देवी भराडीची जत्रा तिथीवर अवलंबून नसून देवीला कौल लावून ठरवण्यात येतो जत्रेचा दिवस
मालवणः प्रति पंढरपूर म्हणून कोकणात ओळखल्या जाणाऱ्या आणि भाविकांच्या नवसाला पावणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या जत्रोत्सवाची तारीख अखेर ठरली आहे. देवीची जत्रा २२ फेब्रुवारी २०२५ ला होणार असून गुरुवारी सकाळी देवीचा कौल घेऊन सदर तारीख निश्चित करण्यात आली आहे.
इतर देवस्थानांप्रमाणे आंगणेवाडीच्या देवी भराडीची जत्रा तिथीवर अवलंबून नसून देवीला कौल लावून देवीच्या आदेशाने जत्रेचा दिवस ठरविण्यात येतो. ही आगळी-वेगळी पद्धत महाराष्ट्रासह गोवा आणि कर्नाटक भागात प्रसिद्ध असून या जत्रोत्सवासाठी दरवर्षी सुमारे दहा लाखांहून अधिक भाविक देवीच्या चरणी नतमस्तक होतात.
जत्रेदरम्यान येणाऱ्या भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय न होता आई भराडी मातेचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी आंगणे कुटुंबिय तसेच आंगणेवाडीचे ग्रामस्थ मेहनत घेत असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष छोटू आंगणे यांनी दिली आहे.
अनेक व्यापारी, व्यावसायिकांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या या जत्रोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात मुंबईकर चाकरमानीही उपस्थिती दर्शवितात. राजकीय नेते, कलाकार, खेळाडू जत्रेस उपस्थिती दर्शवीत असल्याने ग्रामस्थ, मंदिर समिती बरोबरच शासनाची सुद्धा या जत्रेच्या नियोजनासाठी एक प्रकारची कसोटी लागते.
यंदाच्या जत्रेची तारीख जाहीर झाल्याने जत्रेच्या पूर्व तयारीला लवकरच प्रारंभ होणार आहे. यानिमित्ताने श्री देवी भराडीचे मंदिर १२ डिसेंबर ते १४ डिसेंबर असे तीन दिवस बंद राहणार असल्याची माहिती मिळाली आहे.