अशाच एका रात्री रखमाला कळा सुरू झाल्या. घर शेतावर. पोर लहान. रखामाला काही कळेना, मग धीर धरून हवं नको ते पाहून एक कपड्यांची पिशवी भरली आणि पोरीला संगं घेऊन कळ सोसत बाहेरच्या मुख्य रस्त्यापर्यंत आली.
किसना म्हणजेच कृष्णा..! लहानपणापासून सगळे किसनाच म्हणायचे. हातावरचं पोट असलेला एक ड्रायव्हर गडी. एका मालकाकडे गाडीवर काम करत होता. पगार जेमतेम हातात यायचा पण त्यातही आपलं घर समर्थपणे पेलणारा हा साधा सरळ माणूस. त्याच्या आयुष्याबद्दल कधी तक्रारी नव्हत्या. घरी त्याची सौभाग्यवती आणि एक मुलगी. हे छोटंसं कुटुंब कष्ट करून समाधानाने जगत होतं.
किसना इतरांच्याही मदतीला लगेच धावून जायचा. मग कधी कधी खिशातले पैसेही द्यायचा. त्याच्या या वागण्यामुळे बायको कधी कधी त्याला बोलायची. मग तो तितक्याच शांतपणे तिला म्हणायचा, “रखमा! देणारा तो आहे गं..! सगळ्यांचा हिशेब ठेवणाराही तोच. तोच बुद्धी देतो. देणाराही तोच आणि घेऊन जाणाराही तोच. आपणही कित्येक अडचणींचा सामना केलाय. अडचण आल्यावर काय होतंय ते आपल्यासाठी नवं आहे का..? ज्याला अडचणीत जे हवं तेच द्यावं. नाहीतर वरवरच्या सांत्वनाचा काही उपयोग नसतो.” नवऱ्याच्या चांगुलपणाचा तिला राग यायचा पण त्यानं सांगितलेल्या गोष्टी तिला मनोमन पटायच्या.
आई वडील लहानपणी गेल्यामुळे त्याचा चुलत्यांनी सांभाळ केला. कळतं वय झालं तसं किसना पडेल ती कामे करू लगला. शेवटी आईबाप नसणाऱ्या पोरांना कोण जवळ धरतंय? मायेची माणसं हवीत. तरच पोटच्या पोराप्रमाणे सांभाळ होतो. किसनाचा चुलता त्याला घरगड्याप्रमाणे वागवी. त्यामुळे शाळा मधेच सुटली. कामं करत करत गाडी चालवायला शिकला. मग चुलत्याने बेताचीच परिस्थिती असलेल्या घराशी सोयरिक जमवून किसनाचे लगीन लावून दिले. गरीब घरची रुक्मिणी घरात आली. शेतावरचा
गोठा आता रिकामा होता. तिथेच त्याला राहायला दिले आणि चुलत्याने जबाबदारीतून काढता पाय घेतला.
किसना ड्रायव्हर असल्यामुळं कधी जवळचे भाडे असे, तर कधी लांबचे. एखाद दिवस बाहेरच वस्ती व्हायची. हळूहळू रखमाला याची सवय झाली. आलेल्या पगारात सारं जमवून न्यायची. जमेल तेव्हा मजुरी करायची. परंतु जसं म्हंटलं किसना कुणाला ना कुणाला मदत करायचा तेव्हा घरात पैसे कमी यायचे. कुणी आजारी असलं म्हणजे लगेच पैसे काढून द्यायचा. काहींकडून पैसे परत यायचे, तर काहींना जाणीवही नसायची. पण म्हणून त्यानं कधी आपला हात आखडता घेतला नाही. किसनाच्या गाठी आशीर्वादाची पुण्याई बरीच जमलेली हे मात्र तितकंच खरं. कधीतरी आपलं आपल्याकडे परतून येईल यावर त्याचा ठाम विश्वास.
काही दिवस झाले, रखमा पोटुशी होती. घरात मोठी पोर आता चौथीला शाळेत जायची. पोर हुशार आणि बापासारखीच निर्मळ मनाची. आईची चिडचिड झाली तरी कधी तिच्यावर रागवायची नाही. या एवढ्याशा वयात आईच्या हाताखाली सगळी कामं करी. गरोदरपणातले शेवटचे काही दिवस होते. पैसे जास्त लागतील म्हणून किसना जास्तच काम करत होता. मिळेल तिकडे भाडे घेऊन जाई. चार चार दिवस बाहेर जाई.
