तिसवाडी : सिद्दिकी सुलेमानला अटक करणे हेच प्राथमिक उद्दिष्ट : पोलीस महासंचालक

सिद्दिकी सुलेमान खानच्या अटकेनंतर केली जाईल व्हायरल व्हिडिओत केलेल्या आरोपांची चौकशी

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
3 hours ago
तिसवाडी :  सिद्दिकी सुलेमानला अटक करणे हेच प्राथमिक उद्दिष्ट : पोलीस महासंचालक

पणजी : गुन्हे शाखेच्या कोठडीतून फरार झालेल्या सिद्दिकी सुलेमान खान याला अटक करणे हेच पोलिसांचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. त्याला अटक केल्यानंतर त्याने व्हायरल व्हिडीओद्वारे केलेल्या आरोपांची चौकशी केली जाईल, असे पोलीस महासंचालक अलोक कुमार यांनी सांगितले आहे.

जमीन हडप प्रकरणातील मुख्य सूत्रधार सिद्दीकी सुलेमान खान याने पोलीस कोठडीतून पोलिसाच्याच सहाय्याने पलायन केल्याने पोलिसांचे धाबे दणाणले आहेत. ज्या पोलीस कॉन्स्टेबलच्या मदतीने सिद्दिकी सुलेमान खान याने पळ काढला त्या अमीत नाईकला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान जुने गोवे पोलीस स्थानकाच्या रायबंदर पोलीस चौकीच्या कोठडीत अमितने फिनाईल प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्या नंतर सिद्दिकी सुलेमान खान याचा व्हिडीओ रविवारी रात्री व्हायरल झाला. पोलिसांनीच आपल्याला एन्काउंटरची धमकी देत हुबळीला आणून सोडल्याचा खळबळजनक आरोप त्याने या व्हिडीओच्या माध्यमातून केला . या नंतर सोमवारी आप शिष्टमंडळाने पोलीस महासंचालकांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना पोलीस महासंचालकांनी ही माहिती दिली.

पळून गेलेल्या सिद्दिकी सुलेमान खान याला अटक करणे हेच पोलिसांचे आहे. त्याला अटक केल्यानंतर व्हिडिओतील आरोपांची चौकशी केली जाईल. डीआयजी रेंजच्या मार्गदर्शनाखाली विविध पथकांच्या माध्यमाने त्याचा शोध घेतला जात आहे. त्याने केलेले आरोप हा लपून राहण्यासाठीचा डाव असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सिद्दिकी सुलेमान खान हा गुन्हेगार आहे. चार वर्षे तो फरार होता. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्याच्या आरोपांवर कितपत विश्वास ठेवायचा हा प्रश्न आहे. अटक करून चौकशी केल्यानंतर आरोपातील तथ्य समोर येण्यास मदत होईल, असे पोलीस महासंचालक म्हणाले.

दरम्यान, पोलिसांनीच मला हुबळी येथे आणले आणि एन्काउंटर करण्याची धमकी देऊन मला सोडले. मला सोडण्यात दहा ते बारा पोलिसांचा सहभाग आहे. मी गोव्यात परत यायला तयार आहे, पण सीबीआयमार्फत प्रकरणाचा तपास व्हायला हवा, अशी मागणी फरार सिद्दिकी उर्फ सुलेमान खान याने एका व्हिडिओमध्ये केली. त्याने या व्हिडिओच्या माध्यमातून पोलिसांसह एका आमदारावरही आरोप केले. काल प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन सिद्दिकीचा व्हिडिओ प्रसिद्ध केला होता.       

हेही वाचा