टॉवेलमुळे पोटातील आतडी फाटल्याने महिलेची प्रकृती चिंताजनक
लखनौ : उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये डॉक्टरांचा गंभीर निष्काळजीपणा समोर आला आहे . शासकीय रुग्णालयात एका महिलेने सिझेरियन प्रसूतीद्वारे मुलीला जन्म दिला. ऑपरेशननंतर डॉक्टरांनी महिलेच्या पोटात अनावधानाने टॉवेल ठेवला. काही दिवसांनी महिलेच्या पोटात दुखू लागले. तपासणी केली असता पोटात टॉवेल असल्याचे आढळून आले.
प्राप्त माहितीनुसार, शुक्रवारी १३ डिसेंबर रोजी एका खासगी रुग्णालयात डॉक्टरांनी महिलेवर शस्त्रक्रिया करून टॉवेल काढला मात्र या टॉवेलमुळे महिलेच्या पोटातील आतडी फाटल्याचे समोर आले आहे. सध्या डॉक्टरांनी सावधगिरीचा उपाय म्हणून महिलेला गंभीर अवस्थेत चंदीगडला रेफर केले आहे. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई केली जाईल, असे सीएमओने म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साधौली पिलखनी येथील रहिवासी असलेल्या करिश्मा सिंह हिची २५ नोव्हेंबर रोजी जिल्हा महिला रुग्णालयात सिझेरियन प्रसूती झाली. करिश्माने एका मुलीला जन्म दिला. ऑपरेशननंतर डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे करिश्माच्या पोटात टॉवेल राहील. करिश्माला सुरुवातीला कोणताच त्रास जाणवला नाही. मात्र त्यानंतर तिला पोटात असहनीय वेदना जाणवू लागल्या. असह्य वेदनांमुळे कुटुंबीय करिश्माला पुन्हा महिला रुग्णालयात घेऊन गेले. डॉक्टरांनी इंजेक्शन दिले. इंजेक्शन देताच महिलेचे पोट फुगायला लागले. यावेळी वेदना आणखी वाढल्या. यानंतर येथील डॉक्टरांनी काहीही न सांगता सदर महिलेला वैद्यकीय महाविद्यालयात रेफर केले. कुटुंबीयांनी करिश्माला एका खासगी रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तिच्यावर पुन्हा शस्त्रक्रिया करून पोटातील टॉवेल काढला. तिची प्रकृती लक्षात घेऊन खासगी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी तिला चंदीगड येथे पाठवले आहे. तिच्यावर येथे उपचार सुरू आहेत.
दरम्यान, डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचे प्रकरण समोर आल्यानंतर सीएमएचओ डॉ. प्रवीण कुमार यांनी याप्रकरणात लक्ष घातले आहे. जिल्हा महिला रुग्णालयात शस्त्रक्रियेदरम्यान निष्काळजीपणा का झाला ? कोणत्या डॉक्टरांनी ऑपरेशन केले ? यासर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी चौकशी समिती नियुक्त करण्यात आली असून चौकशीनंतर दोषीवर कारवाई केली जाईल.