युवकाला १०.३५ लाखांना गंडा; दीपाश्रीला पणजी पोलिसांकडून अटक

तीन दिवस पोलीस कोठडी

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
30th November, 12:24 am
युवकाला १०.३५ लाखांना गंडा; दीपाश्रीला पणजी पोलिसांकडून अटक

पणजी : लेखा संचालनालयात अकाऊंटन्टची नोकरी देण्याचे आमिष दाखवून नादोडातील एका युवकाला १०.३५ लाखांना गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणी पणजी पोलिसांनी दीपाश्री प्रशांत महतो उर्फ सावंत उर्फ गावस हिला अटक केली. तिला पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडी ठोठावली आहे.

अर्जुन वामन देसाई (वाडी नादोडा, बार्देश) यांनी पणजी पोलिसांत संशयित महिलेविरुद्ध हा गुन्हा नोंदवला आहे. त्यानुसार, संशयित दीपाश्री हिने तक्रारदाराला लेखा संचालनालयात अकाऊंटन्टची नोकरी देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी तक्रारदाराकडून तिने १०.३५ लाख रुपये घेतले. हा फसवणुकीचा प्रकार २०१८ मध्ये घडला. पण अजूनपर्यंत संशयित महिलेने नोकरी दिली नाही किंवा घेतलेले पैसे परत केले नाहीत. त्यामुळे शेवटी तक्रारदाराने पोलिसांत धाव घेतली. याची दखल घेऊन पणजीचे पोलीस निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रोहन नागेशकर यांनी दीपाश्री सावंत हिच्या विरोधात भादंसंच्या कलम ४२० अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. याच दरम्यान दीपाश्री हिला दुसऱ्या प्रकरणात फोंडा पोलिसांनी अटक केली होती.

दरम्यान, पणजी पोलिसांनी तिच्या कोठडीसाठी फोंडा येथील प्रथमवर्ग न्यायालयात अर्ज केला. न्यायालयाच्या आदेशानुसार, पणजी पोलिसांनी गुरुवार, दि. २८ रोजी दीपाश्रीला अटक केली. पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला. शुक्रवार २९ रोजी तिला पोलीस कोठडीसाठी न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने तिला तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली. तसेच जामीन अर्जावर पुढील सुनावणी घेऊन २ डिसेंबर रोजी सुनावली ठेवली. 

हेही वाचा