पुष्पा २: आपले नायक बदलतायत

तेलुगू सिनेसृष्टीचा स्टायलिश स्टार अल्लू अर्जुन ‘पुष्पा २: द रूल’ च्या निमित्ताने यावर्षी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. अल्लू अर्जुनच्या कारकिर्दीतला आजवरचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ‘पुष्पा’ या सिनेमालिकेकडे बघितलं जातं. या सिनेमाच्या निमित्ताने, गेल्या काही वर्षांत बदलत गेलेलं सिनेनायकांचं स्वरूप पुन्हा एकदा चर्चेत आलंय.

Story: मनोरंजन |
08th December, 03:32 am
पुष्पा २: आपले नायक बदलतायत

२०२१ चं वर्ष शेवटाला आलेलं असतानाचा काळ. दीड वर्षांच्या प्रदीर्घ लॉकडाऊननंतर थियेटर्स पूर्ण क्षमतेने सुरु झाले होते. त्यात डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात ‘पुष्पा: द राईज’ नावाचं तेलुगू वादळ बॉक्स ऑफिसवर आदळलं आणि त्याने पॅन इंडियन कमाईचे अनेक विक्रम मोडीत काढले. सिनेमात शीर्ष भूमिका साकारणाऱ्या अल्लू अर्जुन या तेलुगू अभिनेत्यासाठी हा सिनेमा सर्वार्थाने खास ठरला.

वास्तविक, अल्लू अर्जुन ‘पुष्पा’ रिलीज होण्याआधीही बराच लोकप्रिय होता. २००४ साली आलेल्या सुकुमार दिग्दर्शित ‘आर्या’ या सिनेमात त्याने साकारलेलं आर्या हे पात्रही कमालीचं लोकप्रिय ठरलं होतं. खरं तर, याच सिनेमाने बिगर-तेलुगू प्रेक्षकांमध्येही अल्लू अर्जुनची लोकप्रियता वाढवली होती. पण ‘पुष्पा’मुळे मिळालेल्या लोकप्रियतेने अभिनेता अल्लू अर्जुनचं ब्रँड अल्लू अर्जुनमध्ये रूपांतर केलं.

योगायोग म्हणजे, ‘पुष्पा’चा दिग्दर्शकही सुकुमारच आहे! २००४चा ‘आर्या’ आणि २००९चा ‘आर्या २’ रिलीज झाल्यानंतर तब्बल १२ वर्षांनी सुकुमार-अल्लू अर्जुन ही जोडगोळी ‘पुष्पा’च्या निमित्ताने सिनेरसिकांच्या भेटीला आली आणि पुन्हा तितकीच यशस्वीही ठरली. आता हीच जोडगोळी ‘पुष्पा’च्या सिक्वेलच्या म्हणजेच ‘पुष्पा २: द रूल’च्या निमित्ताने पुन्हा एकदा देशभरातल्या थिएटर्समध्ये धुमाकूळ घालताना दिसून येतेय.

पुष्पराज उर्फ पुष्पा हा शेषाचलमच्या डोंगररांगांमध्ये धुमाकूळ घालणारा एक चंदनतस्कर. लाल सोनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लाल चंदनाची तस्करी करणाऱ्या गटातला एक साधा मजूर ते चंदन माफियांच्या सिंडिकेटचा अध्यक्ष हा पुष्पाचा प्रवास दिग्दर्शक सुकुमारने ‘पुष्पा: द राईज’ या पहिल्या भागात रेखाटला आहे. पुष्पा हे पात्र साकारणाऱ्या अल्लू अर्जुनला तेलुगू इंडस्ट्रीचा स्टायलिश स्टार म्हणून ओळखलं जातं. त्यामुळेच हा स्टायलिश स्टार जेव्हा ‘पुष्पा’मध्ये कळकट, मळकट मजुराच्या लूकमध्ये अवतरला, तेव्हा त्याची बरीच चर्चा झाली होती.

कष्टाने रापलेला चेहरा घेऊन आणि मळखाऊ कपडे घालून वावरणारा पुष्पा बघताना हाच का तो तेलुगू सिनेसृष्टीचा स्टायलिश स्टार असं कुणालाही वाटणं साहजिकच आहे. पण अल्लू अर्जुनच्या अभिनयाने ‘स्टाईल ही कपड्यात नसते तर वागण्यात असते’ हे दाखवून दिलं. सिनेमाच्या शेवटीही कपड्यांच्या ब्रँडपेक्षा व्यक्तिमत्त्वाचा ब्रँड किती महत्त्वाचा असतो, असा सूचक प्रसंग पडद्यावर येतो, तेव्हा अल्लू अर्जुनचं स्टायलिश स्टार असणं आणखीनच भावतं.

