तुळशी लग्नाचा हा गोव्यात केवळ धार्मिक विधी ठरलेला नसून, ती इथल्या लोकमानसाची सांस्कृतिक परंपरा आहे. आणि त्यासाठी प्रत्येक कुटूंब आपल्या घरासमोर पूर्वापार उभ्या असलेल्या वृंदावनाला प्रतिकात्मक विवाह सोहळ्यातून मानवंदना देते.
सिंधू संस्कृतीपासून भारतीय उपखंडात वृक्षपूजनाची परंपरा रूढ असून उत्खननात ठिकठिकाणी वड, पिंपळासारखी चित्रे कोरलेले जे शिक्के आढळलेले आहेत, त्यावरून त्याची प्रचिती येते. तुळस ही औषधी गुणधर्म असलेली वनस्पती अज्ञात काळापासून भारतीय लोकमानसाने प्रिय मानलेली आहे. पुराणकालीन लोककथांत कुठे तुळस ही शंखचुड दैत्याची तर कुठे वृंदा ही जालंधर पत्नी म्हणून मानण्यात आलेले आहे. काही धार्मिक ग्रंथात ती कृष्ण सखी मानलेली असून, वनस्पती रूपात तिचा जन्म झाल्यानंतर ‘गळी तुळशी हार’ श्रीकृष्णासाठी आवश्यक बनले. देव-दानव यांच्यात जेव्हा सागराचे मंथन झाले तेव्हा त्यातून जो अमृतकुंभ अवतरला, त्याचे प्राशन करतेवेळी अमृताचे काही थेंब जेथे पडले तेथे तुळशीचे रोप निर्माण झाले आणि तेव्हापासून म्हणे भारतीय लोकमानसात तुळस वंदनीय ठरली. गोवा-कोकणातल्या मंदिरांसमोर जशी दीपमाळ बांधणे आवश्यक बाब ठरलेली आहे, तसेच तुळशी वृंदावन ही महत्त्वाची बाब ठरलेली आहे. इथत्या घरांसमोर तुळशीचे वृंदावन बंधनकारक असून, तिन्हीसांजेच्या वेळी तिच्यासमोर दिव्याचा प्रकाश निर्माण करून सुवासिनी तिच्यासमोर नतमस्तक होतात.
‘पहिली माझी ओवी ग दारातल्या तुळशीला...’ असे आपल्या सुरेल आवाजात कष्टकरी स्त्रिया गाऊ लागायच्या आणि दिवसभराचा त्यांचा क्षीण तुळशी सखीसमोर कुठच्या कुठे गायब व्हायचा. तुळस ही वनस्पती औषधी तसेच धार्मिक आणि सांस्कृतिक संचित असले तरी कष्टकरी स्त्रियांसाठी ती जीवाभावाची सखी म्हणून येते आणि त्यांच्या सांसारिक वेदनांना मोकळे होण्याचा मार्ग देते. त्यासाठी तुळशी वृंदावनासमोर त्या ओवीतून गातात-
‘दारातल्या तुळशी गे
पानान पान फुलशी गे
गळ्यातल्या मण्यासाठी
किती लोक वनवासी’
गोवा-कोकणातल्या स्त्रियांसाठी दारातली तुळस आणि तिचे वृंदावन हे देवतास्वरूप असून, घरातले कौटुंबिक स्तरावरचे एखादे धार्मिक कार्य असो अथवा सामूहिक स्वरूपातला ‘धालो, धिल्लो, कातयो’सारखा उत्सव असो, स्त्रियांना तुळस वात्सल्यसिंधू मातेच्या रुपात दरदिवशी भेटते. धर्मग्रंथात तुळशीदर्शन करणे आवश्यक मानलेले आहे आणि त्यासाठी तुळशीदर्शनाच्या मंत्राची निर्मिती करण्यात आलेली आहे.
तुलसि श्रीसखि शुभं
पापहारिणि पुण्यदे।
नमस्ते नारदनुते नारायणमनः प्रिये।।
हे तुळशी, तू लक्ष्मीची मैत्रीण, शुभदा, पापहारिणी आणि पुण्यदा आहेस. नारद तुझी स्तुती करतो. तू नारायणाच्या मनाला अत्यंत आवडतेस. तुला नमस्कार असो, असे म्हटले जाते. धार्मिक ग्रंथांत जसा तुळशीचा उल्लेख आढळतो, तसाच लोकधर्मातही तुळस वंदनीय ठरलेली आहे. तुळशीच्या वृंदावनात प्रत्यक्ष काशीच्या तीर्थयात्रेला गेल्याचे पुण्यकर्म पदरी लाभते आणि म्हणून स्त्रियांनी ओव्यात गाताना म्हटलेले आहे-
काशी काशी म्हणून।
लोक जाती ग धावत।
काशी माझ्या अंगणात। तुळसा देवी।
तुळशीच्या वृंदावनाच्या रूपात दिवाळी-दसरा या काळात एकेकाळी संपन्न होणाऱ्या गीती गायनाच्या लोकपरंपरेत डोंगरमाथ्यावरच्या सुर्ल-सत्तरीच्या कष्टकरी स्त्रियांना रामायणातील सीता भेटते तर कुळागरात वसलेल्या डिचोलीतील सुर्लच्या स्त्रियांना ध्यानीमनी कृष्णमयी झालेली राधा पहायला मिळते. कधीकाळी तुळशीची वनस्पती जंगलात होती, तिला श्रीकृष्णदेवाने अंगणात आणल्याची लोकश्रद्धा प्रचलित आहे.
