पणजी : गोव्याचा सातत्याने विकास करणे हीच स्व. मनोहर पर्रीकर यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे मत मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले. त्यांनी शुक्रवारी मनोहर पर्रीकर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या मिरामार येथील समाधी स्थळाला भेट देऊन आदरांजली वाहिली. यावेळी पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा, जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर, उत्पल पर्रीकर व अन्य अधिकारी उपस्थित होते.
गोव्याचा विकास करणे हाच पर्रीकरांचा ध्यास होता. गोव्याच्या पायाभूत सुविधांच्या विकासात त्यांचा वाटा मोठा आहे. त्यांनी त्यांच्या काळात दूरदृष्टीने गोव्यात पायाभूत प्रकल्प सुरू केले. त्यांनी योजलेले अनेक प्रकल्प आज आम्ही पूर्णत्वास नेले आहेत. यापुढेही त्यांना अपेक्षित असणाऱ्या दृष्टिकोनातून आम्ही गोव्यासाठी विविध प्रकल्प करणार आहोत. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही गोव्याचे प्रशासन तसेच पायाभूत सुविधा भक्कम करत आहोत, असे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.
पर्रीकरांनी हातात घेतलेली कामे पूर्ण झाली आहेत. त्यांचा काळात गोवा साधन सुविधा विकास महामंडळाचे (जीएसआयडीसी) त्यांच्या कारिर्दीत सुरू झाले होते. जीएसआयडीसीसाठी स्वतंत्र इमारत असावी असे त्यांना वाटत होते. याबाबत त्यावेळी प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मात्र काही कारणास्तव तो पुढे गेला नाही. येणाऱ्या काळात आम्ही हे काम देखील पूर्ण करणार आहोत. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात गोव्यासाठी घेतलेले सर्व निर्णय आम्ही मार्गी लावले आहेत, असे ते म्हणाले.
मनोहर पर्रीकर हे उत्तुंग व्यक्तिमत्व होते. त्यांनी गोव्यासाठी तसेच संरक्षण मंत्री म्हणून देशासाठी केलेले भरीव काम कायमस्वरूपी लक्षात राहील. त्यांच्या प्रामाणिकपणामुळे ते सदैव जनतेच्या लक्षात राहतील. त्याकाळी आमच्यात वैचारिक मतभेद असले तरी ते माझे जवळचे मित्र होते. त्यांच्या मृत्यूने गोव्याचे नुकसान झाले. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हे त्यांचा वारसा पुढे चालवत आहेत, असे आलेक्स सिक्वेरा म्हणाले.