वाहनचालकास डुलकी लागल्याने घडला अपघात, सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
फोंडा : पणसुले- धारबांदोडा येथे आज बुधवारी दुपारी १.१५ वाजण्याच्या सुमारास रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या दोन ट्रकना ठोकर दिल्यानंतर सुसाट वेगाने धावणाऱ्या ट्रेलरची घराला धडक बसली. यात ट्रेलर चालक रवींद्र श्रीनाथ कुमार (३४, उत्तर प्रदेश) हा कॅबिनमध्ये अडकून पडला. स्थानिक लोकांनी धाव घेऊन किरकोळ जखमी झालेल्या चालकाला बाहेर काढले. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. ट्रेलर चालकाला डुलकी लागल्याने अपघात घडल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. फोंडा पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला आहे.
प्राप्त माहितीनुसार जीए - ०६-टी -५०५५ क्रमांकाचा ट्रेलर ४० टन लोखंडी सळ्या घेऊन मोले येथून फोंडा मार्गे पणजीला जात होता. प्रतापनगरहुन काही अंतर पुढे गेल्यानंतर ट्रेलर चालकाला डुलकी लागली. त्यामुळे ट्रेलर सर्व प्रथम रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या जीए - ०८-व्ही -४८४२ क्रमांकाच्या ट्रक ला धडक दिल्यानंतर त्यामागे असलेल्या केए -२२-सी -२०९२ क्रमांकाच्या ट्रकला बसली. चालकाचा ट्रेलर वरील ताबा सुटल्याचे पुढे जावून ट्रेलरची धडक घराला बसली. त्यावेळी ट्रेलर चालक कॅबिन मध्ये अडकून पडला. स्थानिक लोकांनी धाव घेऊन अडकून पडलेल्या चालकाला बाहेर काढले. किरकोळ जखमी झालेल्या चालकाला त्वरित पिळये आरोग्य केंद्रात नेण्यात आले. फोंडा पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला.
गॅरेज समोरील रस्त्याच्या बाजूला गेल्या ३ महिन्यांपासून दोन ट्रक पार्क करण्यात आले होते. त्यापैकी अपघातात अधिक नुकसान झालेला केए -२२-सी -२०९२ क्रमांकाच्या ट्रकची विक्री करण्यात आली होती. नवीन मालक गुरुवारी सकाळी सदर ट्रक घेऊन जाणार होता. शिल्लक असलेले काम करण्यासाठी मॅकेनिकला वेळ नसल्याने ट्रक रस्त्याच्या बाजूला पार्क करून ठेवण्यात आला होता. पण सुसाट वेगाने धावणाऱ्या ट्रेलरची धडक बसल्याने नवीन मालकाने ताबा घेण्यापूर्वीच पार्क केलेला ट्रक अपघातग्रस्त झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.