वास्को : वरुणापुरी येथे सीबीआयची छापेमारी; 'एटीएफ'ची तस्करी करणाऱ्या चौघांना पकडले रंगेहात

एव्हिएशन टर्बाइन इंधनाच्या (एटीएफ) तस्करीत इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडचे अधिकारीही गुंतल्याचा संशय सीबीआयने व्यक्त केला असून तपास सुरू आहे.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
13th December, 12:14 pm
वास्को : वरुणापुरी येथे सीबीआयची छापेमारी; 'एटीएफ'ची तस्करी करणाऱ्या चौघांना पकडले रंगेहात

 पणजी : केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाने वास्को येथील गांधीनगर-वरुणापुरी येथे धडक छापेमारी केल्याचे समोर आले आहे.  या छापेमारीत सापळा रचून इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या तेल साठ्यातून विमानात वापरल्या जाणाऱ्या एव्हिएशन टर्बाइन इंधनाची (एटीएफ) तस्करी करणाऱ्या ४ जणांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. 




समोर आलेल्या माहितीनुसार, गांधीनगर-वरुणापुरी येथे एटीएफ या ज्वलनशील पदार्थाची तस्करी होत असल्याची  गोपनीय माहिती  सीबीआयला मिळाली होती. त्यानुसार सदर ठिकाणी जात पथकाने गुरुवारी सायंकाळी छापेमारी केली. यावेळी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या तेल साठ्यातून एटीएफच्या तब्बल ३ हजार लीटर तेलाची तस्करी होत असल्याचे समोर आले. यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या मुख्य संशयित विठ्ठल चव्हाणसह मंतेश पवार, महेंदर पास्सी,मैनूद्दीन शेख या तिघा  साथीदारांच्याही सीबीआयच्या विशेष पथकाने मुसक्या आवळल्या. 


Aviation Fuels - White Petrol Latest Price, Manufacturers & Suppliers


जप्त केलेल्या एव्हिएशन टर्बाइन इंधन (एटीएफ)च्या तेलाची किमत बाजारभावानुसार सुमारे ३ लाख रुपये इतकी आहे. याचसोबत आरोपींकडून वापरण्यात आलेली दोन वाहने देखील जप्त करण्यात आली आहेत दरम्यान सीबीआयने चौघांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा तसेच भा.न्या.सं च्या विविध कलमांखाली गुन्ह्यांची नोंद केली आहे. प्राप्त माहितीनुसार, या रॅकेटमध्ये इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकाऱ्यांच्या सहभागाची शक्यता देखील पडताळून पाहण्यात येत असून, त्या अनुषंगाने चौकशी सुरू आहे.

हेही वाचा