कॅलिफोर्निया : उत्तर कॅलिफोर्नियाच्या काही भागांमध्ये ७.० तीव्रतेच्या जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले. यामुळे या भागात त्सुनामीचा इशारा देण्यात आला. उत्तर कॅलिफोर्निया आणि सॅन फ्रान्सिस्को उपसागरातील काही किनारी भाग देखील रिकामा खबरदरीचा इशारा लक्षात घेत खाली करवण्यात आला आहे.
युनायटेड स्टेट्स जिऑलॉजिकल सर्व्हे (USGS) नुसार, उत्तर कॅलिफोर्नियाच्या किनारपट्टी भागात भूकंपाचा जोरदार धक्का जाणवला. याची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.० नोंदवण्यात आली. काल गुरुवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी १०.४४ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. सुरुवातीला त्याची तीव्रता ६.६ इतकी नोंदवली गेली होती परंतु नंतर ती ७.० वर श्रेणी सुधारित करण्यात आली. प्राप्त माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीच्या ०.६ किलोमीटर खोलवर होता. उत्तर कॅलिफोर्नियातील हम्बोल्ट काउंटीमधील फर्न्डेल या शहराच्या वायव्येकडील १०० किमी अंतरावर असलेल्या किनारपट्टीच्या भागात हे घडले.
भूकंपानंतर काही मिनिटांनंतर, यूएस नॅशनल वेदर सर्व्हिस (NWS) ने कॅलिफोर्नियामधील ५.३ दशलक्ष लोकांना सावध करत त्सुनामीचा इशारा जारी केला. भूकंपाचे धक्के सॅन फ्रान्सिस्कोपर्यंत देखील पोहोचले. त्यामुळे सॅन फ्रान्सिस्को आणि ओकलंड (सॅन फ्रान्सिस्को बे एरिया) यांना जोडणाऱ्या पाण्याखालील बोगद्यामधून जाणाऱ्या सर्व परिवहन सेवा तात्पुरत्या बंद करण्यात आल्या.याव्यतिरिक्त, उत्तर कॅलिफोर्नियातील रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार बाराहून अधिक धक्के जाणवले. सध्या तरी कोणतीही जीवितहानी किंवा कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.