संगीत संमेलन हा आकाशवाणीचा एक फार मोठा उपक्रम असे. डिजिटल युग सुरू होण्याअगोदरच्या काळात याचा एक प्रचंड दबदबा होता. आकाशवाणीचा आणखीन एक देशव्यापी वार्षिक कार्यक्रम म्हणजे कवी संमेलन.
आकाशवाणी संगीत संमेलनाचा इतिहास फार जुना आहे. या संगीत संमेलनात भाग घ्यायला मिळणं म्हणजे गायक वादकांसाठी प्रतिष्ठा मानली जायची. मोठमोठ्या दिग्गज संगीत कलाकारांनी या कार्यक्रमात आपली कला पेश केली आहे. या संमेलनाचे गायक वादक ठरवल्यावर एका महिन्यात विविध राज्यांतल्या सुनिश्चित ठिकाणी ख्याल गायनाचे कार्यक्रम होतात. रसिकांना, श्रोत्यांना रीतसर आमंत्रण देऊन बोलावून हे कार्यक्रम होत.
पणजीला झालेल्या कार्यक्रमात हजर राहण्याची संधी आम्हाला मिळाली. सुमारे एका तासाचे हे कार्यक्रम होत. गायकाला घड्याळाकडे लक्ष ठेवून बरोबर अचूकपणे एका तासात किंवा सांगितलेल्या वेळेत गायन वा वादन संपवावे लागे. प्रेक्षकांनाही आवाज न करण्याची विनंती केली जायची. कारण जास्त गोंगाट झाल्यास ध्वनीमुद्रणात तो घुसण्याची शक्यता असते.
विविध ठिकाणी ध्वनीमुद्रीत केलेले हे कार्यक्रम कालांतराने व्यवस्थितपणे वेळापत्रक करून एकाच वेळी रात्री देशभर प्रसारित व्हायला सुरुवात व्हायची. आकाशवाणीच्या नवी दिल्ली मुख्यालयातून हे संगीत कार्यक्रम प्रसारित व्हायचे. देशभर एकाच वेळी ते सहक्षेपित केले जायचे. विविध भारतीचे ‘संगीत सरिता’, ‘अनुरंजनी’, ‘स्वर सुधा’ हे कार्यक्रम ऐकून आम्ही आमच्या शास्त्रीय संगीत जाणिवेला दिशा दिली. शिकण्याच्या या प्रक्रियेत आकाशवाणी संगीत संमेलनाचा जरूर समावेश होता.
दर वर्षी या संगीत संमेलनाची एक पुस्तिका छापली जायची. त्यात प्रत्येक पानावर दिनांक, एकेका दिवसाचे कलाकार, वेळ, ते वाजवणार तो राग यांची सविस्तर माहिती असायची. त्या प्रमाणे आम्ही आवडीचा कलाकार व आवडीचा राग बघून वाट बघत असू. कर्नाटक शास्त्रीय संगीताचाही यात समावेश असायचा.
हे संगीत संमेलन हा आकाशवाणीचा एक फार मोठा उपक्रम असे. डिजिटल युग सुरू होण्या अगोदरच्या काळात याचा एक प्रचंड दबदबा होता. आकाशवाणीचा आणखीन एक देशव्यापी वार्षिक कार्यक्रम म्हणजे कवी संमेलन. हे कवी संमेलन २५ जानेवारीला म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला प्रसारित होतं. त्या अगोदर प्रत्येक भाषेतील एक कवी व त्याची कविता निवडण्याची देशव्यापी प्रक्रिया सुरू होते. यात संधी मिळावी म्हणून कवींमध्ये कमालीची उत्सुकता असते. कोंकणीची प्रक्रिया पणजी केंद्राद्वारे सुरू होते. अनेक कविता मागवून घेऊन त्यातून शॉर्ट लिस्ट तयार केली जाते. नंतर परीक्षक मंडळ एकच कविता निवडतो जी अनुवादासहीत दिल्लीला पाठवली जाते. अशा प्रकारे कोंकणीतील एका कवीला प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय कवी संमेलनात कविता सादर करण्याची संधी मिळते.
कविता वाचताना तिथं इंग्रजी किंवा हिंदी अनुवाद वाचला जातो. जो कार्यक्रम २५ जानेवारीला प्रसारित होतो. कित्येक वर्षं गोव्यातून राष्ट्रीय कवी संमेलनासाठी निवड झालेल्या काही कोंकणी कवींच्या कवितांचे इंग्रजी अनुवाद करण्याची संधी मला मिळाली. हा अनुवाद रचनेचा, निर्मितीचा आनंद मी घेतला. कोंकणीतून इंग्रजीत साहित्याचा अनुवाद सोपा नसतो. कवितेचा अनुवाद तर कठीणच. कारण आशयघनता इंग्रजीत नेणे हे बिकट असते. पण अनुभव कामी येतो.
संगीत सभा असो की कवी संमेलन, आकाशवाणीच्या देशव्यापी प्रसारणात जे निवेदन असते ते फार मधुर असते. त्याचा दर्जा उच्च असतो. कॉलेजात असताना आम्ही संगीत सभा ऐकत होतो. तेव्हा निवेदक हिंदी व नंतर इंग्रजीतून गायक वा वादक कलाकारांची ओळख करून देत. नंतर कार्यक्रम सुरू होत असे. अखेरीस उद्या कोणता गायक कोणता राग सादर करील ते सांगितलं जायचं.
निवेदकाच्या आवाजातील गोडवा हे आमच्यासाठी एक आकर्षण होतं. त्या निवेदनातील ठेहराव, विराम, चढउतार हे ऐकत राहावं असं वाटे. आवाजाच्या, निवेदनाच्या, शब्दांच्या प्रेमातून आम्ही घडत गेलो, शिकत गेलो. शेवटी आम्ही आकाशवाणीच्याच सेवेत पोहोचल्यानंतर हे कलाकार आम्हाला भेटू लागले. गोव्यात टूरवर यायचे तेव्हा जरूर भेटत. क्रिकेटचं समालोचन करायला जे समालोचक येत, ते आकाशवाणी पणजीच्याच गेस्ट रूममध्ये राहत. न्यूजरूममध्ये येऊन भेटत. सर्वांकडून अनेक ज्ञानकण गोळा करता आले. मधाचा एक एक थेंब साठवून मोठ्ठं पोळं व्हावं तसं जीवनाच्या पात्रात कलेचे, आवाज संस्कृतीचे, सादरीकरणाचे अनेक सोनेरी कण संकलित करता आले!
-मुकेश थळी
(लेखक बहुभाषी साहित्यिक, अनुवादक,कोशकार असून आकाशवाणीचे निवृत्त वृत्तनिवेदक आहेत)