मला देशात आणि मुख्यत्वे परदेशात खूपदा बोटीने प्रवास करायचे भाग्य लाभले. माझा पहिला पाण्यावरचा प्रवास हा चक्क गूळ बनवायच्या काहिलीतून करावा लागला होता.
‘माझी’ हा शब्द ऐकला की नजरेसमोर तरळू लागतात नदीच्या पात्राची दृश्ये, त्यात संथपणे विहार करणारी होडी, तिचे वल्हवणे करत गीत गाणारा तो नाखवा किंवा नावाडी. त्याची गीते कधी कधी अर्थपूर्ण, लक्ष्यवेधी असतात. पाण्याच्या प्रवाहाप्रमाणे, डोलणाऱ्या नावेप्रमाणे आपले मनही डोलू लागते. नदीच्या किंवा पाण्याच्या पात्राच्या पलीकडच्या काठावर घेऊन जाणारा तो तारणहार असतो, होडीत बसणाऱ्या प्रत्येकाच्या मनातल्या ठिकाणापर्यंत घेऊन जाणारा तो देवदूत भासतो. कुण्या प्रियकरला प्रेयसीपर्यंत पोहोचवतो. कुणा लेकीला माहेरी घेऊन येतो. कुणा विरहिणीला प्रियाला भेटवतो. पण आता ही दृश्ये फक्त काही ठिकाणापर्यंत सीमित राहिली आहेत. इंजिन बसवलेले स्टीमर, फेरीबोट, आगबोट, जहाज, क्रूझर यांचा जमाना आला आहे.
प्रत्येक जुन्या बंगाली किंवा उत्तर प्रदेशातल्या चित्रपटात एक तरी संथ वाहणारी नदी, त्यावर डुलत चालणारी होडी किंवा बोट, नावाडी आणि तो गात असलेले गाणे असायचेच. तो प्रवास हा त्यांच्या जीवनाचा एक भाग होता. नंतर प्रवासाची विविध आधुनिक साधने येत गेली. पाण्यावरचा प्रवास मागे पडत गेला.
मला पाण्यावरचा प्रवास आवडतो. कुणी म्हणेल खाली पाणी, वर आकाश. आणखी काही दिसतच नाही. त्यात कसली मजा? पण संथ पाण्यातून तरंगत चाललेली बोट किंवा नौका तुम्हाला अलगद तुमच्या इच्छित स्थानी घेऊन जाते आणि कमी खर्चात. पूर्वी पणजीला ब्रिज नव्हता तेव्हा फेरीबोटीतूनच जावे लागायचे. अजूनही आमच्याकडे कुणी पाहुणे आले की त्यांना आम्ही फेरीबोटीतून चक्कर मारून आणतो. त्यांनाही जरा वेगळी मजा वाटते.
मला देशात आणि मुख्यत्वे परदेशात खूपदा बोटीने प्रवास करायचे भाग्य लाभले. माझा पहिला पाण्यावरचा प्रवास हा चक्क गूळ बनवायच्या काहिलीतून करावा लागला होता. पन्नास वर्षांपूर्वी गोव्याला येताना अतिवृष्टीमुळे रस्ते पाण्याखाली गेले होते. नदीचे पाणी वाढले होते. तेव्हा लोकांना त्या काहिलीतून वल्हवत पलीकडच्या काठावर सोडले होते. तेव्हा मी अगदी जीव मुठीत घेऊन बसले होते. ती माझ्या आयुष्यातली पहिली बोट.
