पंढरी जाता मिया

जात्यावरच्या ओव्या ही फक्त मनोरंजनात्मक गाणी नव्हती आणि म्हणूनच जात्याच्या घरघर आवाजाबरोबरच तिच्या गोड आवाजातून ह्या ओव्या घरभर आणि मनभर नाचायच्या.

Story: भरजरी |
24th November, 03:49 am
पंढरी  जाता मिया

गोमंतभूमी भक्ती वत्सल आहे. इथल्या जनमानसाला प्रत्येक घटकांमध्ये देवाचा वास जाणवतो. घरातून बाहेर निघताना देव्हाऱ्यातील देवाबरोबरच गावातील मंदिराच्या कळसाला आणि वेशीवर उभ्या असलेल्या राखणदाराला हात जोडल्याशिवाय गावडा पुढचे पाऊल टाकत नाही. पंढरपूरचा पांडुरंग मैलोनमैल दूर असला तरी त्याच्या भजनाशिवाय गोमंतकाच्या गावातील एकही उत्सव पूर्ण होत नाही. पांडुरंगाची प्रितच अशी, की त्याचे वेड घरातील प्रत्येकालाच असायचे. असा गोमंतकातला गाव होता आणि अजूनही आहे याचे कोणालाही नवलच वाटेल. म्हणूनच आजही गोवेकर सावळ्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी कित्येक मैलाचे अंतर पायी तुडवत पंढरपूरच्या वाळवंटी जातात.

ही विठ्ठल प्रीतीची ओढ घरणीबाई आपल्या जात्यावरच्या ओवीतूनही गाताना दिसते.

पंढरपुरामध्ये
जाई भक्तांची घनदाट
माझ्या नी विठ्ठलाची
माझ्यावर माया दाट 

विठुरायाच्या भक्तीचे संस्कार अगदी बालपणापासूनच घरणीबाईच्या मनावरही झालेले असतात. ती आजोबांनी सांगितलेल्या विठुरायांच्या भक्तांच्या गोष्टी ऐकत वाढलेली असते. आजीने संत सखुबाई आणि संत जनाबाईंच्या गायलेल्या ओव्या तिने ऐकलेल्या असतात. जनाबाईच्या दुःखी, कष्टी जीवनामध्ये विठुराया चंद्राचे चांदणे होऊन आलेला तिने जाणलेले असते. आपल्या नशिबीचे दु:खही दूर करण्यासाठी आपला पांडुरंग आपल्यासाठी धावत येईल हा विश्वास तिला असतो. म्हणून ती स्वत: जनी होऊन विठ्ठलाला आपला मायबाप, बंधू, सखा, मित्र, जिवलग अशा कित्येक रूपात ती पाहत असते.

आपल्या संसारिक दु:खातून ती एवढी पिडलेली असते, हताश झालेली असते, की हा जन्मच तिला नकोसा झालेला असतो. या सर्वांमध्ये विठ्ठलाचे दर्शन म्हणजे तिच्या दुखऱ्या मनावरची फुंकर असते. पण ते दर्शनही आपल्या नशिबी नाही याचे तिला अमाप दुःख होते. आपले हे दु:ख ती विठुरायाच्या समोर मांडताना म्हणते,

दगदगो माजो जीव
नदीत घेई उडी
बंधू गे पलतडी
बहिणीला हात जोडी
आलताडी माजो गाव
बंधू पयलाडी तुजी बाग
मधी भरली चंद्रभागा
कशी येऊ पांडुरंगा

स्वत:चा जीव नाहीसा करण्याच्या विचारात असतानाच तिला अदृश्य रुपी बंधू विठ्ठल आपल्याला हात जोडून हे दुष्कर्म न करण्याची विनंती करत आहे असाच भास होतो. म्हणून घरणीबाई विठूला बहिणीच्या आगतिकतेने म्हणते की संसारिक दु:खाला त्रासून मी कायमस्वरूपी तुझ्याकडे येत असताना तू मला अडवतोस. प्रत्यक्षपणे ही मी तुझ्या दर्शनासाठी येऊ शकत नाही. तुझ्या आणि माझ्यामध्ये भरल्या चंद्रभागेप्रमाणे अशा असंख्य अडचणी आहेत. या अडचणी पार करून मी तुझ्या दर्शनासाठी कशी येऊ?

प्रत्यक्षात जाता येत नसले, तरी आपल्या बंधवाकडे अंतर्मनाने नक्कीच जाता येईल याची आठवण तिला होते. त्यामुळेच ती जात्यावर दळता दळता, ओव्या गाता गाता मनाने पंढरपूरला जाते.

