आमदार अॅड. कार्लुस फेरेराच्या मॉर्फ व्हिडिओचे प्रकरण
म्हापसा : काँग्रेस आमदार अॅड. कार्लुस फेरेरा यांच्या मॉर्फ केलेल्या अश्लील व्हिडिओच्या आधारे खंडणी उकळण्याच्या प्रकरणातील संशयित आरोपी कुकेश रावता (रा. मूळ ओडिशा) याची सशर्त जामिनावर म्हापसा न्यायालयाने सुटका केली.
म्हापसा प्रथम न्यायालयाने गुरुवारी (दि.१२) संध्याकाळी संशयित आरोपीचा २० हजार रुपये हमी रक्कम आणि तितक्याच रकमेच्या हमीनुसार न्यायाधीश वैशाली लोटलीकर यांनी हा जामीन अर्ज मंजूर केला. तसेच फिर्यादी व साक्षीदारांना धमकावू नये, न्यायालय आणि चौकशी अधिकाऱ्यांना चौकशीत सहकार्य करणे, न्यायालयाच्या विना परवानगी देशाबाहेर न जाणे, ओळखपत्र आणि दोघा नातेवाईकांची सविस्तर माहिती सादर करणे, अशा अटीही लागू केल्या आहेत.
या जामीन अर्जावर बुधवारी ११ रोजी न्यायालयात सुनावणी झाली होती व निकाल राखून ठेवण्यात आला होता. संशयिताच्या वतीने अॅड. कपिल केरकर, तर सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील तेजस पवार यांनी युक्तिवाद केला. तसेच देविदास पणजीकर या हळदोणातील मतदाराची हस्तक्षेप याचिका न्यायालयाने बुधवारीच फेटाळून लावली होती. त्यांच्यावतीने अॅड. विनायक पोरोब यांनी युक्तिवाद केला होता.
दरम्यान, आमदार कार्लुस फेरेरा यांनी ५ डिसेंबर २०२३ रोजी याप्रकरणी गुन्हा शाखेत तक्रार दाखल केली होती. तर संशयिताला गुन्हा शाखेने एक वर्षानंतर २ डिसेंबर २०२४ रोजी अटक केली होती. संशयित सध्या कोलवाळ कारागृहातील न्यायालयीन कोठडीत होता.
माध्यमांशी बोलताना अॅड. कपिल केरकर म्हणाले की, संशयित निर्दोष असून तो व्हिडिओ कोणाकडेही उपलब्ध नाही. हा व्हिडिओ आरोपीने दिलेला नाही किंवा पोलिसांनी त्याच्याकडून जप्त केलेला नाही.
संशयिताने उकळली होती ५ लाखांची खंडणी
खंडणीची रक्कम न दिल्यास हा मॉर्फ केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करू, अशी धमकी फिर्यादीला संशयिताने दिली होती. त्यानुसार फिर्यादीकडून संशयिताने एकूण ५ लाखांची खंडणी रक्कम उकळली होती. सुरुवातीला ५५ हजार रुपये फिर्यादीने संशयिताला खंडणीच्या स्वरूपात दिले होते. त्यानंतर संशयिताने ५ कोटी रुपयांची खंडणीची मागणी केली होती.
संशयित कोठडीत असतानाच व्हिडिओ व्हायरल
गेल्या दि. २ डिसेंबर रोजी संशयित कुकेश रावता यास गुन्हा शाखेकडून अटक झाली होती. पोलिसांनी संशयिताकडील मोबाईल फोन जप्त केला होता. पोलीस कोठडीत असताना संशयिताकडील हा मॉर्फ व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामुळे राज्यातील राजकारणात हा विषय चर्चेचा बनला आहे.