सरकारकडून, मासिकांमधून, वर्तमानपत्रांमधून अश्या फसवणुकी विषयी जागृती होत असते. आपल्या आजूबाजूला आपण असे अनेक किस्से ऐकतो, पाहतो. पण स्क्रीनवरच्या भोळ्या भाबड्या चेहऱ्यांना फसून जाऊन आपण सहजच करून बघूया म्हणून एखादा प्रयोग करतो आणि स्वत: त्यांना बळी पडतो.
“अगं ऐक ना, मी ना आज ते इन्स्टावर दाखवतात बघ घर बैठे पैसा कामाओ... त्यावर एक कॉन्टॅक्ट केलाय गं. अगं घरात जाम तंगी चाललीये. पगार माहिताय ना तुला माझा जेमतेमच. महागाई एवढी वाढलीये. कसं बॅलन्स करणार ना पैश्यांचं गणित. एक्सट्रा काहीतरी हवं बघ. म्हणून जरा प्रयत्न करून बघते गं. किती कॉन्फिडन्टली ती रीलमध्ये एक बाई सांगत होती. महिना पंचवीस ते तीस हजार घरबसल्या कमावतात म्हणे.” माझी मैत्रीण अगदी हरखून गेलेली हे सांगताना.
आता ही या गोड स्वप्नातून बाहेर जमिनीवर आली की हिला काय वाटेल, या विचारातच मी तिचं सगळं ऐकत होते. म्हटलं चला, आणूयाच हिला जमिनीवर. निदान माझ्या पुढ्यातच काय ते होईल, मी निदान सावरू तरी शकेन पुढचं. म्हटलं “बघू गं काय येतं मग कॉन्टॅक्ट केल्यानंतर.” तिने लगेच वॉट्सअप उघडलं आणि नवीनच कुठल्याश्या सेव्ह न केलेल्या नंबरवर टॅप केलं. चॅट उघडल्यावर रीना कपूर नावाची प्रोफाइल दिसली. बघू काय पाठवलंय म्हणून माझ्या दिशेने स्क्रीन केली तर, माझ्या मैत्रिणीचे बेझीक डिटेल्स म्हणजे नाव, गाव आणि फोन नंबर; काम करायला तयार आहात का? कामाचं स्वरूप काय असेल म्हणजे ‘आम्ही फ्लिपकार्टशी आणि एमेझोनशी जोडलो गेलेलो असून आम्ही तुम्हाला फ्लिपकार्टवरच्या प्रोडक्टची एक लिंक पाठवू. ती लिंक उघडा आणि त्यातल्या प्रोडक्टला ‘हार्ट’ करा. मग आम्हाला स्क्रीन शॉट पाठवा. आमचा प्रत्येक पूर्ण केलेल्या टास्कमागे १२० रुपये तुम्हाला मिळतील. पहिला टास्क डेमो असून पुढील टास्कपासून तुमच्या खात्यात १२० रुपये पाठवण्यात येतील.’ असे मेसेजस दिसले.
मी म्हटलं चल बघुयात करून. तीही आनंदाने तयार झाली. लगेच लिंक उघडली, त्यावर दाखवण्यात आलेल्या फ्लिपकार्टवरच्या प्रोडक्टला ‘हार्ट’ केलं, स्क्रीनशॉट काढला आणि त्या नंबरला पाठवला. लगेचच पलीकडूनही उत्तर आलं. मैत्रिणीला पलीकडची व्यक्ती व्हेरी गुड म्हणत होती. ‘पहिला टास्क तुम्ही पूर्ण केलेला आहे. आता तुम्हाला तुमच्या डिटेल्स द्याव्या लागतील.’ या डिटेल्समध्ये काय होतं? तर मगाच्या डिटेलपेक्षा थोडी जास्त माहिती; म्हणजे संपूर्ण नाव, गुगल पे नंबर, पत्ता. हे हि काही रिस्की वाटत नव्हतं. तर म्हटलं भर बघू सगळी माहिती आणि पाठव पुन्हा. हिने माहिती भरून पाठवून दिली. पुन्हा रिप्लाय आला, ‘माहितीसाठी धन्यवाद. आता तुम्हाला काही टास्क पाठवले जातील. त्यासाठी तुम्हाला फक्त ३४० रुपये आमच्या अकाउंटवर ट्रान्स्फर करायचे आहेत.’