पंढरी जाता मिया
वाटे लागती करमळ
विठ्ठल नी देवाची
भेट घेता मी निर्मळ

करमळ म्हणजे गोव्यातील घनदाट जंगलात आढळणारा एक मोठा वृक्ष. ज्याची पाने पूर्वीच्या काळी पत्रावळी म्हणूनही वापरत असत. ही करमळाची झाडे गोवा-कर्नाटक सीमेवरच्या जंगलामध्ये अधिक प्रमाणात आढळून येतात. आषाढी द्वादशी दिवशी ‘पाण्याचे नवे’ केले जायचे. उन्हाळ्यामध्ये साचलेले पाणी आषाढी एकादशीपर्यंत वाहते होऊन स्वच्छ झालेले असते. त्यामुळे आता नदी, विहिरीत भरलेले पाणी हे नवीन पाणी अशी मान्यता ठेवून या पाण्याने पंचपक्वानाचा स्वयंपाक केला जायचा आणि करमळाच्या पानांमध्ये तो पंचपक्वानाचा नैवेद्य नदीला अर्पण केला जायचा. पावसाळ्यामध्ये गरगरून वाढलेली ही करमाळाची झाडे तृप्त आणि निर्मळ झालेली असायची. म्हणून घरणीबाई म्हणते की पंढरीच्या वाटेवर अशी निर्मळ आणि तृप्त करमळाची झाडे ज्याप्रमाणे नव्यासाठी तयार झाली आहेत त्याचप्रमाणे माझ्या विठू देवाची भेट घेण्यासाठी ही मी आसुसले आहे आणि म्हणून ती चित्तरुपाने ह्या पंढरपुराच्या वाटेवर चालू लागली आहे असे वाटताना पुढे ती म्हणते,

पंढरी जाता मिया
वाटे लागती खडे खडे
दयाळू पांडुरंगान
पुढे धाडीले हत्ती घोडे

अशी तिच्या पंढरपूरच्या वाटेवरचे खडे तिचा दयाळू पांडुरंग दूर करतो आणि ती आरामात पंढरपुरी पोहचते. पण आपण अशी दीन-गरीब. देवासाठी वस्त्र, नैवेद्य, सुवासिक फुले यापैकी आणू शकले नाही. रिकाम्या हाताने आत देवळात कशी जाऊ? देवळाला काय वाहू? अशा विवंचनेत ती पडते आणि म्हणून पांडुरंगाच्या देवळाच्या पागोळीला जाऊन उभी राहते.

पंढरी जाता मिया
उभी राही पागोळीला
देव माजो मायेचो
मला बलई आवारात

आपल्या भक्ताची ही विवंचना विठुरायाला समजते आणि तो आपल्या या रिकाम्या हाताने आलेल्या मनात ओतप्रोत प्रीत घेऊन आलेल्या भक्ताला आपल्या आवारात म्हणजेच गाभाऱ्यात बोलावतो.

आपल्या विठ्ठलाला मन भरून पाहून झाल्यावर तिची नजर त्याच्या बाजूला असलेल्या रुक्मिणीवर जाते. रुक्मिणीच्या भाग्याचा तिला हेवा वाटतो आणि ती म्हणू लागते,

पंढरी जाता मिया
उभी राही मी तपावरी
नजर गेली माजी 
रुक्मिण बाईच्या गोपावरी
पंढरी जाता मिया
उभी राही मी चिऱ्यावरी
रुक्मिण बाईच्या तुऱ्यावरी

अशाप्रकारे मन तृप्त होऊन विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेतल्यावर तिला आता या उभयतांना पाहताना  विनोद सुचतो.

विठ्ठल काळोकिट
अशी रुक्मिणी गोरी पीठ
रुक्मिणी गाई गीत
असं विठ्ठल पिरतीचा

असे म्हणत विठ्ठल आणि रुक्मिणीच्या प्रेमाची अनुभूतीही ती घेते.

आणि अशाच एका विठ्ठल रुक्मिणीच्या प्रेमाचे सुंदर प्रसंगाचे वर्णन ती आपल्या ओवीत करताना म्हणते,

पवुळे गे तळीयेर
असे रुक्मिण धुणे धुई
भरली चंद्रभागा
गुणे बुडले न्हान थोर
नवलक्षाचो नि गे शालू
रुक्मिण धुईता पायावर
तुटलो गळीहार
मोतिया झाली ती न्हयीभर
दयाळू पांडुरंग
मोतिया वेचिता शेल्यावर
मोतिया वेचीत आला घाम