अशाच एका रात्री रखमाला कळा सुरू झाल्या. घर शेतावर. पोर लहान. रखामाला काही कळेना, मग धीर धरून हवं नको ते पाहून एक कपड्यांची पिशवी भरली आणि पोरीला संगं घेऊन कळ सोसत बाहेरच्या मुख्य रस्त्यापर्यंत आली. पाच किलोमीटर अंतरावरील दवाखान्यात पोचणं गरजेचं होतं. दिसेल त्या गाडीला हात करत होती. पण गाडी काही थांबेना. शेवटी एक छोटा टेम्पो थांबला. काचेतून ड्रायव्हरने पाहिले आणि विचारपूस केली. थोडाही वेळ न लावता त्याने त्यांना गाडीत घेतले. समान व्यवस्थित ठेवले आणि पुन्हा गाडी सुरू केली.
ड्रायव्हर भला माणूस होता. त्याने विचारले, “कुणीकडे जाणार ताई? घरातलं कुणी नाही का सोबत? या अशा परिस्थितीत या पोरीला घेऊन बाहेर कसं पडला ओ?” मग रखमा सांगू लागली, “अजून आठवडा होता दादा पण अचानक कळा सुरू झाल्या. आमचं मालक ड्रायव्हर आहेत. अजून अवधी आहे म्हणून दोन दिवसाचं भाडं घेऊन गेलेत. उद्या येतीलच. पण ही वेळ आली. म्हणून आम्ही दवाखाना गाठायचा म्हणून बाहेर पडलो!”
ड्रायव्हर चांगल्या मनाचा. त्यांना पाण्याची बाटली दिली. पाण्याचे घोट घेतल्यावर त्याने पुन्हा विचारले, “ताई दवाखान्यात चाललाय तर जवळ पैसे आहेत नव्हं?” रखमा थोड्या संकोचाने बोलली, “दादा, घरात दोन हजार होते तेवढे घेऊन आलेय!” काळजीचे सावट तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. तेवढ्यात ड्रायव्हरने खिशातली पैशाची गुंडाळी काढली आणि तिच्या हातावर ठेवली. किती होते ते पण पाहिले नाही म्हणाला, “हे घे. लागतील खर्चाला! तोपर्यंत तुमचं मालक येतीलच!”
रखमाला काही कळेना. कुठला कोण माणूस हा, मला का पैसे देतोय?? तिने नकार दिला, मालकांना आवडणार नाही मी पैसे घेतलेले. तेव्हा ड्रायव्हर म्हणाला, “नाही ओ ताई, मलाही एकदा असंच किसना नावाच्या ड्रायव्हरने ना ओळख ना पाळख तरी माझी मदत केलेली. परत तो कधी भेटलाच नाही. माझी आई लय आजारी होती. तेव्हा असंच मार्केटमध्ये बसलो होतो. तेव्हा तो कुठून तरी आला आणि माझी विचारपूस करू लागला. मीही माझी अडचण सांगितली. त्या भल्या माणसाने हातावर पैसे ठेवले आणि म्हणाला आई लवकर बरी होईल. देवावर श्रद्धा ठेवा. या किसनाचा आईला नमस्कार सांगा. आणि समोरच्या गर्दीत नाहीसा झाला. आज ते ऋण फेडायची वेळ आली बघा. नको म्हणू नका. माझ्याही डोक्यावरचं ओझं हलकं होईल. आई म्हणाली होती, “ तुला जशी त्या लेकराने मदत केली तशी तूही कुणाच्या तरी गरजेला धावून जा.”
एवढ्यात गाडी दवाखान्याच्या दारात आली. पटकन त्याने उतरून दोघींना खाली घेतले आणि दवाखान्यात सोडले. काळजी घ्या सांगून ड्रायव्हरने त्यांचा निरोप घेतला. रखामाचे डोळे भरून आले होते. किसनाचा शब्द खरा ठरला होता. त्याची श्रद्धा खरी होती. जाणाऱ्या गाडीकडे रखमा बघतच राहिली. गाडीवर मागे लिहिले होते. “अच्छा चालता हू, दूवाओंमे याद रखना!” नवऱ्याने केलेल्या मदतीची पुण्याई कामी आली. वेळेला एक देवमाणूस मदत करून गेला.
आपलं आपल्याकडे परत आल्याच्या भावनेने रखमा भरून पावली होती. नवऱ्याच्या विश्वासाची आणि चांगुलपणाची प्रचिती आज तिला आली होती. हिशेब करणारा आहे जो तुमचे तुम्हाला नक्की परत देईल.
-प्रा. सागर मच्छिंद्र डवरी