‘डिसेंबर पहाट’ लघुपट निर्मितीची सरस कथा

युरोपमधला सर्वात आळशी देश मानल्या जाणाऱ्या पोर्तुगालला हाकलून लावण्यासाठी तब्बल १४ वर्षे का लागली, असा प्रश्न ‘डिसेंबर पहाट’च्या पोस्टरचे अनावरण करताना राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांनीही केला होता.

Story: विचारचक्र |
13th December, 12:22 am
‘डिसेंबर पहाट’ लघुपट निर्मितीची सरस कथा

तुमच्यावर एखादा लघुपट निघणार किंवा एखाद्या लघुपटात तुम्ही झळकणार असे मला कधी काळी कोणी सांगितले असते तर मी त्याला नक्कीच वेड्यात काढले असते. पण हा प्रस्ताव घेऊन गोव्यातील एक नामवंत लघुपट निर्माते व आयएएस अधिकारी मिहीर वर्धन, प्रसिद्ध सिनेमाटोग्राफर दिनेश भोसले माझ्या घरी आले, तेव्हा मलाच वेड लागायची पाळी आली. दिनेश भोसले माझे जुने मित्र आणि मिहीर वर्धन हे एक चांगले अधिकारी म्हणून ऐकून होतो. त्यामुळे हे दोघे माझी मस्करी करणार नाहीत, असे वाटत होते. पण माझा आणि चित्रपट क्षेत्राचा काहीच संबंध नव्हता. त्यामुळे हे दोघे कसला प्रस्ताव घेऊन आले आहेत, हे कळत नव्हते. मात्र अशा काही अनपेक्षित घटना माझ्या जीवनात घडलेल्या आहेत, ही गोष्ट लक्षात घेऊन गप्प बसलो. 

गेल्या ७५ वर्षांत तोंडाला कधी रंग फासला नव्हता. माझा एक अपवाद सोडला तर इतर चारही भावांनी आपापल्या कुवतीनुसार रंगदेवतीची सेवा केली. हार्मोनियमवादन, तबलावादन तसेच भजनात ते नेहमीच आघाडीवर असायचे. अपवाद तो माझाच आणि आता थेट लघुपटाची ऑफर! विश्वासच बसत नव्हता.

दै. ‘गोवन वार्ता’च्या ‘तरंग’ पुरवणीत मी अलिकडेच ‘इतिहासाची पाने चाळताना’ हे नवे सदर सुरू केले आहे. या सदराच्या पहिल्या लेखात  १८ डिसेंबर १९६१ रोजी पेडणे येथील व्हायकाऊंट हायस्कूलमध्ये गेलो असता ज्या घडामोडी घडल्या, त्याचे तपशीलवार वर्णन केले होते. माझ्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त डॉ. नितीन बोरकर यांनी एका इंग्रजी वर्तमानपत्रात लिहिलेल्या लेखात या घडामोडींचे यथार्थ वर्णन केले होते. राज्यपालांचे सचिव म्हणून काम करणारे आयएएस अधिकारी मिहीर वर्धन यांच्या वाचनात हा लेख आला. हा विषय लघुपटास चांगलाच आहे, असे त्यांना वाटले. त्यांनी मूळ लेख मिळवून त्याचे भाषांतर करून घेतले. या लेखाला थोडी जोड दिल्यास एक सर्वोत्कृष्ट लघुपट तयार होईल, याची खात्री पटल्याने वर्धन यांनी पुढील तयारी केली. दिग्दर्शक दिनेश भोसले यांच्याशी सल्लामसलत केली. निर्मात्यांशी चर्चा केली. या सगळ्या गोष्टी जुळून आल्यावर वर्धन माझ्याकडे आले आहेत, असे मला सांगण्यात आले. कोकणीबरोबरच इंग्रजी व पोर्तुगीज भाषेतूनही हा लघुपट तयार करण्यात येणार आहे. १८ डिसेंबर १९६१ रोजी पेडणे नगरीत सकाळपासून संध्याकाळपर्यंत घडलेल्या सगळ्या घटना चित्रित करण्यात येणार आहेत. गोवा मुक्तीदिन १९ डिसेंबरला साजरा केला जातो, कारण गोव्याचे शेवटचे पोर्तुगीज गव्हर्नर व्हासाल दा सिल्वा यांनी शरणागती पत्रावर १९ डिसेंबर १९६१ रोजी रात्री सह्या केल्या होत्या.