पाण्याची तशी मला भीतीच वाटते कारण मला पोहता येत नाही. आता बोटीला इंजिने असतात. पूर्वीसारखा वल्हवणारा नावाडी काही ठिकाणीच दिसतो. पिठापूर, कुरवपूर या दत्त स्थानांना भेट द्यायला अशी बोट घ्यावी लागायची. फार वर्षांपूर्वी मी अशी बरोबर पाहुण्यांना घेऊन पणजीहून वास्कोला गेले होते. परत यायला तिकडून फेरीबोटच नव्हती. मग एका मच्छीमार बोटीतून आम्ही परत निघालो. ती बोट इतकी हेंदकळत होती की पणजीला पोहोचेपर्यंत सर्वांना उलट्या व्हायला लागल्या. सर्वांची हालत अगदी खराब झाली होती. तो बोटीचा प्रवास अगदी लक्षात राहण्यासारखा झाला. पण त्या बोटीचा मांझी खूप चांगला माणूस होता. त्याने तर पैसेही घेतले नाही आमच्याकडून.
आणखी एक लक्षात राहण्यासारखा प्रवास म्हणजे गंगासागर इथे गेले असताना तिथून परत यायची बोट ही शेवटची होती आणि त्यामुळे त्यात जवळजवळ शंभरपेक्षा जास्त लोक कोंबले गेले होते. ती बोट आकाराने फार मोठी होती. सरळ एखादा मोठा हॉल असावा तसा तिचा आकार होता. आतील खांबाला धरून लोक उभे होते. बसायला ओळीने ठेवलेले लाकडी बाकडे फुल्ल झालेले. गर्दीमुळे चेंगराचेंगरी चालली होती. लोकांना अजिबात शिस्त नव्हती. एका बाजूला जास्त गर्दी केली होती त्यामुळे बोटीचा त्या बाजूला सारखा झोक जात होता आणि नदीच्या पाण्याचा अथांग सागर. मनातून खूपच भीती वाटत होती कारण लोक फारच गोंधळ घालत होते. एकतर बंगालीत सारखी वटवट आणि बेशिस्तपणा. यामुळे बोट बुडायची बाकी होती. त्या लोकांना सवय असेल पण आम्हाला ते नवीनच असल्याने तो प्रवास अगदी जीव मुठीत घेऊनच केला. त्या बोट चालवणाऱ्याचे कौतुक वाटले. इतक्या मोठ्या नदी पात्रातून इतक्या लोकांना सहज लीलया त्याने सुखरूप आणून सोडले होते. धन्य तो मांझी.
खाली उतरल्यावर ठरवलं पुन्हा अशा ठिकाणी प्रवासाला जायचं नाही. तेव्हा तिथे शाही स्नान की कसले तरी फेस्टिव्हल होते. गर्दी आणि बेशिस्तपणा यामुळे बऱ्याच दुर्घटना घडतात. पाण्यावरून प्रवास करताना शिस्त महत्त्वाची असते. बोटीत चढताना उतरताना एका बाजूने जास्त झुकली तर बॅलन्स चुकतो हे लक्षात ठेवूनच लोकांना बसवतात. बोटीच्या क्षमतेपेक्षा कधी कधी जास्त लोक भरले जातात. तेव्हा ती धोक्याची घंटा असते. अशा वेळी तुमची जीवन डोर सर्वस्वी त्या खेवनहार म्हणजे त्या मांझीच्या हाती असते.
परदेशात मात्र सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून मगच बोट सुरू केली जाते त्यामुळे तिकडे केलेला प्रवास हा अधिक सुखकर आणि सुंदर वाटतो. पण सगळीकडे तसं दिसतं असं नाही. व्हिएतनामला गेले तेव्हा एका ठिकाणी पाण्यातून प्रवास करावा लागणार होता. आठ जणांच्या गटाला स्टीमर बोट घेऊन जाणार होती. आमच्या बोट चालवणाऱ्याचं वय असेल जेमतेम तेरा-चौदा वर्षं. तो कसं काय नेणार? अशी मनातून शंका आणि धास्ती वाटत होती पण त्याला बरीच प्रॅक्टिस असावी. त्याने ते काम व्यवस्थितरित्या पार पाडलं. असा हा नावाडी!
प्रतिभा कारंजकर, फोंडा