पोलिसांनी केली अटक
व्हर्जिनिया : येथे नरेश भट्ट या मूळ नेपाळी व सध्या अमेरिकेत कामानिमित वास्तव्यास असलेल्या व्यक्तीवर पत्नीची हत्या केल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या नोंदीनुसार नरेश भट्ट याच्यावर मृतदेह लपवल्याचाही आरोप आहे. नरेश भट्ट यूएस आर्मी रिझर्व्हमध्ये ऑटोमेटेड लॉजिस्टिक स्पेशलिस्ट आहे. तो फेअरफॉक्स काउंटी पोलीस दलाचा सदस्यदेखील आहे. नरेश भट्ट याची पत्नी ममता (२८) प्रिन्स विल्यम मेडिकल सेंटरमध्ये नर्स म्हणून काम करत होती. २७ जुलै रोजी तिला शेवटचे पाहण्यात आले.
दरम्यान, ममता बेपत्ता झाल्याची तक्रार सर्वप्रथम तिच्या सोबत काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याने पोलिसांना दिली होती. १ आणि २ ऑगस्ट रोजी ममता कामावर आली नसल्याचे तसेच फोन देखील उचलत नसल्याचे तिने पोलिसांना सांगितले. चौकशी करण्यासाठी पोलीस नरेश व ममता भट्टच्या घरी गेले. यावेळी नरेशची रीतसर चौकशी करण्यात आली. ममतासोबत आपण ३१ जुलै रोजी डिनरसाठी गेलो होत मात्र यानंतर ती बेपत्ता झाल्याची माहिती दिली. सुरुवातीला ममता बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यास देखील त्याने नकार दिला होता.
पोलिसांना या प्रकरणात काहीतरी काळेबेरे असण्याची शंका आली. पोलिसांनी सर्वप्रथम नरेश भट्टची डिजिटल फुटप्रिंट तपासली. नरेश याने गुगलवर ‘पत्नीच्या मृत्यूनंतर पुन्हा लग्न करण्यास किती वेळ लागेल?’ असे सर्च केले होते. "पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर तिचे कर्ज कुणाला फेडावे लागते?' अशा आशयाचे अजून एक सर्च पोलिसांना आढळले. डिजिटल फुटप्रिंट अहवाल पाहून पोलिसांचा संशय पक्का झाला. ममताचा खून कुणी व का केला असावा या गोष्टीदेखील स्पष्ट झाल्या. आता फक्त मृतदेह कुठे आहे हे शोधणे बाकी होते.
त्यांनी भट्टच्या निवासस्थानी पुन्हा जात तेथे न्यायवैद्यक पथकाच्या सहाय्याने तपासणी केली. येथे त्यांना घराच्या मुख्य बेडरूममध्ये रक्ताचे डाग सापडले. घरातील कार्पेटवरही हलके गुलाबी डाग होते. बाथरुममध्येही रक्ताचे डाग न्यायवैद्यक पथकाच्या प्राथमिक तपासणीत आढळून आले. तेथे सापडलेल्या रक्ताच्या नमुन्याची त्यांनी डीएनए तपासणी केली असता ममताचा खून झाल्याचे स्पष्ट झाले. यादरम्यान त्यांनी आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजदेखील मिळवले. यात नरेश भट्ट २९ जुलै ते ३१ जुलै या काळात रात्रीच्या वेळी आपल्या गाडीत काहीतरी घेऊन जात असल्याचे स्पष्ट दिसत होते. पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार; नरेशने ममता बेपत्ता झाल्यानंतर तीन दिवसांनी गुगलवर ‘पत्नीच्या मृत्यूनंतर पुन्हा लग्न करण्यास किती वेळ लागेल?’ असे सर्च केले होते. "पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर तिचे कर्ज कुणाला फेडावे लागते?' अशा आशयाचे सर्च केले होते.
पोलिसांनी त्यास २२ ऑगस्ट रोजी ताब्यात घेत न्यायालयात हजर केले व त्यावर खटला उभा केला. न्यायालयात सर्व पुरावे सादर करण्यात आले. सिसिटीव्हीत कैद नरेश भट्टच्या एकंदरीत हालचालींवरून २९ जुलै रोजी ममताची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान सप्टेंबरमध्ये त्याने जामिनासाठी अर्ज केला होता. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून न्यायालयाने तो फेटाळला. ममताचे नेपाळस्थित कुटुंब आणि स्थानिक लोकांनी मिळून सोशल मीडिया कॅम्पेन आणि रॅलींद्वारे न्यायाची मागणी केली असून ही बाब सध्या व्हर्जिनियामध्ये चर्चेचे केंद्र बनली आहे. मात्र पोलिसांना अद्यापही ममताच्या मृतदेहाचे अवशेष हाती लागलेले नाहीत. हे प्रकरण उलगडण्यासाठी ममताचे कुटुंबीय आणि स्थानिक रहिवासी पोलिसांना सर्वतोपरी सहाय्य करत आहेत.