‘पुष्पा’च्या या भूमिकेसाठी अल्लू अर्जुनला राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्याचं कारणही तसंच होतं. गेली कित्येक वर्षं कमर्शियल सिनेमांचे नायक हे शाहरुख, सलमान, आमीर, ऋतिकसारखे देखणे, स्टायलिश, गोरेपान, सफाचट किंवा अगदी ट्रिम्ड दाढीमिश्या असलेले असावेत हा जणू पायंडाच पडला होता. अगदी श्रीमंती थाटाचे नसले तरी ट्रेण्डी फॅशनचे, स्टायलिश कपडे त्यांनी घालावेत, त्यांनी नायिकेच्या मागे गाणी म्हणत बागडावं, अत्यंत आदर्शवादी आणि सभ्य स्वभावाचं असावं असेही काही अलिखित दंडक कमर्शियल सिनेमातल्या नायकांसाठी घालून दिले गेले होते.

पण गेल्या काही वर्षांत हे सगळे नियम एकेक करून तोडले जाऊ लागले. दाढीमिश्या वाढवलेले, तापट वृत्तीचे, बंडखोर स्वभावाचे, तथाकथित पुरुषी अहंकार कुरवाळणारे, समाजाने लादलेली लिखित-अलिखित नैतिक बंधनं धुडकावून लावणारे सिनेनायक जन्माला आले. सत्तर-ऐंशीच्या दशकात अमिताभने जन्माला घातलेल्या ‘अँग्री यंग मॅन’चं हे आधुनिक पण काहीसं उग्र असं व्हर्जन. खलनायकाच्या अगदी काही पावलं अलीकडं उभा असलेला हा नायक ‘अँटीहिरो’ म्हणून ओळखला जातो.

भारतीय सिनेरसिकांना अँटीहिरो नवे नाहीत. याआधीही कित्येक दिग्गजांनी अँटीहिरोच्या भूमिका साकारल्या आहेत. भारतीय सिनेनायकांच्या इतिहासातलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे अभिनेते अशोक कुमार. भारताचा पहिला अँटीहिरो साकारण्याचा मान त्यांना १९४३ च्या ‘किस्मत’ मध्ये मिळाला. विशेष म्हणजे, त्या काळात एक कोटींची कमाई करणारा हा पहिलाच भारतीय सिनेमा ठरला होता. पुढे अगदी महानायक अमिताभ बच्चनपासून सुपरस्टार शाहरुख खानपर्यंत अनेकांनी अँटीहिरोच्या भूमिका गाजवल्या. दिग्दर्शक राम गोपाल वर्माने ‘गँगस्टर जॉनर’ला खतपाणी घालत अनेक नव्या-जुन्या चेहऱ्यांना अँटीहिरो बनायची संधी दिली. ‘धूम’ सिरीजमध्येही पोलिसांना चकवा देणाऱ्या भूमिका साकारत जॉन अब्राहम, ऋतिक रोशन आणि आमीरखानने अँटीहिरो भूमिकांना विशेष ग्लॅमर मिळवून दिलं. असं असलं तरी, भारतीय सिनेमांमध्ये आदर्शवादी सिनेनायकांच्या तुलनेत अशा अँटीहिरोंचं प्रमाण हे तसं कमीच होतं. त्यातल्या प्रथमदर्शनी अँटीहिरोछाप वाटणाऱ्या बहुतांश भूमिका या कथेनुसार पुढे एकतर हिरोच्या भूमिकेत बदलल्या जात होत्या, किंवा त्यांना येनकेनप्रकारेण संपवलं जात होतं. हे परिवर्तन प्रेक्षकांनाही आवडत होतं आणि त्यामुळेच या भूमिका कधीही फारशा वादग्रस्त ठरल्या नाहीत.

