गोवाः म्हादई; सभागृह समितीची बैठक येत्या १० जानेवारीला

म्हादईचे पाणी​ बेकायदेशीररीत्या वळवण्याचे प्रयत्न कर्नाटककडून सुरुच

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
24th December, 11:01 pm
गोवाः म्हादई; सभागृह समितीची बैठक येत्या १० जानेवारीला

पणजी : म्हादई प्रश्नी स्थापन करण्यात आलेल्या सभागृह समितीची बैठक येत्या १० जानेवारी रोजी होणार आहे. प्रथम ही बैठक २७ डिसेंबरला घेण्याचे निश्चित झाले होते. परंतु, काही कारणामुळे बैठक १० जानेवारीला घेण्याचे निश्चित झाले आहे. 

गोव्याची जीवनदायिनी असलेल्या म्हादई नदीचे पाणी​ बेकायदेशीररीत्या वळवण्याचे प्रयत्न कर्नाटककडून गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहेत. याबाबत पाणी तंटा लवादाने अंतिम निवाडा दिल्यानंतरही कर्नाटककडून छुप्या पद्धतीने हे काम सुरूच आहे.

 यावरून प्रत्येक विधानसभा निवडणूक आणि अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने येत असतात. पाणी तंटा लवादाने या विषयी दिलेल्या अंतिम निवाड्यानंतर गोव्यासह कर्नाटक आणि महाराष्ट्रही सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. 

असे असताना काही महिन्यांपूर्वी केंद्रीय जल आयोगाने कर्नाटकच्या कळसा-भांडुरा प्रकल्पासंदर्भातील सुधारित प्रकल्प अहवालास (डीपीआर) मान्यता दिल्याने राज्य विधानसभा अधिवेशनात हा वाद चिघळला.

त्यावेळी सरकारने म्हादई संदर्भातील प्रत्येक निर्णय घेण्यासाठी जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांच्या अध्यक्षतेखाली सभागृह समितीची स्थापना केली आहे. यात सर्वपक्षीय आमदारांचा समावेश आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या समितीची बैठक झालेली नाही. अखेर येत्या १० जानेवारी रोजी सभागृह समितीची बैठक निश्चित करण्यात आली आहे.             

हेही वाचा