सदर लघुपट हा ऐतिहासिक सत्याला धरूनच असावा म्हणून निर्मात्यांचे प्रामाणिक प्रयत्न राहतील. त्यासाठी इतिहासाचे गाढे अभ्यासक संशोधक संजीव सरदेसाई यांची मदत घेतली जाईल. त्याशिवाय गोवा स्वातंत्र्य सैनिक संघटनेचे अध्यक्ष दाद देसाई तसेच हयात असलेल्या स्वातंत्र्य सैनिक शारदा सावईकर व इतरांची मदत घेतली जाईल. माहितीपटाचे कथानक लिहिण्याचे काम मिहीर वर्धन करत आहेत. 

गोव्याचे  राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांच्या हस्ते इफ्फी महोत्सवात ‘डिसेंबर पहाट’ असे नामकरण करण्यात आलेल्या या लघुपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. सुमारे ४५० वर्षांच्या पोर्तुगीज वसाहतवादी राजवटीनंतर १९ डिसेंबरला गोमंतकीयांनी स्वातंत्र्याची पहिली पहाट अनुभवली, त्यामुळेच ‘डिसेंबर पहाट’ असे नामकरण करण्यात आले आहे.

वर्धन यांच्या कथेवर हा लघुपट उभा राहणार आहे. त्यांच्या कथेवर यापूर्वी आधारित पां‌‌च लघुपटांची निर्मिती झाली असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महोत्सवात हे सर्व लघुपट बरेच गाजलेले आहेत. काही लघुपटांना पु‌रस्कारही प्राप्त झाले आहेत.

दुर्गा प्रसाद हे या लघुपटाचे निर्माते आहेत. त्यांनी निर्माण केलेले लघुपट बरेच गाजले आहेत. दुर्गा प्रसाद, मिहीर वर्धन व दिनेश भोसले या त्रिमूर्ती एकत्र येऊन गोवा मुक्तीवर आधारित हा लघुपट तयार करीत असल्याने तो उत्कृष्ट व सर्वांगसुंदर नक्कीच असणार.

संपूर्ण जगावर सत्ता गाजवणाऱ्या ब्रिटिशांनी १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपले पांढरे पाय भारत भूमीवरून काढून घेतले. मात्र युरोपमधला सर्वात आळशी देश मानल्या जाणाऱ्या पोर्तुगालला हाकलून लावण्यासाठी तब्बल १४ वर्षे का लागली, असा प्रश्न ‘डिसेंबर पहाट’च्या पोस्टरचे अनावरण करताना राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांनीही केला होता

भारताचे तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू हे शांतीदूत म्हणून जगभर प्रसिद्ध होते. त्यामुळे गोव्यात लष्करी कारवाई केल्यास ही प्रतिमा बिघडली असती. त्याशिवाय पोर्तुगाल नाटो संघटना सदस्य होता. गोव्यावर भारतीय लष्कराने हल्ला केला असता तर नाटो करारातील तरतुदीनुसार अमेरिकेला पोर्तुगालच्या मदतीला यावे  लागले असते. १९५५ मध्ये पत्रादेवी सीमेवर जेव्हा सत्याग्रहींवर बेछूट  गोळीबार केला, तेव्हा कारवाई करणे शक्य होते. पण नेहरूंनी सत्याग्रहींवरच बंदी घातली. शांततापूर्ण पद्धतीने प्रयत्न करून पोर्तुगाल कोणताच प्रतिसाद देत ‌नाही, हे जगाला दाखवून देण्यासाठी वातावरण निर्माण करण्यात आले. अगदीच नाइलाज झाल्याने अखेर  लष्करी कारवाई करण्यात आली. त्यावेळी संयुक्त राष्ट्र संघटनेत अमेरिकेने जो गोंधळ घातला, तो अनपेक्षित होता. रशियाने व्हेटो वापरला नसता तर गोव्यात घुसलेले लष्कर मागे घेण्याची नामुष्की भारतावर आली असती. या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहीत आहेत. या साऱ्या पार्श्र्वभूमीवर ‘डिसेंबर पहाट’ हा लघुपट तयार होत आहे. १८ डिसेंबर १९६१ रोजी नेहमीप्रमाणे शाळेत जाताना जे अनुभव आले, ज्या घटना घडल्या त्याचे पुनर्निर्माण येत्या बुधवारी १८ डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे. बरोबर ६३ वर्षांनी ‘डिसेंबर पहाट’ या लघुपटाच्या चित्रिकरणाचा मुहूर्त होणार आहे. अखेर मी हिरो बनणार आहे.

हा लघुपट इंग्रजी व पोर्तुगीज भाषेतूनही बनणार असल्याने युरोप व जगभरातील सर्व देशांमध्ये होणाऱ्या चित्रपट महोत्सवात लघुपट विभागात ‘डिसेंबर पहाट’ नक्कीच गाजणार आहे. त्यासाठी तुमच्या शुभेच्छांची गरज आहे.


गुरुदास सावळ, (लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)