कायदा : ब्रेकिंग बॅड व नार्कोसचा संदर्भ देत सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला ड्रग्स तस्कराचा जामीन

'ड्रग्स सिंडीकेटमुळे अवघी तरुणाई मृत्यूच्या दाढेत जात आहे ': सर्वोच्च न्यायालय

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
07th December, 11:56 am
कायदा :  ब्रेकिंग बॅड व नार्कोसचा संदर्भ देत सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला ड्रग्स तस्कराचा जामीन

नवी दिल्ली : ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. यादरम्यान न्यायमूर्ती बेला त्रिवेदी आणि न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने 'नार्कोस' आणि 'ब्रेकिंग बॅड' या वेबसिरीजचा हवाला दिला.

'नार्कोटिक्स ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स ॲक्ट (एनडीपीएस) प्रकरणी अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचा समाजाला  मोठा धोका नाही, त्याचेही मूलभूत हक्क आहेत. त्याची अटक चुकीची आहे' असा युक्तिवाद सुनावणीदरम्यान आरोपीच्या वकिलाने केला. दरम्यान 'अशी ड्रग सिंडिकेट देशातील अवघ्या तरुणाईला मृत्यूच्या दाढेत ढकलत आहेत' असे त्यावर खंडपीठाने म्हटले. 

'मी तुम्हाला (आरोपीचे वकील) विचारतो, तुम्ही नार्कोस ही मालिका पाहिलीत का? त्यात खूप मजबूत सिंडिकेट आणि त्यांची एकूणच कार्यपद्धती दाखवण्यात आली आहे. त्यांना पोलिसांनी क्वचितच पकडले. ब्रेकिंग बॅड ही मालिका देखील जरूर पहा. या देशाच्या तरुणांची अक्षरश: हत्या करणाऱ्या या (ड्रग्स तस्करांशी) लोकांशी तुम्ही लढू शकत नाही.' असे न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा म्हणाले.

  सर्वोच्च न्यायालयाने ४ ऑक्टोबरच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्धच्या एका अपीलवर सुनावणी केली.  उच्च न्यायालयाने ड्रग्स सेवन व तस्करी प्रकरणात गुंतलेल्या एका आरोपीला जामीन देण्यास नकार दिला होता. या वर्षी एप्रिलमध्ये त्याला ७३.३० ग्रॅम स्मॅक (हेरॉईन) पकडण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाने तरुणाईत विशेष लोकप्रिय असलेल्या मालिकांचा संदर्भ निवाडा देताना घेतल्यामुळे सोशल मिडियावर या खंडपीठाचे कौतुक होत आहे. 

नार्कोस आणि ब्रेकिंग बॅड म्हणजे काय

नार्कोस- नार्कोस ही कोलंबियाच्या ड्रग्ज पेडलर पाब्लो एस्कोबारची कथा आहे. पाब्लोने संपूर्ण कोलंबियामध्ये ड्रग्सचा व्यवसाय कसा सुरू केला आणि त्यातून कोट्यवधी रुपये कसे कमावले हे या मालिकेत दाखवण्यात आले आहे. एकीकडे पाब्लो त्याचा ड्रग्जचा व्यवसाय वाढवत असताना दुसरीकडे काही तपास यंत्रणा त्याचा शोध घेत होत्या. ही आजवरची सर्वोत्कृष्ट गुन्हेगारी नाट्य मालिका मानली जाते. त्याचा पहिला सीझन २०१५ मध्ये रिलीज झाला होता.

ब्रेकिंग बॅड- २००८मध्ये सुरू झालेली ब्रेकिंग बॅड ही वेब सीरिज एका हायस्कूल शिक्षिकाची कथा आहे. त्याला कॅन्सर आहे. त्याच्या आजाराचे निदान झाल्यानंतर, वॉल्टर व्हाईटने त्याचा ड्रग्सचा व्यवसाय बंद करतो. तथापि, काही काळानंतर, त्याचे इरादे पूर्णपणे बदलतात आणि लोभामुळे वॉल्टर स्वतः या व्यवसायात सामील होतो. या चित्रपटात ब्रायन क्रॅन्स्टन वॉल्टरची भूमिका साकारत आहे. या दोन्ही मालिकांत मोठमोठी ड्रग्स सिंडीकेट आणि तस्कर कायद्यातून पळवाटा काढून कसे मुक्त जीवन जगतात हे दाखवले आहे.  


हेही वाचा