अंतर्गत मतभेद विसरा; पाटकरांना साथ द्या !

काँग्रेस प्रभारी माणिकराव ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आवाहन


11th December, 11:25 pm
अंतर्गत मतभेद विसरा; पाटकरांना साथ द्या !

पत्रकार परिषदेत बोलताना माणिकराव ठाकरे. सोबत डॉ. अंजली निंबाळकर, अमित पाटकर आणि युरी आलेमाव.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : पक्षातील अंतर्गत मतभेद विसरून काँग्रेस नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आगामी जिल्हा पंचायत आणि विधानसभा निवडणुकीसाठी नव्या दमाने मैदानात उतरावे. या निवडणुका प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्याच नेतृत्वाखाली होतील. त्यामुळे सर्वांनी पाटकर यांना सहकार्य करून पक्षाला बळकट करावे, असा सल्ला काँग्रेस प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी बुधवारी झालेल्या प्रदेश काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत दिला.
प्रभारी​ ठाकरे यांच्यासह प्रभारी सचिव डॉ. अंजली निंबाळकर, प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार कार्लुस फेरेरा, माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्यासह काँग्रेसच्या विविध समित्यांचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. प्रदेश काँग्रेसच्या कार्यकारिणी बैठकीत पक्षाला बळकटी देण्यासह आगामी जिल्हा पंचायत आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीबाबत चर्चा करण्यात आली. सरकारी नोकरी देण्याच्या आमिषाने सर्वसामान्य जनतेला लुटल्याची अनेक प्रकरणे गेल्या काही दिवसांत उघडकीस आली आहेत. या प्रकरणांवरून एकत्र येऊन लढा उभारण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना बैठकीत करण्यात आल्या आहेत. प्रभारी​ सचिव डॉ. अंजली निंबाळकर पुढील काही दिवसांत गट स्तरावर जाऊन तेथील कार्यकर्त्यांच्या भेटी घेतील. पुढील काही महिन्यांत काँग्रेसला सर्वच मतदारसंघांत बळकटी मिळवून देण्यावर आपला भर राहील, असे माणिकराव ठाकरे म्हणाले.
आघाडीचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील : निंबाळकर
आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीत विरोधी पक्षांची आघाडी कायम राहणार का, असा प्रश्न पत्रकारांनी केला असता, राज्यभर दौरे करून आम्ही​ जनतेचे मत जाणून घेऊन ते पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवू. त्यानंतर आघाडी करून पुढील निवडणुका लढवायच्या की नाही, याचा निर्णय काँग्रेस पक्षश्रेष्ठी घेतील, असे डॉ. अंजली निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
बदनामी​साठीच भाजपकडून व्हिडिओ व्हायरल
काँग्रेस आमदाराच्या व्हायरल व्हिडिओबाबत पत्रकारांनी प्रभारी माणिकराव ठाकरे यांना छेडले असता, भाजपला काँग्रेस पक्ष आणि पक्षाच्या नेत्यांची बदनामी करायची आहे. त्यामुळे भाजप नेत्यांनी काँग्रेस आमदाराचा व्हिडिओ जाहीर केल्याचे नमूद केले. याबाबतची तक्रार आमदाराने केली असून पोलीस त्याचा तपास​ करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.