जलस्रोत खात्याचे स्थानिकांना आवाहन
फोंडा : धारबांदोडा तालुक्यातील दूधसागर व रगाडा नदीवर बांधलेल्या बंधाऱ्यावर पाणी साठवण्यासाठी प्लेट्स घालण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे लोकांनी नदीजवळ गुरांना सोडू नये तसेच मासेमारी करण्यासाठी जिलेटिनचा स्फ़ोट करू नये असे आवाहन जलस्रोत खात्यातर्फे करण्यात आले आहे.
कुळे ते ओपा- खांडेपार येथील जलशुद्धीकरण प्रकल्पापर्यंत एकुण १३ बंधारे बांधण्यात आले आहे. पाणी अडवा पाणी जिरवा योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या बांधाऱ्यात प्लेट्स घालण्यात सुरुवात झाली आहे. हे सर्व बंधाऱ्यांमुळे ओपा प्रकल्पात आवश्यक पाण्याचा पुरवठा होतो. या बंधाऱ्यांद्वारेच येथे आवश्यक पाण्याची पातळी राखली जाते. यामुळे सर्व १३ बंधाऱ्यांची देखभाल जलस्रोत खात्यातर्फे नियमित केली जाते. येथे सुट्टीच्या दिवसांत बरेच पर्यटक येथे पिकनिकसाठी येतात. यामुळे येथे कचऱ्याची समस्यादेखील गेल्या काही वर्षांत वाढली आहे. येथे येणारे पर्यटक बऱ्याचदा दारू पिऊन हूल्लडबाजी करतात. बऱ्याचदा त्यांचे स्थानिकांशी याच मुद्द्यावरून वाजते.
या गोष्टींवर तोडगा म्हणून, जलस्रोत खात्याने कुळे व फोंडा पोलिसांना पत्र पाठवून बंधाऱ्याजवळील परिसरात अधून मधून गस्त घालण्याची विनंती केली आहे. धारबांदोडा तालुक्यातील जलस्रोत खात्याचे सहायक अभियंता सदानंद नाईक यांनी अधिक माहिती देताना लोकांनी सहकार्य करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. बंधाऱ्यात पाण्याचा मुबलक साठा व्हावा यासाठी येथे प्लेट्स घालण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे लोकांनी नदीजवळ गुरांना सोडू नये. तसेच बंधाऱ्यात मुबलक प्रमाणात पाण्याचा साठा झाल्यानंतर कुणीही जिलेटिनचा वापर करून मासेमारी करू नये असे आवाहन करण्यात आले आहे. जिलेटीनच्या स्फोटांमुळे बंधाऱ्यांचे नुकसान होण्याचा धोका उद्भवतो असे ते म्हणाले.