राज्यसभा अध्यक्षांनी सभागृहात दिली माहिती. सभागृहात गदारोळ
नवी दिल्ली : गुरुवारी सभागृहाचे कामकाज तहकूब झाल्यानंतर, अँटी सेबोटाज पथकाच्या नियमित तपासणीदरम्यान, काँग्रेसचे सदस्य अभिषेक मनू सिंघवी यांच्या आसनाजवळ ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल सापडले. राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखर यांनी शुक्रवारी सभागृहात याबाबत माहिती दिल्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले.
'काल (गुरुवारी) सभागृहाचे कामकाज तहकूब केल्यानंतर सुरक्षा अधिकाऱ्यांनी आम्हाला माहिती दिली की सीट क्रमांक २२२ खालून रोख रक्कम सापडली आहे. ही जागा तेलंगणाचे खासदार अभिषेक मनू सिंघवी यांना देण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास नियमानुसार व्हायला हवा आणि तो केला जात आहे.' असे राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखर यांनी सभागृहाला सांगितले. दरम्यान यावर ''माझी विनंती आहे की चौकशी पूर्ण होईपर्यंत आणि सत्य घटना समोर येईपर्यंत कोणत्याही सदस्याचे नाव घेऊ नये. अशी चिखलफेक केल्यास देशाची बदनामी होईल.' असे मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले.
दरम्यान 'नाव घेण्यात कोणाचाही आक्षेप नसावा. जे काही झाले आहे ते योग्य नाही' असे संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू म्हणाले. आजचे युग हे डिजिटल युग आहे आणि कोणीही इतक्या नोटा बाळगत नाही. याची चौकशी झाली पाहिजे.असेही ते पुढे म्हणाले. ही घटना अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे. यामुळे सभागृहाच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे, असे केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा म्हणाले.
काँग्रेस खासदार आणि अधिवक्ता अभिषेक मनु सिंघवी यांचेही या प्रकरणी वक्तव्य समोर आले आहे. मी राज्यसभेत गेल्यावर ५०० रुपयांची एकच नोट घेतो. हे मी पहिल्यांदाच ऐकले आहे. मी १२.५७ ला सभगृहात पोहोचलो. १ वाजता सभागृहाचे कामकाज सुरू झाले. मी दीड वाजेपर्यंत कॅन्टीनमध्ये बसलो होतो. यानंतर मी संसद परिसरातून बाहेर आलो. असे आरोपांचे खंडन करत सिंघवी म्हणाले.