कुचेली सरकारी जमीन हडप प्रकरण
म्हापसा : खडपावाडा कुचेली येथील सरकारी जमीन हडप प्रकरणी अटक केलेले संशयित आरोपी रमेश राव (रा. कुचेली म्हापसा) याला म्हापसा नगरपालिकेच्या सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. शुक्रवार, दि. २९ रोजी पालिका मुख्याधिकारी चंद्रकांत शेटकर यांनी राव याच्या निलंबनाचा आदेश जारी केला. संशयित नगरपालिकेत पर्यवेक्षकपदी कार्यरत होता.
दि. २० नोव्हेंबर रोजी म्हापसा पोलिसांनी संशयित रमेश राव व शकील शेख (रा. करासवाडा, म्हापसा) या दोघांना तर दि. २२ रोजी रवि चव्हाण (रा. कुचेली) याला अटक केली होती. सध्या तिन्ही संशयित आरोपी कोलवाळ कारागृहातील न्यायालयीन कोठडी आहेत.
दरम्यान, दि. २० नोव्हेंबर रोजी म्हापसा पोलिसांनी फिर्यादी सुश्मिता दामोदर हरमलकर (रा. फ्रेतसवाडा, वेर्ला काणका) व इतरांच्या तक्रारीच्या आधारे भा.न्या.सं.च्या ६१(२)(अ), ३१६, ३१८, १११(३) व ३(५) कलमान्वये या प्रकरणी गुन्हा नोंद केला होता. हा फसवणुकीचा प्रकार दि. १ जानेवारी २०१८ ते दि. १५ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत घडला होता.
संशयितांनी सामूहिक हेतूने गुन्हेगारी कट रचला व स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी फिर्यादी व इतर निरपराध व्यक्तींना कुचेली कोमुनिदाद जागेतील भूखंड विकत घेण्यास प्रवृत्त केले. तसेच भूखंडाचे हक्क फिर्यादींच्या नावावर हस्तांतरित करण्यासाठी कायदेशीर औपचारिकता पूर्ण करण्याची हमी दिली. तसेच फिर्यादींकडून एकूण ३८.४९ लाख रुपये उकळले होते.
म्हापसा शहर पीटी शीट क्र. १, चलता क्र. १०/३ व पीटी शीट क्र. २, चलता क्र. ११/१ मधील कोमुनिदादच्या सुमारे ३० हजार चौ. मी. कोमुनिदादची जमीन सर्वधर्मिय स्मशानभूमीसाठी सरकारने संपादीत केली होती. तरीही या जमिनीचे संशयितांनी भूखंड पाडून ते पीडितांना परस्पररित्या विकले होते.
संशयितांची जामिनासाठी न्यायालयात धाव
या प्रकरणातील इतर संशयित आरोपी राजू मांद्रेकर (रा. तीन माड, कामुर्ली), राजा अँथनी (रा. कुचेली) व नॉबर्ट सेर्राव (रा. कुचेली) यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज केला आहे. शिवाय रमेश राव, शकिल शेख व रवि चव्हाण या तिघांनीही जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. या सर्व अर्जांवर ४ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.