महाराष्ट्रः गोव्याच्या सीमावर्ती भागात पट्टेरी वाघांचा अधिवास

आंबोली ते मांगेली भागात आठ वाघ : सह्याद्रीत पहिल्यांदाच विक्रमी नोंद

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
07th December, 12:34 am
महाराष्ट्रः गोव्याच्या सीमावर्ती भागात पट्टेरी वाघांचा अधिवास

सावंतवाडी : आंबोली (ता.सावंतवाडी) ते मांगेली (ता.दोडामार्ग) या सह्याद्रीच्या पट्ट्यात दुर्मिळ होत चाललेल्या आठ वाघांचे अस्तित्व वन विभागाच्या सर्वेक्षणामध्ये आढळून आले आहे. 

त्यामुळे या सह्याद्रीच्या पट्ट्यात मुंबई उच्च न्यायालयात व्याघ्र कॉरिडॉर होण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेला बळकटी मिळाली आहे. वनशक्ती संस्थेची याबाबत न्यायालयात याचिका सुरू आहे. जानेवारी ते मे २०२४ या कालावधीत वनविभागाने लावलेल्या कॅमेऱ्यात हे वाघ कैद झाले आहेत. 

जिल्ह्यातील सावंतवाडी ते दोडामार्ग या सह्याद्रीच्या पट्ट्यात तब्बल आठ पट्टेरी वाघांची नोंद झाली आहे. त्यात पाच मादी, तर तीन नर वाघांचा समावेश आहे. 

‘वनशक्ती’ या संस्थेने आंबोली ते मांगेली हा व्याघ्र कॉरिडॉर संरक्षित व्हावा, म्हणून उच्च न्यायालयात याचिका दाखल करत लढा दिला होता. या वाघांची नोंद याच कॉरिडॉरमध्ये झाली आहे. 

वनविभाग, सह्याद्री रिझर्व्ह फॉरेस्ट आणि वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन ट्रस्टच्या माध्यमातून जानेवारी ते मे दरम्यान सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि कर्नाटकातील काली व्याघ्र प्रकल्प या दोन्ही ठिकाणी हे सर्वेक्षण करण्यात आले होते. 

यामध्ये सिंधुदुर्गमध्ये आठ वाघांचे अस्तित्व वेगवेगळ्या कॅमेऱ्यामध्ये दिसून आले. हे वाघ सावंतवाडी तालुक्यातील आंबोली पट्ट्यात, तर दोडामार्ग तालुक्यातील काही भागांत आढळून आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासह खास करून आंबोली ते मांगेली पट्ट्यात वाघांचे अस्तित्व याआधीही वेळोवेळी अधोरेखित झाले होते. 

खासगी संस्थांनी लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये या वाघांचे अस्तित्व पुढे आले होते; परंतु वन विभागाने ते वेळोवेळी नाकारले होते. दोन वर्षांपूर्वी आंबोली भागात वाघ एका गाईला खातानाचे छायाचित्र समोर आले होते. यावेळी वन विभागाने वाघाचे अस्तित्व मान्य केले होते. 

वनशक्ती फाउंडेशनच्या स्टॅलिन दयानंद यांनी सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत सिंधुदुर्गात तब्बल ५० वाघांचा वावर असल्याचे सांगितले होते. एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल देत त्यांनी याला पुष्टी दिली होती. 

याच पार्श्वभूमीवर आता वन विभागाने केलेल्या सर्वेक्षणात तब्बल आठ पट्टेरी वाघ अधोरेखित झाल्याने स्टॅलिन दयानंद यांनी केलेल्या दाव्याला पुष्टी मिळाली आहे.
आंबोली ते तिलारी भागातील वाघांचा वावर आणि त्यांचे अस्तित्व लक्षात घेता त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अधिक ताकदीने पावले उचलण्यात येणार आहेत. 

रात्री गस्त आणि कॅमेरा ट्रॅप, तसेच रात्रीच्या वेळी शिकार करणाऱ्यांवर ड्रोनच्या माध्यमातून तसेच अन्य हालचालींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने विविध उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती सिंधुदुर्गचे उपवनसंरक्षक एस. नवकिशोर रेड्डी यांनी दिली.

हेही वाचा