सर्वाधिक सार्वजनिक तक्रारींचा निपटारा केल्याबद्दल गौरव
वास्कोः सुशासन सप्ताहानिमित्त मुरगाव उपजिल्हाधिकारी कार्यालयाने आयोजित केलेल्या मुरगाव तालुकास्तरीय खास शिबिरात सर्वाधिक सार्वजनिक तक्रारींचे निपटारा केल्याबद्दल सर्वोत्कृष्ट उपजिल्हाधिकारी (दक्षिण गोवा) म्हणून मुरगावचे उपजिल्हाधिकारी भगवंत करमली यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते सदर पुरस्कार देण्यात आला. याप्रसंगी कायदामंत्री आलेक्स सिक्वेरा, मडगावचे आमदार दिगंबर कामत तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.
येथील रवींद्र भवनात (बायणा) शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या खास शिबिरात ४६जणांनी आपली गार्हाणी मांडली होती. त्यावेळी ५४ म्युटेशन अर्ज निकालात काढण्यात आले होते. ५९ जणांना निवास प्रमाणपत्रे, १२ जणांना जात प्रमाणपत्रे, ५जणांना डोमिसाईल प्रमाणपत्र देण्यात आली होती.
मुरगाव पालिकेनेही तीन जणांना उत्पन्न दाखला दिला होता. चारजणांना रुपांतरण सनदा देण्यात आल्या होत्या. पोर्टलवर आलेल्या सार्वजनिक तक्रार निवारण प्रणालीच्या सर्व तक्रारींची दखल घेऊन निकालात काढण्यात आल्या होत्या.