आपच्या अमित पालेकरांचा सवाल
पणजी : आज पहाटे पाच वाजता सिद्दीकी (सुलेमान) खान गुन्हे शाखेच्या कोठडीतून आयआरबी कॉन्स्टेबल अमित नाईक सोबत पसार झाल्याने तुरुंग प्रशासन तसेच गोवा पोलिसांच्या एकंदरीत कार्यप्रणालीवर संशय निर्माण झाला आहे. दरम्यान सिद्दीकी (सुलेमान) खान सारख्या गुन्हेगारावर लक्ष ठेवण्यासाठी क्राईम ब्रांचने एकाच कॉन्स्टेबलची नेमणूक का केली? असा सवाल आपचे राज्य निमंत्रक अमित पालेकर यांनी केला आहे. या प्रकरणी क्राईम ब्रांचच्या अधीक्षकांचे निलंबन करून त्यांची चौकशी करावी असेही ते यावेळी म्हणाले.
दरम्यान याप्रकरणी डीआयजी वर्षा वर्मा यांनी पत्रकारांना माहिती दिली. पोलीस कोठडीतून कॉन्स्टेबल अमित नाईकच्या साथीने पळून गेलेल्या सिद्दीकी (सुलेमान) खानचा शोध सुरू असून याप्रकरणी रीतसर गुन्हा नोंदवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सदर प्रकरणाची खोलवर चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून फरार पोलीस तसेच इतर कर्मचाऱ्यांकडून याबाबत हलगर्जीपणा झाला असल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असेही त्या म्हणाल्या.
तुरुंगातून पलायन केलेल्या सिद्दीकी (सुलेमान) खान आणि पोलीस कॉन्स्टेबल अमित नाईकचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. त्यांना लवकरात लवकर पकडण्यासाठी गोवा पोलीस शेजारील राज्यांच्या पोलिसांच्या संपर्कात आहेत. दरम्यान जमीन घोटाळे प्रकरणांत अटक झालेल्या सिद्धीकी खानला कधीच विशेष वागणूक दिली नसल्याचे निवेदन आज सकाळी गोवा पोलिसांनी जारी केले होते.
दरम्यान, जमीन हडप प्रकरणी गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कोठडीत असलेला सराईत गुन्हेगार सिद्दीकी उर्फ सुलेमान खान (५४, रा. म्हापसा) हा पसार झाल्याची धक्कादायक बातमी सकाळी ५ वा. घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे त्याच्या सुरक्षेत तैनात असलेल्या आयआरबी पोलीस कॉन्स्टेबल अमित नाईक याने पलायन करण्यात मदत केली. सदर घटनेची वाच्यता होताच विशेष चौकशी पथक आणि गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. या घटनेनंतर गुन्हा शाखेच्या सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पूर्व नियोजित कट आखत संशयिताने पलायन केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.