नवी दिल्ली: इस्तंबूल-भारत सेक्टरदरम्यान कार्यरत इंडिगोच्या विमानांमध्ये तांत्रिक अडचणींमुळे हजारो प्रवाशांचे हाल होत आहेत. यामुळे भारतात येणारे शेकडो प्रवासी इस्तंबूलमध्ये अडकले आहेत. ही समस्या सोडवण्याकरिता इंडिगोने एक रिलीफ प्लेन सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामाध्यमातून सुमारे २० तासांत सर्व प्रवाशांना भारतात आणले जाईल.
गेल्या दोन दिवसांत इंडिगोच्या इस्तंबूल-दिल्ली आणि इस्तंबूल-मुंबई या दोन उड्डाणे प्रवाशांसाठी पर्यायी उड्डाणे किंवा मुक्कामाची व्यवस्था न करता रद्द करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. तेथील इतर अनेक उड्डाणे देखील उशीर झाली, यामुळे प्रवाशांना तुर्की एअरलाइन्सच्या पुढील फ्लाईट्स मिळाल्या नाहीत. यात इंडिगोच्या कोडशेअरचाही समावेश आहे.
इंडिगोतर्फे या क्षेत्रात बोईंग ७७७ विमाने चालवली जातात. या एका विमानात ५०० हून अधिक प्रवासी बसू शकतात. इस्तंबूल-दिल्ली 6E12 फ्लाइटच्या प्रवाशांना इतर पर्यायी विमानांमध्ये स्थानांतरित करण्यात आले. अडकून पडलेल्या प्रवाशांना विमानतळावर किंवा बाहेर राहण्यासाठी हॉटेल्स देण्यात आले आहे. तुर्कीएमध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांच्याकडे ई-व्हिसा आहे की नाही यांची खात्री केल्यानंतरच त्यांना ही सेवा प्रदान करण्यात आली, असे एअरलाइनने एका निवेदनात म्हटले आहे. इस्तंबूलमधील भारतीय दूतावास सध्या इंडिगो एअरलाइन्स आणि अडकलेल्या प्रवाशांच्या संपर्कात आहेत. त्यांच्यातर्फे देखील प्रवाशांसाठी विश्रामगृह, राहण्याची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, या महिन्याच्या सुरुवातीला, एअरहेल्प स्कोअर रिपोर्ट २०२४ ने इंडिगोला जगातील सर्वात वाईट एअरलाइन्सपैकी एक म्हटले आहे. यात १०९ एअरलाइन्सचे विश्लेषण करण्यात आले. यामध्ये इंडिगो १०३ व्या स्थानावर आहे. या अहवालात एअर इंडिया ६१व्या तर एअरएशिया ९४व्या क्रमांकावर आहे.
अन्य एका घडामोडीत, सौदी अरेबियातील जेद्दाहला जाणाऱ्या इंडिगो विमानाला वैद्यकीय कारणांसाठी पाकिस्तानातील कराची शहरातील जिना आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरावे लागले. नागरी विमान वाहतूक प्राधिकरण (CAA) च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी दिल्लीहून उड्डाण करणारे विमान पाकिस्तानी हवाई हद्दीत असताना एका वृद्ध प्रवाशाला त्रास जाणवू लागला.