रापोणकारांचो सीफूड महोत्सव पर्यटनाला चालना देण्याचे व्यासपीठ

मंत्री रोहन खंवटे : हरमल समुद्रकिनारी महोत्सव दिमाखात सुरू

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
14th December, 11:05 pm
रापोणकारांचो सीफूड महोत्सव पर्यटनाला चालना देण्याचे व्यासपीठ

महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित पर्यटन मंत्री रोहन खंवटे, आमदार जीत आरोलकर व इतर.

हरमल : रापोणकारांचो सीफूड महोत्सव हा केवळ आपल्या समृद्ध पाक परंपरेचा उत्सव नाही, तर शाश्वत पर्यटनाला चालना देण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ आहे. अशा कार्यक्रमांद्वारे, केवळ पर्यटकांना आकर्षित करणेच नव्हे तर आपल्या स्थानिक परंपरा व समुदायांना साजरे करणे तसेच त्यांचे समर्थन करणे, हे राज्याचे उद्दिष्ट आहे. यासारख्या महोत्सवांमुळे गोव्यातील लोकांना लाभदायक आणि सर्वसमावेशक पर्यटन परिसंस्था तयार करण्यास मदत होते, असे प्रतिपादन पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी केले.
पर्यटन खाते, गोवा सरकारच्या वतीने आयोजित रापोणकारांचो सीफूड महोत्सवाची सुरुवात १३ डिसेंबर रोजी निसर्गरम्य हरमल समुद्रकिनारी झाली. या महोत्सवाच्या उद्घाटनानंतर ते बोलत होते. या महोत्सवात गोव्याचा समृद्ध असा किनारपट्टी वारसा आणि सीफूड संस्कृती साजरी करण्यात आली. यावेळी जीटीडीसीचे अध्यक्ष आणि सावर्डे मतदारसंघाचे आमदार डॉ. गणेश गावकर आणि मांद्रेचे आमदार जीत आरोलकर आणि पर्यटन संचालक सुनील अंचिपाका (आयएएस) उपस्थित होते.
या महोत्सवाने रापोणकार (पारंपरिक मच्छीमार), अन्य मान्यवर आणि उत्साही अभ्यागतांना एकत्र आणले, ज्यात परदेशी पर्यटकांचा समावेश होता. उपस्थितांनी अस्सल समुद्री खाद्यपदार्थांचा आनंद लुटला. यावेळी उपस्थित मान्यवर आणि परदेशी अतिथींना गोव्याचे पारंपरिक घुमट सादर करण्यात आले, जे गोव्याचा सांस्कृतिक अभिमान आणि आदरातिथ्याचे प्रतीक आहे.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी शाइन ऑन बँड, कॉस्मिक साउंड लाइव्ह सेट, उस्मान आणि ओजी शेझ यांच्या उत्साहपूर्ण सादरीकरणाचा समावेश होता. यात स्थानिक आणि पर्यटक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.
मांद्रेचे आमदार जीत आरोलकर म्हणाले, हा महोत्सव आपल्या सांस्कृतिक परंपरेचे प्रतिबिंब असून आपल्या स्थानिक मच्छिमारांच्या प्रयत्नांचे प्रदर्शन करण्याची तो संधी देतो.
जीटीडीसीचे अध्यक्ष डॉ. गणेश गावकर यांनी या उपक्रमाची प्रशंसा केली आणि स्थानिक वारसा तसेच परंपरा साजरे करणाऱ्या कार्यक्रमांना, प्रोत्साहन देण्यासाठी गोव्याच्या वचनबद्धतेची पुष्टी केली.
उद्या महोत्सवाचा समारोप
जीटीडीसीचे उपमहाव्यवस्थापक मार्केटिंग दीपक नार्वेकर यांनी आभार मानले. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी पर्पल रेन, ग्रॅव्हिटी बँड, डीजे कॅट्रिन आणि डीजे इव्हान यांचे सादरीकरण होणार. तर तिसऱ्या दिवशी द इम्पीरियल बँड, फोरफ्रंट तसेच डीजे अफरोज सय्यद आणि तेरी मिको यांचे सादरीकरण पहायला मिळेल. १५ रोजी महोत्सवाचा समारोप होणार आहे.

हेही वाचा