तिचा विठ्ठल तिच्यासाठी गाभाऱ्यातील फक्त मूर्तीच नव्हे, तर तिच्यासारखा संसार करणारा एक सामान्य माणूस वाटतो जो आपल्या पत्नीवर, आपल्या भक्तावर जीवापाड प्रेम करतो. आपल्या संसारात जे सुख तिला आपल्या नवऱ्याकडून अपेक्षित असते ते ते सुखमय प्रसंग ती रुक्मिणी आणि विठ्ठलाच्या संसारात बघताना दिसते. रुक्मिणी धुणे धुताना चुकून तिच्या गळ्यातील हार तुटतो. या चुकीमुळे तिला दोष न देता आपल्या पत्नीचे त्रास समजून घेत पांडुरंग सर्वदूर पसरलेले मोती वेचण्यासाठी धावत येतो. आपल्या हातून तुटलेल्या हाराचे मोती वेचताना आपल्या विठ्ठलाला घाम आला म्हणून रुखरुख लागून घेणारी, आपल्या शालू ने विठ्ठलाच्या कपाळावरचा घाम पुसणारी रुक्मिणी जेव्हा ती चित्तरते, तेव्हा आपल्या नवऱ्यानेही आपले त्रास असेच जाणून घ्यावेत, आपणही त्याच्या प्रत्येक अडचणीत, त्रासात त्याला मदत करावी अशीच मनीषा ती बाळगत असते. आपल्या संसारातही विठ्ठल रुक्मिणीच्या संसारासारखे सुख लाभावे अशी प्रार्थना ती जणू विठ्ठलाकडे करत असावी.

शेवटी ती म्हणते
पंढरी जाता मिया
असा दगदगे माझा जीव
मी हिंडता रानवन
आई बापाच्या पुण्याईने
थय भेटला भगवान
त्याने सांगितला सर्व ज्ञान

संसारातील कठीण प्रसंगामुळे जीव काढणीला लागतो. ज्याप्रमाणे वाट चुकलेला माणूस रानावनात भटकत राहतो त्याचप्रमाणे संसाररूपी रानात हरवून गेलेल्या घरणीबाईचा जीव तळमळू लागतो. ती भरकटत जाते. अशावेळी ती देवाच्या पायाचा आसरा शोधते. तो आसरा तिला पंढरीला सापडतो. आई बापाने केलेल्या पुण्याईमुळेच आपण ह्या भवसागरातून वाचलो आणि विठ्ठलाच्या पायाजवळ आलो असे तिला वाटते. या पुण्याईनेच आपल्याला देव भेटला. त्याने ह्या संसाररुपी भवसागरातून कसे तारायचे हे ज्ञान आपल्याला दिले. म्हणूनच वरून काटेरी दिसणाऱ्या संसाराचे गोड गरे आपण चाखू शकलो. सुख-दुःखातून कसे सावरायचे हे आपण जाणू शकलो. असे तिला वाटते. म्हणून ती आई-बापाविषयी कृतज्ञता व्यक्त करते आणि म्हणते,

भरली चंद्रभागा गे
पाणी लागला पायरीशी
पंढरी जाता मिया
पाणी घाली मी कळशेन
आई नी बाप्पा विना
नाही विठ्ठलाची भेट

जात्यावरच्या ओव्या ही फक्त मनोरंजनात्मक गाणी नव्हती. आपल्या संसाराचा खेळ खेळताना ही ओवी कधी तिची मैत्रीण व्हायची, कधी तिच्या दुर्बळ मनाला सबळ करायची. तिच्या दुखऱ्या मनाला फुंकर घालणारी तिची सखी व्हायची. कधी ह्या ओवीरूपानेच ती आपल्या संसाराचे सुंदर चित्र रेखाटायची. आणि म्हणूनच जात्याच्या घरघर आवडता बरोबरच तिच्या गोड आवाजातून ह्या ओव्या तिच्या घरभर आणि मनभर नाचायच्या.

अशा या सुंदर कल्पना आणि या कल्पनांनी बहरलेल्या ओव्या म्हणजे अभिव्यक्तीचे उत्कृष्ट दर्जाचे साहित्य होय. या ओव्यामधील रूपके, उपमा यामधील कल्पना म्हणजे अतिशयोक्ती नसून एका अक्षर ओळख नसलेल्या घरणीबाईने रचलेले उत्कृष्ट दर्जाचे काव्य असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. ओढून ताणून रचलेल्या साहित्यापेक्षा हे उत्कट साहित्य नक्कीच उच्च दर्जाचे आहे कारण याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दिखावा नाही, भव्य दिव्यपणा नाही. आहेत निव्वळ भावना. व्यक्त आणि अव्यक्त!


गौतमी चोर्लेकर गावस