डीआयजी वर्षा शर्मा यांचा कडक इशारा
पणजी : आज पहाटे पाच वाजता सिद्दीकी (सुलेमान) खान गुन्हे शाखेच्या कोठडीतून आयआरबी कॉन्स्टेबल अमित नाईक सोबत पसार झाल्याने तुरुंग प्रशासन तसेच गोवा पोलिसांच्या एकंदरीत कार्यप्रणालीवर संशय निर्माण झाला आहे. दरम्यान याप्रकरणी डीआयजी वर्षा वर्मा यांनी पत्रकारांना माहिती दिली.
पोलीस कोठडीतून कॉन्स्टेबल अमित नाईकच्या साथीने पळून गेलेल्या सिद्दीकी (सुलेमान) खानचा शोध सुरू असून याप्रकरणी रीतसर गुन्हा नोंदवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सदर प्रकरणाची खोलवर चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून फरार पोलीस तसेच इतर कर्मचाऱ्यांकडून याबाबत हलगर्जीपणा झाला असल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असेही त्या म्हणाल्या.
तुरुंगातून पलायन केलेल्या सिद्दीकी (सुलेमान) खान आणि पोलीस कॉन्स्टेबल अमित नाईकचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. त्यांना लवकरात लवकर पकडण्यासाठी गोवा पोलीस शेजारील राज्यांच्या पोलिसांच्या संपर्कात आहेत. दरम्यान जमीन घोटाळे प्रकरणांत अटक झालेल्या सिद्धीकी खानला कधीच विशेष वागणूक दिली नसल्याचे निवेदन आज सकाळी गोवा पोलिसांनी जारी केले होते.
दरम्यान, जमीन हडप प्रकरणी गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कोठडीत असलेला सराईत गुन्हेगार सिद्दीकी उर्फ सुलेमान खान (५४, रा. म्हापसा) हा पसार झाल्याची धक्कादायक बातमी सकाळी ५ वा. घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे त्याच्या सुरक्षेत तैनात असलेल्या आयआरबी पोलीस कॉन्स्टेबल अमित नाईक याने पलायन करण्यात मदत केली. सदर घटनेची वाच्यता होताच विशेष चौकशी पथक आणि गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. या घटनेनंतर गुन्हा शाखेच्या सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पूर्व नियोजित कट आखत संशयिताने पलायन केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी पहाटे २.३० ते ३.०० च्या सुमारास घडली. संशयित कॉन्स्टेबलने सुलेमान खानला आधी कोठडीतून बाहेर काढले. नंतर सुलेमानला आपल्याच दुचाकीवर बसवून त्याने पलायन केले. मिळालेल्या माहितीप्रमाणे हे दोघे कोणत्या दिशेने गेलेत याचा राज्य पोलीस सीसीटीव्हीच्या माध्यमाने माग काढण्याचा प्रयत्न करत आहेत. संशयित सिद्दीकी(सुलेमान) खान यास मागे १२ नोव्हेंबर रोजी एसआयटीने हुबळीहून अटक केली होती. गेल्या चार वर्षांपासून तो फरार होता. संशयितावर जमीन हडप प्रकरणे, खून, खूनी हल्ला व फसवणूक या सारखे देशभरात एकूण १५ गुन्हे नोंद आहेत.