लहान बाळाने बोबडे बोलून कितीही वाकडीतिकडी पावले टाकली, तरी त्याचे लाडे लाडे कौतुक करूनच आईला समाधानाचे सुख मिळते. कसेही करून तुमच्यासारख्या संत-सज्जनांचे प्रेम लाभण्याच्या इच्छापूर्तीसाठी आम्हाला तुमच्याशी लडिवाळपणा करण्याचा हक्क आहे.
तसे बघायला गेले तर भगवद्गीतेच्या अर्थात दडलेले तत्वज्ञान कुणीही, कितीही समजावून सांगायचे म्हटले तरी ते ऐकून घेणे सोपे नाही. तल्लख बुद्धीच्या हुशार तज्ज्ञांना सुद्धा जिथे बुद्धिमांद्य नियंत्रणात आणता आणता नाकी नऊ येतात, तिथे सुमार सामान्यांची काय कथा? आणि इथे तर नेवाशातल्या त्या देवळात एका पोराच्या तोंडून येणारा गीतार्थ ऐकण्यासाठी आलेल्यांमध्ये कुतूहलाच्या अपूर्वाईपोटी आलेलेच बहुसंख्येने होते. ते काही सरदाराच्या आदेशासरशी एकत्र झालेले सैन्य नव्हे किंवा एखाद्या नेत्याला पाठिंबा देण्यासाठी जमलेली सभा नव्हे. आपला अहंभाव खुंटीला टांगून धर्माचा अर्थ ऐकण्यासाठी येऊन येऊन असे किती लोक येणार? त्या मध्यम आकाराच्या देवळाच्या विस्ताराएवढीच त्यांचीही संख्या मर्यादित असणे साहजिक आहे. त्यातून त्या कथनात अध्यात्मज्ञानाच्या अमर्याद पैलूंचा समावेश करण्याची त्या तेजस्वी मुलाची हातोटी कितीही अपूर्व असली तरी तो तत्वविस्तार आपल्या मनात सामावून घेण्याची श्रोत्यांची मर्यादा आपले काम बजावीत होतीच!
पहिल्या आठ अध्यायांचा उहापोह करून झाला होता. आता नवव्याला हात घालायचा होता. अर्थाची जुळवाजुळव मनामध्ये करून तो यथासांग मांडायला ज्ञानदेव सज्ज झाले होते. कथानकाची सुरवात करायच्या आधी आपसूकच ज्ञानदेवांची दृष्टी श्रोत्यांवरून फिरली, आणि ते चकित झाले! कारण त्यांच्या स्वतःमध्ये गीतार्थ लोकांना सांगण्यासाठी जो उत्साह ओसंडत होता, तो श्रोत्यांमध्ये नव्हता! कंटाळलेपणा स्पष्टपणे दिसत होता. मेंदू सुस्तावल्यामुळे दृष्टी मंदावत चालली होती. श्रोत्यांच्या चेहेऱ्यांवर उत्साह असेल व डोळ्यांत प्रतिसाद असेल तर वक्त्याला विषय मांडायला हुरूप येतो आणि तो उत्साह व तो प्रतिसाद श्रोत्यांमध्ये नसेल तर मग त्यांना काहीही सांगून काय उपयोग? स्वीकृती तर होणारच नाही हे स्पष्ट दिसत असल्याने अशा वेळी वक्ताही आपोआप हतोत्साहित होतो. तशीच काहीशी परिस्थिती त्यावेळी त्या ठिकाणी बहुतेक उत्पन्न झाली असावी. परिणामी ज्ञानदेवांनी श्रोता व वक्ता यांच्यातील परस्पर पूरकत्वातील उत्कृष्टतेच्या आवश्यकतेची मांडणी सुरू केली.
ज्ञानदेवांच्या जिव्हाग्रावरील श्रीशारदाविश्वमोहिनीच्या पदन्यासाला सुरवात झाली. संतजनहो, मी तुम्हाला उघडपणे व प्रतिज्ञापूर्वक सांगतो की आता जर तुम्ही जरा लक्ष देऊन ऐकलंत तर जीवनातील सगळे सुख आनंद, समाधानासहवर्तमान तुमच्याकडे धावत यायला लागेल.
जीवनाचे समग्र तत्वज्ञान त्याच्या समस्त भल्या-बुऱ्या पैलूंसकट व्यक्तिसामान्यांनी ऐकणे का अत्यावश्यक आहे हे विशेषत्वाने श्रोत्यांच्या लक्षात आणून देण्याची निकड त्यावेळी उपस्थित झाली होती. त्या विषयाचे असामान्यत्व बोचरेपणाने जाणवल्याशिवाय त्यांची मरगळ आपली जागा सोडणार नव्हती. पण लोण्याहूनही मऊ मन असलेल्या ज्ञानदेवांना तो बोचरेपणा सुद्धा श्रोत्यांना जाणवू द्यायचा नव्हता.