पण गेल्या काही वर्षांत हाच अँटीहिरो कसल्याही परिवर्तनाशिवाय प्रेक्षकांच्या गळी उतरवला जातोय. प्रेक्षकही अशा अथपासून इतिपर्यंतच्या अँटीहिरो भूमिकांवर तितकंच भरभरून प्रेम करतायत. विशेष म्हणजे, अँटीहिरोंचं हे साम्राज्य उभं करण्यात दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहिलेल्या सिनेमॅटीक वाऱ्यांचा मोठा वाटा आहे. तेलुगू, कन्नड, तमिळ आणि मल्याळम सिनेसृष्टीतल्या अनेक कमर्शियल हिट असलेल्या सिनेमांमध्ये क्लायमॅक्सला परिवर्तनाची वाट धरणारा अँटीहिरो लोकप्रियतेच्या शिखरावर राहिला. पुढे हाच अँटीहिरो ‘अर्जुन रेड्डी’, ‘केजीएफ १-२’, ‘पुष्पा’, ‘कांतारा’च्या निमित्ताने दक्षिणेकडून उत्तरेकडे आला आणि पर्यायाने पॅन-इंडिया लोकप्रियता खेचू लागला. बॉलीवूडनेही ‘कबीर सिंग’, ‘अॅनिमल’सारख्या सिनेमांच्या माध्यमातून लोकप्रियता आणि भरघोस बॉक्स ऑफिस कमाईच्या वाहत्या गंगेत हात धुवून घेतलेत.

नुकताच रिलीज झालेला ‘पुष्पा २: द रूल’ हेही यातलंच एक नवं नाव. आपल्या आईवर जीवापाड प्रेम करणारा, तिच्या स्वप्नांसाठी झटणारा, प्रेयसीसाठी आकाशपाताळ एक करणारा पुष्पा हे ‘अॅनिमल’मधल्या रणविजयसारखंच एक अल्फा मेल पात्र आहे. त्याला कुणापुढेही झुकणं मान्य नाही. पुष्पाचा स्वाभिमानी अॅटिट्यूड ही त्याच्या व्यक्तिमत्त्वाची विशेष बाजू आहे. स्वतःचा स्वाभिमान जीवापाड जपणारा हा नायक बंडखोर तर आहेच, पण प्रचंड धोरणी आणि संयमीही आहे. एखादी मुलगी आवडली तर तिला पटवण्यासाठी नाना युक्त्या करणारा आणि मग त्यात अपयशी ठरल्यावर थेट तिला मागणी घालणारा पुष्पा, बेवारस संतती म्हणून आपल्या श्रीमंत, सावत्र भावांकडून हिणवला गेलेला आणि त्याच भावांच्या नाकावर टिच्चून स्वाभिमानाने उभा राहिलेला पुष्पा, मालकासमोरही न झुकता आपला रास्त वाटा मागणारा पुष्पा ही वरकरणी कथेतली मांडणी कितीही कल्पक वाटत असली, तरी ती औटघटकेच्या मनोरंजनासाठी थिएटरकडे वळलेल्या मध्यमवर्गीय पावलांना सुखावणारी असते.

कदाचित त्यामुळेच चंदनतस्करीसारखा गंभीर गुन्हा करूनही अँटीहिरो पुष्पाची हिरोगिरी प्रेक्षकांच्या नजरेत कायम राहते. आपल्यावर चालून आलेल्या पोलिसांना ‘ज्या जगाने तुमच्या हातात बंदुका दिल्या, त्याच जगाने आम्हाला कुऱ्हाडी उचलायला भाग पाडलंय’, असा इशारा देणारा पुष्पा एकाएकी शोषितांच्या बंडखोरीचं प्रतीक बनू पाहतो खरा, पण त्याचा स्वार्थी स्वभाव या सगळ्यावर वरचढ ठरून हे गुडीगुडी गृहीतक मोडू पाहतो. जर जग वाकडं चाललंय तर आपणही तात्विक नीतिमत्तेला महत्त्व न देता जगाच्या वाकड्यात शिरायला हवं, असा रोखठोक अॅटिट्यूड प्रेक्षकांमध्ये रुजवण्यात पुष्पा यशस्वी ठरतो. मजूर ते सिंडिकेट अध्यक्ष हा पुष्पाचा ‘रंकाचा राव’ छाप पठडीचा प्रवास कोणत्याही मध्यमवर्गीय प्रेक्षकाला भावतो. 

