१२ जणांना वाचवण्यात यश मात्र यातील एका लहान मुलासह पाच जणांची प्रकृती चिंताजनक; गोमेकॉत दाखल
पणजी नाताळची सुट्टी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात पर्यटकांचे मोठ्याप्रमाणावर आगमन झाले आहे. किनारी भाग पर्यटकांच्या उपस्थितीमुळे गजबजलेला असल्याचे दृष्टीस पडत आहे. या दरम्यान कळंगूट येथे पर्यटकांना समुद्रात जलसफरीवर घेऊन गेलेली बोट उलटल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. दुर्घटनेत सुर्यकांत पोफळकर (४५, रा. खेड रत्नागिरी) यांचा बुडून मृत्यू झाला. तर त्यांच्या पाच वर्षीय मुलासह पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे. गोवा वैद्यकिय इस्पितळात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. खेड- महाराष्ट्रातील पोफळकर, चिंचविलकर व हंबीर या कुटूंबांमधील १३ जण गोव्यात नाताळच्या सुट्टी निमित्त आले होते.
मिळालेल्या महितीनुसार, ही घटना आज २५ रोजी सकाळी ११ च्या सुमारास घडली. १३ पर्यटकांना घेऊन जॉन वॉटर स्पोर्टस् ही जलसफरी करणारी बोट समुद्रात उतरली. सुमारे शंभर मीटर अंतरावर या बोटचे इंजिन वाळूत रुतून पडले आणि इंजिन बंद पडले. त्याचवेळी समुद्राच्या लाटेची जोरदार धडक बसल्याने बोट पाण्यात कलंडली. तत्पुर्वी बोटने या ठिकाणी एक गोलाकार फेरी मारली होती व दुसरी फेरी मारतेवेळी ही दुर्घटना घडली.
बोट कलंडल्याने सर्व पर्यटक प्रवासी पाण्यात फेकले गेले. या अपघातात सुर्यकांत पोफळकर (४५) यांचे तोंड बोटीला धडकले व ते रंक्तबंबाळ होऊन त्यांचा मृत्यू झाला. सर्व प्रवाशांनी लाईफ जॅकेट घातले होते. अपघात घडताच किनार्यावरील बोटवाल्यांसह जीवरक्षक, किनारी व पर्यटक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी बुडणार्या या पर्यटकांसह बोटवरील दोघा कर्मचार्यांना पाण्याबाहेर काढले. जीवरक्षक तसेच रूग्णवाहिकेतील कर्मचार्यांनी या पर्यटकांना सीपीआर दिला व सर्वांना कांदोळी येथील प्राथमिक केंद्रात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी सूर्यकांत पोफळकर यांना मृत घोषित केले.
कांदोळी आरोग्य केंद्राचे आरोग्यधिकारी डॉ. रोशन नाझारेथ यांच्या मार्गदर्शनाखाली या जखमींवर उपचार केले. प्रकृती चिंताजनक असलेल्या पाच जणांना गोमेकॉत हलविले. तर इतरांना उपचारार्थानंतर डिस्चार्ज देण्यात आला. घटनेची माहिती मिळताच किनारी सुरक्षा पोलीस निरिक्षक अजित उमर्ये, पर्यटक सुरक्षा पोलीस निरीक्षक जतिन पोटदार व कळंगुट पोलीस निरीक्षक परेश नाईक यांनी सहकार्यांसह घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. किनारी सुरक्षा पोलीस उपअधीक्षक सलीम शेख यांनीही घटनास्थळी तसेच गोमेकॉत भेट देऊन जखमी पर्यटकांच्या प्रकृतीचा आढावा घेतला.
भारती हंबीर (२९), विहान चिंचविलकर (४), शौर्य पोफळकर (५), जयंत चिंचवलिकर (६५) व जयंती चिंचविलकर (५०) या पाच जणांवर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. सारिका (३५), संचिता (१४), रजनी (२६), सुरज (२९) विशांत (५) निवृत्ती (४०) व रेश्मा (३२) यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
खेड महाराष्ट्रातील हे पर्यटक स्वतःच्या खासगी वाहनातून बुधवारीच गोव्यात पर्यटनासाठी दाखल झाले होते. कळंगुट समुद्रकिनारी पोटल्यावर ते जलसफरीचा आनंद लुटण्यासाठी बोटचे तिकिट त्यांनी काढले. मात्र ही पर्यटनस्वारी त्यांच्या जीवावर बेतली. बोट पाण्यात उलटल्याने सूर्यकांत पोफळकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मयत सूर्यकांत हा इलेक्ट्रीशियन म्हणून खासगी व्यवसाय करत होते.
वॉटर स्पोटर्स जलसफरीवेळी सुरक्षतेच्या अनुषंगाने आवश्यक खबरदारी नेहमीच घेतली जाते. आजची घटना दुर्दैवी असून बोटचे इंजिन वाळूत रूतल्याने बोट वळली व इंजिन अचानक बंद पडले. त्याचवेळी मोठी लाट आली आणि बोटला धडकली. त्यामुळे बोट पाण्यात कलंडली. सर्वांना लाईफ जॅकेट दिली होती. ही घटना घडताच आमचे इतर क्रू कर्मचार्यांनी पाण्यात धाव घेत सर्वांना बाहेर काढले. असे बोटमालक अँथनी कुतिन्हो यांनी दुर्घटनेनंतर सागितले.
दरम्यान बोट उलटल्यानंतर बुडणाऱ्या पर्यटकांना वाचवण्यात लाईफ गार्ड कॅप्टन सुजन सीताराम नागवेकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या या धाडसी कृत्यामुळे बुडणाऱ्या पाच वर्षाच्या चिमुरड्याचा जीव वाचला. सुजनने प्राथमिक उपचार आणि वेळेवर सीपीआर दिल्याने मुलाचे प्राण वाचले. त्याच्या या कामाबद्दल सर्वांकडून त्याचे कौतुक होत आहे.