इथे तुमच्यासारख्या सर्वज्ञांच्या सभेत मी हे गर्वाने वा आढ्यतेने बोलत नाही. तर मी लडिवाळपणे तुम्हाला विनंती करतो की मी जे काही आता तुम्हाला सांगणार आहे, तिकडे जरा विशेषत्वाने लक्ष द्या. तुमच्यासारखी श्रीमंत माहेरं जिथे असतात तिथे काय विचारता? लाडांचेही लाड पूर्ण होऊ शकतात. एवढेच नव्हे तर मनोरथांचेही मनोरथ निश्चितपणे पूर्ण होऊ शकतात. तुमच्या कृपादृष्टीरुपी पाण्याचा नुसता ओलावा जरी मिळाला, तरी कोमेजू पाहणारे इथले प्रसन्नतेचे मळे भराला येतील! (धर्मार्थाच्या चिंतन-मननाने) थकलो भागलेलो मी त्या प्रसन्नतेच्या मळ्यातील शीतल सावली बघून आता तिथे सुखाने लोळण घेणार. सुखरुपी अमृताचे डोह असलेले तुम्ही, त्यात तुमची ओढ, तुमच्या सलगीने आम्ही हवी तेव्हा घेऊन स्वत:ला श्रांत करू शकू. ती सलगी करायला सुद्धा जर भ्यायला लागलो, तर मन:शांतीसाठी आम्ही करायचे काय? लहान बाळाने बोबडे बोलून कितीही वाकडीतिकडी पावले टाकली, तरी त्याचे लाडे लाडे कौतुक करूनच आईला समाधानाचे सुख मिळते. कसेही करून तुमच्यासारख्या संत-सज्जनांचे प्रेम लाभण्याच्या इच्छेच्या पूर्तीसाठी आम्हाला तुमच्याशी लडिवाळपणा करण्याचा हक्क आहे. एरवी तुम्ही संतजन सर्वज्ञ आहात. तिथे मी अजाण लेकराने काय बोलावे?
शारदा-पुत्राला विद्या मिळवण्यासाठी काय घोकंपट्टी करावी लागते का? काजवा कितीही मोठा असला, सूर्यापुढे त्याचा ताठा किती चालणार का? ताटच जर अमृताचे असेल, तर त्यातून वाढण्याजोगी अशी ती पक्वान्ने तरी कोणती म्हणायची? ज्याची किरणे मुळातच शीतल आहेत, त्याला वारा घालण्यात काय हशील आहे? प्रत्यक्ष नादाला संगीत ते काय ऐकवणार आणि अलंकारांना अलंकार काय घालणार? सुवासाने काय हुंगायचे? आणि समुद्राने कुठे जाऊन आंघोळ करायची? आपल्या नजरेस पडणारे सगळे आकाश पोटात घेईल एवढी एखादी वस्तू असू शकेल का? त्याप्रमाणे अवधानतृप्ती होऊन चित्ती समाधान पावल्याने आपण आपल्या मुखकमलातून धन्योद्गार काढाल असे वक्ते पण कुणाला लाभू शकेल?
असे जरी असले, तरीही सर्व विश्वाला प्रकाश देणाऱ्या सूर्यनारायणाला कुणी काकड्याने, भक्तिभावाने ओवाळूच नये काय? किंवा ओंजळभर पाणी सागरास अर्पूही नये? संत-सज्जन श्रोतेहो, तुम्हाला मूर्तिमंत महेश मानून मी तुमची भक्ती करतो. शक्तिहीन असलो तरी प्रेमाने तुमचे पूजन करतो. तरी माझ्या बोलांच्या स्वरूपातले त्रिदळी पान जरी निगडीचे असले तरी ते बिल्वपत्र मानून आपण स्वीकारावे. वडिलांच्या ताटाजवळ बसून एवढ्याशा चिमुकल्या बाळाने त्या वडिलांनाच त्यातला घास भरवायला हात पुढे करावा आणि मग वडिलांनीही प्रेमाने संतोष पावून तो घास भरून घ्यायला आपले तोंड पुढे करावे; तसे मी जरी जडत्वाने भरलेल्या बालबुद्धीने तुमच्यापाशी बडबड करीत असलो, तरी तुम्ही संतजनांनी तुमच्या प्रेमळ स्वभाव-विशेषाने संतोष पावून आपलेपणाने मला स्वीकारावे ही माझी आपणास सलगीची प्रार्थना आहे.
(क्रमश:)
मिलिंद कारखानीस, लेखक राज्याचे निवृत्त उपवनपाल असून ते विविध विषयांवर लेखन करतात.) मो. ९४२३८८९७६३