यानिमित्ताने, ऐंशीच्या दशकात अमिताभने उभा केलेला अँग्री यंग मॅन प्रेक्षक आता पुष्पा, केजीएफ, अॅनिमलसारख्या सिनेमांमध्ये शोधू लागलेत, हे खरं. या सिनेमांमधल्या नायकांचा कॅरेक्टर आर्क हा कायम चढता राहिल्याचं दिसून येतं. अॅनिमलचा गर्भश्रीमंत नायक वगळता, इतर साऱ्याच नायकांची आर्थिक स्थिती ही बेताची असल्याचं दिसतं. अंगभूत बंडखोर प्रवृत्तीच्या जोरावर एक वर्चस्ववाद झुगारून नवा वर्चस्ववाद प्रस्थापित करणं हा या सर्व नायकांमधला समान धागा. हे नायक रूढार्थाने आदर्शवादी नाहीत. समाजाने अघोषितपणे ठरवून दिलेल्या चौकटीत हे नायक स्वतःला बांधत नाहीत. त्यांना दुनियादारीचा चांगलाच अनुभव असून, कुणासमोरही ‘झुकेगा नही साला’ हे त्यांनी आपल्या मनाशी पक्कं ठसवून घेतलंय. ते हिंसक आहेत, प्रचलित व्यवस्थेला बेकायदेशीर आव्हान देण्यात अग्रेसर आहेत, पुरुषी अहंकारात बुडालेले आहेत पण हे सगळं जस्टीफाय आणि ग्लोरिफाय करण्याची त्यांच्यात धमक आहे. नाकासमोर चालूनही आपलं काही भलं होत नाही, या हताश विचारांशी दोन हात करण्याचं बळ हे नायक देतात. हा लढा देण्याचा त्यांचा मार्ग चुकीचा वाटत असला तरी तो या मनोरंजक जगात रमलेल्या प्रेक्षकांना पुरेपूर दिलासा देणारा वाटतो. त्यांच्या पलायनवादी भूमिकेला बदलण्याचा किंचित का होईना, पण आत्मविश्वास देण्यात हे नायक यशस्वी ठरतात.

कदाचित हेच कारण असेल, ज्यामुळे कायद्याने मिळणारा १०० रुपयांचा रोजगार टाळून चंदनतस्करीतून हजारोंचा रोजगार मिळवणारा पुष्पा एकाएकी डॅशिंग वाटू लागतो. सतत एक खांदा उंचावून वावरणं हे अल्लू अर्जुनचं सिनेमापुरतं घेतलेलं मॅनरीजम त्यामुळेच एक प्रकारची स्वाभिमान जपणारी बेफिकिरी वाटू लागते. पुष्पाची हीच प्रतिमा आधीपेक्षाही मोठी दाखवण्याची जबाबदारी सुकुमार-अल्लू अर्जुनने ‘पुष्पा २: द रूल’च्या निमित्ताने समर्थपणे निभावलीय. निव्वळ बायकोच्या प्रेमाखातर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ घडवून आणणाऱ्या पुष्पाचा रोमान्स आणि अॅटिट्यूड प्रेक्षकांना भावतो. आयटम साँगवर नाचणारा पुष्पा देवीच्या जत्रेतही साडी घालून नाचताना दिसतो. सिनेमाभर शासन, प्रशासन आणि कायद्याला हवं तसं वाकवून आपल्या बेकायदेशीर साम्राज्याचा राक्षसी विस्तार करणारा पुष्पा क्लायमॅक्सकडे येताना मात्र प्रेक्षकांचा अधिकच लाडका होऊन जातो. पण तरी त्याचं अँटीहिरो असणं डोक्यातून जाता जात नाही. 

अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘गँग्ज ऑफ वासेपूर’मध्ये रामाधीर सिंह या पात्राच्या तोंडी ‘हिंदुस्तानमे जब तक सिनेमा है...’ अशा आशयाचं एक वाक्य आहे. बऱ्याचदा हे वाक्य सिनेरसिकांची खिल्ली उडवण्यासाठी वापरलं जातं. रामाधीर सिंह म्हणतो, तसं सिनेमा बघणाऱ्या प्रत्येकालाच आपण हिरो बनावं असं वाटत असतं. हीच इच्छा त्याच्या मनात अवास्तव महत्त्वाकांक्षेला जन्म देत असते. त्यामुळे आता ‘पुष्पा’कडे एकाच पात्राचा लार्जर दॅन लाईफ प्रवास रेखाटणारा, लॉजिकची पर्वा न करणारा, पुरेपूर मनोरंजनाच्या मसाल्यात मुरलेला एक कमर्शियल सिनेमा म्हणून पाहायचं की अल्फा मेल अँटीहिरोगिरीला प्रोत्साहन देणारा आणखी एक सिनेमा म्हणून पाहायचं, हा महत्त्वाचाच प्रश्न आहे; निदान सिनेमा आणि सिनेकलाकारांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या भारतासारख्या देशासाठी तरी!

-प्रथमेश हळंदे