल्या जुन्या निर्णयाचा चीनला पश्चात्ताप होत आहे. चीनचे आपल्याच देशातील तरुणाईला हर प्रकारे आमिष दाखवून झाले, प्रसंगी दमदाटी, धाकदपटशा दाखवून झाला; पण तरुणाई बधली नाही, ती नाहीच. त्यामुळेच चीनने तरुणांना आता यासंदर्भातले रीतसर शिक्षणच द्यायचे ठरवले आहे.

चिनी सरकारने विद्यापीठ, महाविद्यालयांना ‘लव्ह एज्युकेशन’च्या अभ्यासक्रमात तरुणांना प्रेमाचे, लग्नाचे, प्रजननाचे महत्त्व पटवून द्या. त्यांच्यात कुटुंबाविषयी सकारात्मक दृष्टिकोन तयार करा, त्यांच्यातील इंटिमेट रिलेशनशिप्स वाढीस लावा. तरुण आणि तरुणी यांच्यातील संवाद वाढविण्यासाठी, ते जास्तीत जास्त वेळ एकत्र यावेत यासाठी प्रयत्न करा, त्यासाठी वेगवेगळ्या केस स्टडीज त्यांना अभ्यासाला द्या, ग्रुप डिस्कशन्स आयोजित करा आदी अनेक आदेश दिले आहेत.

चीन सरकारची यात सक्रिय भूमिका आहे आणि सर्व विद्यापीठांवर, महाविद्यालयांवर ते आता लक्ष ठेवणार आहे. कितीही पैसा खर्च झाला, तरी चालेल; पण देशाची लोकसंख्या वाढवा, असा आदेशच सर्व संबंधितांना दिला आहे. दुसरीकडे चिनी तरुणाईला आता कसलेच आकर्षण नको आहे. त्यांना एकटे राहणेच आता अधिक फायदेशीर आणि हिताचे वाटू लागले आहे. चीनमध्ये बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आपल्याच जगण्याची मारामार, तिथे लग्न करून जोडीदाराचे ओझे सांभाळण्याची बऱ्याच तरुणांची तयारी नाही. अशा परिस्थितीत चीन सरकार ‘लव्ह एज्युकेशन’कडे अतिशय आशेने पाहत आहे.

सुदेश दळवी