ईडीच्या जाचाला कंटाळून या दाम्पत्याने आत्महत्या केली असावी असा दावा काँग्रेसचे वरिष्ठ नेता दिग्विजय सिंह यांनी केला आहे.
भोपाळ : भारत जोडो यात्रेवेळी राहुल गांधी यांना पिग्गी बँक भेट म्हणून दिलेल्या मुलाच्या आई-वडिलांनी आत्महत्या केल्याची घटना मध्यप्रदेशातील सिहोर येथे घडली आहे. अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चालवलेल्या छळवणुकीमुळे मनोज परमार आणि त्यांची पत्नी नेहा यांनी आत्महत्या केल्याचा आरोप मध्यप्रदेश काँग्रेसच्या नेत्यांचे मत आहे .
मिळालेल्या माहितीनुसार, आष्टा, सिहोर येथे राहणारे मनोज परमार आणि त्यांची पत्नी नेहा यांचे मृतदेह काल शुक्रवारी सकाळी छताला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. प्राथमिक दृष्ट्या ही आत्महत्या असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून तपास करत आहेत. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेदरम्यान मनोजच्या मुलांनी इतर मुलांच्या टीमसोबत पिग्गी बँक भेट दिली होती. तेव्हापासून मनोज यांचा परिवार प्रसिद्धीच्या झोतात आला होता. विशेष म्हणजे अलीकडेच ईडीने मनोजच्या इंदूर आणि आष्टा येथील ठिकाणांवर छापे टाकून कागदपत्रे जप्त केली होती.
दरम्यान काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी या घटनेसाठी ईडीच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना दोषी ठरवले आहे. मनोज काँग्रेसचे कार्यकर्ते होते म्हणून त्यांच्या परिवाराच्या मागे विनाकारण ईडीचा ससेमीरा लावण्यात आला. ईडीच्या सहाय्यक संचालक संजीत कुमार साहू यांनी छापा टाकला होता, असे दिग्विजय सिह म्हणाले. मनोजसाठी त्यांनी एका वकिलाचीही व्यवस्था केली होती पण ईडीच्या अधिकाऱ्यांनी वारंवार त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केल्याने त्यांनी आत्महत्या केली असावी असेही दिग्विजय सिंह म्हणाले.