कोणताही पराक्रम आत्मविश्वास, सराव आणि बुद्धीचा वापर याशिवाय करता येत नाही, याची जाणीव असलेला गुकेश अत्यंत संयमी आणि शांत स्वभावाचा आहे, ज्यामुळे तो खेळाच्या अनेक टप्प्यांत आलेल्या चढउतारावेळी चलबिचल झाला नाही.
केवळ १२ वर्षांचा असताना बुद्धिबळात ग्रँडमास्टर झालेला गुकेश वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी १८ वा विश्वविजेता ठरला, हा सुखद धक्का भारतीयांची मान उंचावणारा आहे, देशाची शान वाढवणारा आहे. अंतिम सामन्याच्या अगोदर झालेल्या पत्रकार परिषदेत ज्याला नगण्य स्थान मिळाले, त्याचे स्थान उच्च असू शकत नाही अशा भावना व्यक्त झाल्या, तो गुकेश आता मात्र जगाचा लाडका बुद्धिबळपटू ठरला आहे. हे यश त्याला सहज मिळालेले नाही. कोणताही पराक्रम आत्मविश्वास, सराव आणि बुद्धीचा वापर याशिवाय करता येत नाही, याची जाणीव असलेला हा युवा खेळाडू अत्यंत संयमी आणि शांत स्वभावाचा आहे, ज्यामुळे तो कोणत्याही प्रकारे खेळाच्या अनेक टप्प्यांवेळी आलेल्या चढ-उतारावेळी चलबिचल झाला नाही. आपल्याकडून कोणतीही चूक होऊ द्यायची नाही, मात्र प्रतिस्पर्ध्याला चूक करायला भाग पाडायचे, हे सूत्र धरून तो खेळत राहिला. पहिल्या डावात आणि नंतर १२ व्या डावात त्याला पराभव पत्करावा लागला तरी तो डगमगला नाही. त्याने प्रतिस्पर्धी चीनचा डिंग लिरेन याला चुकीची खेळी करण्यास प्रवृत्त केले. त्याचा लाभ घेत अखेरपर्यंत लक्ष केंद्रित करीत त्याने त्या ५० वर्षीय खेळाडूला पराजित केले आणि तो युवा विजेता ठरला. २०१३ साली ज्यावेळी विश्वविजेता भारतीय खेळाडू विश्वनाथन आनंद याला पराभव स्वीकारावा लागला होता, त्यावेळी बालपणीच आपण हे आव्हान पेलायचे आणि तो प्रतिष्ठेचा किताब प्राप्त करायचा, या महत्वाकांक्षेने गुकेश पछाडला गेला होता. त्याच्या या देदिप्यमान वाटचालीत त्याला त्या लहान वयात ग्रँडमास्टर हा सन्मान प्राप्त होऊ शकला.
वेगवेगळ्या वयोगटांत विजेतेपद पटकावणारा गुकेश २०१७ मध्ये फ्रान्समधील कान्स येथे झालेल्या स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय मास्टर बनला. या युवा चॅम्पियनच्या सुरुवातीच्या यशात ९ वर्षांखालील आशियाई शालेय अजिंक्यपद आणि २०१८ मध्ये जागतिक युवा बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत १२ वर्षांखालील गटात सुवर्णपदक जिंकले होते. गुकेशला बुद्धिबळ खेळाची आवड असल्याने त्याच्या पालकांनी त्याला चौथीनंतर पूर्णवेळ शाळेत जाण्यापासून थांबविले होते. २०१९ मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या स्पर्धेदरम्यान गुकेश हा इतिहासातील दुसरा सर्वात तरुण ग्रँडमास्टर ठरला होता. त्यानंतर हा विक्रम केवळ रशियाच्या सर्गेई कार्जाकिनने मोडला होता, पण नंतर अमेरिकेतील भारतीय-अमेरिकन टॅलेंट अभिमन्यू मिश्राने तो मोडला.
गुकेशने आपली झपाट्याने प्रगती सुरूच ठेवत एकापाठोपाठ एक मैलाचा दगड गाठला. मात्र, हे सर्व घडत असताना गुकेश प्रायोजकाविना होता आणि त्याला बक्षिसाची रक्कम आणि पालकांच्या क्राऊड फंडिंग उपक्रमातून आपले आर्थिक व्यवस्थापन करावे लागत होते. नामवंत डॉक्टर असूनही त्यांच्या वडिलांना आपला व्यवसाय सोडावा लागला आणि त्यांनी सतत गुकेशला साथ देत देशपरदेशांत त्याच्यासोबत राहून त्याला प्रोत्साहन दिले, तर त्याच्या आईने संसाराचा गाडा एकटीने चालविण्यासाठी दिलेले योगदानही तेवढेच महत्त्वाचे मानावे लागेल.
अनेक आव्हाने असतानाही त्याने गेल्या वर्षी आपला आदर्श विश्वनाथन आनंद यांना मागे टाकत भारताचा क्रमांक एक पटकावला. २०२० मध्ये कोविड महामारी शिखरावर असताना अस्तित्वात आलेल्या वेस्टब्रिज-आनंद बुद्धिबळ अकादमीत आनंदनेच त्याला चमकवले होते, त्यावेळी अर्थातच बहुतेक क्रीडा उपक्रम थांबले होते. अशी संधी मिळणे हा गुकेशच्या नशिबाचा भाग होता. गुकेशच्या या कामगिरीपूर्वी रशियाचा दिग्गज गॅरी कास्पारोव्हने वयाच्या २२ व्या वर्षी १९८५ मध्ये अनातोली कार्पोव्हला पराभूत करून विजेतेपद पटकावले होते. गुकेशने या वर्षाच्या सुरुवातीला कॅंडिडेट्स स्पर्धा जिंकल्यानंतर जागतिक विजेतेपदाचा सर्वात तरुण प्रतिस्पर्धी म्हणून या सामन्यात प्रवेश केला होता. महान विश्वनाथन आनंदनंतर जागतिक विजेतेपद पटकावणारा तो दुसरा भारतीय आहे. पाच वेळा विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या आनंदने २०१३ मध्ये शेवटचे विजेतेपद पटकावले होते. गुकेशने २०२४ मध्ये ४५ व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये एक सांघिक आणि दोन वैयक्तिक सुवर्णपदके, तसेच एक कांस्य सांघिक पदक जिंकले. कॅंडिडेट्स स्पर्धा जिंकणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरला.
देशात अर्जुन अथवा प्रग्नानंध यासारखे गुकेशच्या तोडीचे बुद्धिबळपटू असून, त्यांचा समावेश जगातील पहिल्या दहा खेळाडूंमध्ये होतो. गुकेशसारखे हे खेळाडूही पराभवात खचत नाहीत किंवा निराश होत नाहीत. गुकेशचा हाच गुण त्याला सर्वोच्च स्थानापर्यंत घेऊन गेला. देशातील तसेच परदेशातील तज्ज्ञांनी आपल्या मनाची शांती न ढळण्यासाठी जे प्रयत्न केले, त्याबद्दल गुकेशने त्यांचे आभार मानले आहेत. त्याच्या या सल्लागारांमध्ये केवळ डॉक्टर नसून, दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. पुरेशी झोप घेणे आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढविणे ही अशा खेळाची गरज असल्याचे गुकेशने म्हटले आहे. काही तरी मोठे साध्य करायचे आहे, या विचाराचे दडपण घेऊ नये, असा सल्ला त्याला हितचिंतकांनी दिला होता. बुद्धिबळ या नावातच या खेळाचे मर्म असून गुकेशने ते आत्मसात केल्याचे त्याची अपूर्व कामगिरी दर्शविते.