ओह्हो... तर इथे गंमत होती खरी. मी म्हटलं मैत्रिणीला, “आता विषय सोडून दे. हे अश्याने काही होणार नाहीये. पैसे उकळण्याची कामं.” मैत्रीण म्हणते, “अगो त्यात काय, रेजिस्टर करण्यासाठीचीच तर फी आहे. करते थांब त्यांना पे.” असं म्हणून हिने पेमेंट केले पण. लगेचच हिला मेसेज आला, ‘खालील लिंक ओपन करा आणि त्यात तुमचे बँक डीटेल्स, म्हणजे अकाउंट नंबर, आयएफएससी कोड, बँकेचं नाव, ब्रांच कोड पाठवा.’ हिने ते ही भरले. नंतर पुन्हा मेसेज, ‘तुम्हाला नवीन टास्क देण्यात येत आहे. आता तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी इथे वॉट्सअपवर पाठवा.’ आता मैत्रिणीच्याही डोक्यात शंकेची पाल चुकचुकली. मैत्रिणीने लगेच नंबर ब्लॉक केला. मी विचारलं “अगं आणि तुझे ३६० रुपये?” “ते काय? आता बुडीत खात्यात. तू सांगत होतीस पण मला अक्कल कुठली? चुकलंच माझं. गेले ते आता ३६०.” मैत्रिणीने कपाळावर हात मारत म्हटले.
हल्ली इंस्टाग्राम वर फेसबुक वर अशा प्रकारच्या ‘घरबसल्या कमवा’, ‘वर्क फ्रॉम होम’, ‘दरमहा कमवा ३०,०००/- रुपये’ या प्रकारच्या जाहिराती येतात. जाहिरातींमध्ये ज्या बायका बोलत असतात त्या नव्याने आई झालेल्या, लग्नानंतर नोकरी सोडून घर सांभाळणाऱ्या पण आता उत्तम कमावणाऱ्या असे अगदी आत्मविश्वासाने हसत हसत सांगत असतात. तुम्हालाही अशा प्रकारे पैसे कमवायचे असतील तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा किंवा आम्हाला व्हाट्सअप करा असे लिंक दिलेले असतात. असे एका मागोमाग एक आपण स्वतःची माहिती त्यांना देत जातो, मग ओटीपी विचारले जातात आणि पूर्ण बँक खातं रिकामं होऊन जातं किंवा रजिस्ट्रेशनच्या नावे अमुक एखादी रक्कम उकळली जाते. कधी कधी असे नोकरी देणारे काही कोर्सेस सुद्धा ऑफर करतात. मग त्यासाठी पैसे भरावे लागतात. अनेक जणी या अशा लिंकवर टाईप करून या फसव्या जाहिरातींना बळी पडतात. पैसे तर मिळत नाहीतच वेळही फुकट जातो, कधी कधी स्वत:चेच पैसे जातात आणि हे सगळे करून शेवटी मनस्ताप तेवढा हाती लागतो.
सरकारकडून, मासिकांमधून, वर्तमानपत्रांमधून अश्या फसवणुकी विषयी जागृती होत असते. आपल्या आजूबाजूला आपण असे अनेक किस्से ऐकतो, पाहतो. पण स्क्रीनवरच्या भोळ्या भाबड्या चेहऱ्यांना फसून जाऊन आपण सहजच करून बघूया म्हणून एखादा प्रयोग करतो आणि स्वत: त्यांना बळी पडतो. आपण वेळीच सावध होऊन अशा प्रकारच्या जाहिरातींना बळी न पडता थोडेसे जागरूक राहिलो, एकमेकांशी बोलून इतरांचे अनुभव काय आहेत हे पाहिले तर नक्कीच या सगळ्यातून वाचू शकतो.
तर माझ्या सख्यांना एकच विनंती, अशा जाहिरातींना भुलून जाऊ नका. नीट पाहून, पारखून त्या ठिकाणी कामासाठी अर्ज करा. ऑनलाइन कामेही मिळू शकतात. पण त्यासाठी इतर काही पर्याय आहेत. ते पर्याय जाणून घेऊन, त्याबद्दल नीट अभ्यास करून नंतरच अशा ठिकाणी अर्ज करावा, किंवा अशा ठिकाणचे काम हाती घ्यावे. या इंटरनेटच्या जाळ्यात आपण कधीही फसू शकतो हे नक्कीच लक्षात ठेवा!
स्नेहा सुतार