तुळस म्हणे माता असे जंगलात
श्रीकृष्ण देवाने आणली अंगणात
सेवा सारी राधिका बाई
सकाळी उठोन गुंतियली कामा...
जंगलातून घराच्या अंगणात, वृंदावनात विराजमान झालेली तुळस सुवासिनींसाठी नित्यप्रिय असून आणि त्यामुळे कृष्णाची राधा ही तिच्या चरणी नमस्कार करते. अशी कृष्णमयी राधा जेव्हा स्नानासाठी गंगेवर जाते, तेव्हा तिच्यामुळे गंगामातेला आपण धन्य झाल्याचे वाटते. रानी नी गे वनी एक तुळस माता
एक नार सवायसीण कृष्णाची राधा
गेली गेली गे राधा गंगेच्या पाण्याला
गंगा माता धन्य होई, राधा येई स्नानी
केवळ सुवासिनींसाठी नव्हे तर समस्त आबालवृद्ध स्त्रियांना तुळस आदरणीय ठरलेली आहे आणि त्यामुळे आदिवासी वेळिप, गावडा स्त्रियांच्या धिल्लो, कातयोच्या लोकगीतांचे गायन आणि नृत्याचे सादरीकरण तुळशी वृंदावनाच्या सान्निध्यात करण्याची लोकपरंपरा रूढ झालेली पहायला मिळते. स्त्रियांनी तुळस आणि तिच्या वृंदावनाला सखी, लोकदेवता यांचे स्थान दिलेले असून, पुरुषांनी शिमगोसारख्या मर्दानी लोकनृत्यांचा आविष्कार घडवण्यासाठी जो पवित्र मांड निर्माण केला, तेथेही तुळशी वृंदावनाचे अधिष्ठान असणे महत्त्वाचे मानलेले आहे. तुळशीला प्रदक्षिणा घालणे किंवा तिला गंधपुष्पांजली अर्पण करून पूजा करणे धार्मिक संकेत मानला. आश्विन-कार्तिकी एकादशीच्या महापर्वणीला पंढरपुरी जाणाऱ्या वारकरी स्त्रिया तुळशी वृंदावन मस्तकी धारण करतात तर पुरुष गळ्यात तिच्या पानांची माळ घालून सहभागी होतात. कार्तिकातल्या प्रबोधनी एकादशीनंतर पाच दिवस तुळशी विवाहाचा विधी साजरा केला जातो. कोरीवकामाने समृद्ध असलेल्या दिण्याच्या काठीचा तुळशीच्या रोपासह वृंदावनाशी लावलेला प्रतिकात्मक सोहळा आमच्या सांस्कृतिक वैविध्यपूर्ण मूल्यांचे दर्शन घडवत असतो.
तुळशी लग्नाचा हा गोव्यात केवळ धार्मिक विधी ठरलेला नसून, ती इथल्या लोकमानसाची सांस्कृतिक परंपरा आहे. आणि त्यासाठी प्रत्येक कुटूंब आपल्या घरासमोर पूर्वापार उभ्या असलेल्या वृंदावनाला प्रतिकात्मक विवाह सोहळ्यातून मानवंदना देते. तुळशीचे हिरवेगार रोप पूर्वी मातीच्या वृंदावनात दिमाखात वाऱ्यावर डोलायचे. आज सिमेंटचा विनियोग करून वृंदावन आकर्षक बांधून, त्याची रासायनिक रंगांनी लक्षवेधक रंगोटी करण्याला अधिकाधिक प्राधान्य दिले जाते आणि त्यामुळे संजीवक असे तुळशीचे रोपटे वृंदावनात तग धरू शकले नाही. तरी त्याची कोणाला ना खंत, ना व्यथा असते. आवळा, चिंच यांच्या फांद्या, केळीच्या सफेद गब्याचा वापर कुशलतेने करून बांधण्यात येणारी बाशिंगे या साऱ्या घटकातून गोव्यातल्या लोकमनाचे या वृंदावनाशी असलेल्या स्नेहबंधांचे दर्शन घडते. संजीवक अशी दारी डोलणारी तुळस त्यांच्यासाठी आल्हाददायक अशीच होती आणि त्यासाठी त्यांनी तिच्यात दिव्यत्व आणि देवत्व पाहिले. बदलत्या काळातही हे वृंदावन चैतन्यदायी अशा तुळशीच्या रोपाद्वारे अखंड आश्वासक रहावे यासाठी प्रयत्न गरजचे आहेत.
- प्रा. राजेंद्र केरकर
(लेखक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते
असून पर्यावरणप्रेमी आहेत.) मो. ९४२१२४८५४५