पृथ्वीवर एक तास

देवाला वाटलं होतं की इकडच्या वातावरणात ती रमून जाईल व कामाचं ओझं नसल्याने बाकी बायकांप्रमाणे मस्त एन्जॉय करेल. पण झालं भलतंच! देवाने थोडा विचार केला व म्हणाला, “आपण एक करू शकतो. मी तुला अदृश्य करून एका तासासाठी पृथ्वीवर पाठवतो. मग तू बघ सगळ्या घरच्या मंडळीचे तुझ्याविना होणारे हाल.”

Story: तिची कथा |
30th November 2024, 12:07 am
पृथ्वीवर एक तास

‘सांग ना रे देवा... किती वेळ झाला मी तुझ्या पाठीमागे फिरत आहे!’ कमल आता वैतागतच म्हणाली. कमलला देवाच्या घरी येऊन आज पंधरा दिवस झाले होते. देव पृथ्वीवर फेरफटका मारून आल्यापासून तिला आपल्या घरच्यांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता लागली होती. “सांग बाई, काय विचारायचं तुला?” देवाने आपलं आसन ग्रहण करून विचारलं. कमल पण देवाच्या पायाकडे बसली आणि काय काय विचारायचं म्हणून गोंधळून गेली. “देवा सांग ना रे, माझ्या घरचे कसे आहेत? रडत असतील ना रे? त्यांना घडोघडी माझी आठवण येत असेल ना रे?” तिची उत्सुकता वाढली होती.

कमल ४५ वर्षांची होती जेव्हा तिला देवाज्ञा झाली. पंधरा दिवसांचं आजारपण, कर्करोगाचं निदान झालं आणि अवघ्या काही दिवसातच तिचा जीव गेला. गेल्या वर्षभरात तिचं डोकं अधून मधून भिणभिणायचं. घरातल्या कामांपुढे डॉक्टरकडे जायचं राहूनच गेलं होतं. जास्तच डोकं दुखलं, की ती गोळी घ्यायची व कामाला लागायची. लग्न झाल्यापासून सासू-सासर्‍यांची खूप काळजी घ्यायची. त्यांना वेळेवर जेवण, गोळ्या सर्व काही द्यायची. लग्नाला वीस वर्षे उलटली होती, पण कधीही नवऱ्याला म्हणजे रवीला तिच्यावर रागवायची वेळ आली नाही. तो रोज ऑफिसला जाताना तिच्या हातचा गरमागरम नाश्ता करून, चमचमीत पदार्थांचा डबा घेऊन जायचा. संध्याकाळी त्याला लागेल अशा सर्व गोष्टी ती तयार करून ठेवायची. मुलांचा अभ्यास घेणं, त्यांचे कपडे व्यवस्थित ठेवणं, त्यांना पौष्टिक आहार देणं सगळं काही नियमितपणे चालू होतं. एकूण काय? तर सगळं घर तिच्याभोवती फिरत होतं.

 एकदा आपल्या आईची तब्येत बरी नाही म्हणून कमल एका आठवड्यासाठी माहेरी गेली होती. मात्र तिला दुसऱ्याच दिवशी घरी परतावं लागलं. घरी म्हणे सगळ्यांची पंचाईत झाली. त्या दिवसापासून कमल कधीही कुठे राहायला किंवा फिरायला गेली नाही. आता कमल देवापुढे बसून उत्तराची वाट पाहू लागली. देवही जरा चिंताचूर झाला. त्याला कमलची अवस्था बघवत नव्हती. देवाकडे आल्यापासून ती घरच्यांच्या चिंतेत होती. ‘हिला काय बरं सांगावं म्हणजे हिला बरं वाटेल?’ देवाने विचार केला व म्हणाला, “हे बघ कमल, सगळे बरे आहेत. तुझ्या जाण्याचा त्रास तर त्यांना आहेच पण ते आता हळूहळू ठीक होत आहेत.” 

कमल त्यावर बोलली, “नाही देवा, तुला माहित नाही. मी नसल्यावर त्यांचे किती हाल होतील रे!” ती खचली होती. देवाला वाटलं होतं की इकडच्या वातावरणात ती रमून जाईल व कामाचं ओझं नसल्याने बाकी बायकांप्रमाणे मस्त एन्जॉय करेल. पण झालं भलतंच! देवाने थोडा विचार केला व म्हणाला, “आपण एक करू शकतो. मी तुला अदृश्य करून एका तासासाठी पृथ्वीवर पाठवतो. मग तू बघ सगळ्या घरच्या मंडळीचे तुझ्याविना होणारे हाल.” कमलने लगेचच होकाराने मान हलवली. कमल लगबगीने तयार झाली.

दुपारचे एक वाजले होते. ती पहिल्यांदा घरी गेली. घराला आतून कडी होती. तिचा मुलगा समीर कानाला हेडफोन लावून ऑनलाइन क्लास ऐकत होता व मध्येमध्ये संत्री सोलून खात होता. त्याला अभ्यासात तल्लीन पाहून तिला बरं वाटलं. “आई मी तुझ्याशिवाय एकही दिवस राहू शकणार नाही.” असं म्हणून घट्ट मिठी मारणाऱ्या समीरच्या डोळ्यात तिला एकही अश्रू दिसला नाही. ‘असो! माझी स्वीटी मात्र अजूनही डोकं उशीत खुपसून रडत असणार.’ असा विचार करून ती स्वीटीकडे पोहोचली. आता ती होती एका मोठ्या मॉलमध्ये. स्वीटीचा मूड चेंज करायला तिच्या काही मित्र-मैत्रिणी तिला घेऊन पिक्चरला आले होते आणि गंमत म्हणजे तिचा मूड चेंज झाला पण! थोडा वेळ गप्प गप्प राहून तीही त्यांच्या जोक्समध्ये सहभागी झाली. मुलीच्या डोळ्यात आपल्यासाठी अश्रू पाहण्यासाठी धडपडणाऱ्या आईच्याच डोळ्यातून अश्रू ओघळले. 

तिने विचार केला, ‘मुलांचं काय, त्यांचं मन चंचल असतं. २० वर्षांपासून जिवापाड प्रेम दिलेल्या सासू-सासर्‍याकडे ती पोहोचली.’ धाकटी जाऊ सासू-सासर्‍यांना आग्रहाने जेवण घालत होती. अगदी कमल करायची तशीच. त्यांची ‘कमल’ त्यांना भेटली होती. त्यांच्या बोलण्यावरून हेही समजलं की कमलच्या घरात आता कामवाली बाई येऊन सगळं काम करून जायची. कमलचं मन जरा खट्टू झालं. ‘बाकीच्यांचं काय, माझा नवरा? तो माझ्याच विचारात असणार.’ तिच्या मनात विचार आला. 

आता ती रवीच्या ऑफिसमध्ये होती. लंच टाईम होता. रवीने गरमागरम डबा उघडला. त्याच्या सहकारी मित्रांनी विचारलं, “काय रे रवी, डब्बा कोणी दिला?” रवी म्हणाला, “अरे माझ्या मित्राच्या शेजारी एक बाई डबे बनवते आणि वेळेवर वेगवेगळ्या ऑफिसमध्ये पोहोचवते. रुचकर आणि गरमागरम.” आता मात्र कमलचं तोंड पडलं. ती ४० मिनिटांतच देवाकडे परतली. देव म्हणाला, “काय गं कमल, एक तास झाला नाही अजून.” यावर ती शांतपणे उत्तरली, “देवा मी भ्रमात होते. माझे पृथ्वीवरचे तास तर कधीच संपले!!!” 


सोनिया परब, 
साळ