...अन्यथा राष्ट्राचा ऱ्हास ठरलेला !

Story: विश्वरंग |
12th November, 09:37 pm
...अन्यथा राष्ट्राचा ऱ्हास ठरलेला !

आर्थिकदृष्ट्या कंगाल बनलेल्या पाकिस्तानने आजवर ज्या दहशतवादाला खतपाणी घातले, तोच दहशतवाद आता त्यांच्यावर उलटला आहे. महागाई आणि आर्थिक दिवाळखोरीचा सामना सध्या पाकिस्तानी जनतेला करावा लागत आहे. 'पेराल ते उगवते' या म्हणीनुसार आजवर पाकिस्तानने दहशतवादाचीच पेरणी केली आणि त्यातूनच विषवल्ली फोफावली, बळावली आणि आता तीच खुद्द पाकिस्तानसाठीच भीषण समस्या होऊन बसली आहे. पाकिस्तानमध्ये लष्कर आणि दहशतवादी यांच्यामध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे.

दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतातील क्वेटा रेल्वे स्थानकावर सकाळी बॉम्बस्फोट होऊन २० जणांचा मृत्यू झाला तर ५० हून अधिक जखमी झाले. पाकिस्तानी सैनिक हे हल्ल्याचे लक्ष्य असल्याची प्राथमिक माहिती आहे. शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास हा स्फोट झाला. स्वतंत्र बलुचिस्तानासाठी आक्रमक आंदोलन करणाऱ्या बलुच लिबरेशन आर्मीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. क्वेटा रेल्वे स्थानकावर असलेल्या पाकिस्तानी सैन्यावर हल्ला करण्याचा हा प्रयत्न होता.

'सुसाईड बॉम्ब' हल्ल्याच्या माध्यमातून हा स्फोट घडवल्याची पोलीसांची माहिती आहे. बलूचिस्तान प्रांतामध्ये अशा प्रकारच्या आत्मघातकी हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. हा प्रांत स्वतंत्र होऊन, या प्रांतातील साधनसंपत्तीवर नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टीकोनातून हे हल्ले केले जात आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या हल्ल्याचा निषेध व्यक्त करत ''ज्यांनी हे कृत्य केलेय त्यांना या कृत्याची मोठी किंमत मोजावी लागेल." असा इशाराही दिला आहे. दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी सरकार आणि सुरक्षा दल पूर्णपणे सक्रिय असल्याचेही शरीफ यांनी म्हटले आहे

तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनेने पख्तून भागावर दावा करत आपले सरकार स्थापन केले असून बलुचिस्तानातील बलूच लिबरेशन आर्मीलाही समर्थन देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ही आर्मी प्रबळ बनली असून पुन्हा एकदा स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी जोर धरू लागली आहे. परिणामी येणार्‍या काळात एकीकडे बलुचिस्तान आणि दुसरीकडे पख्तुनिस्तान पाकिस्तानपासून वेगळे होऊ शकतात, अशी परिस्थिती उद्भवली आहे.

या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तानला पुन्हा एकदा 'टीटीपी'बरोबर शस्त्रसंधी करावी लागेल. टीपीपीचा सामना करण्यासाठी आणि दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी पाकिस्तानी शासनाला लष्करावर अधिक खर्च करावा लागेल. दगड फेकणाऱ्याला होणारे नुकसान राष्ट्राचे आहे ही जाणीव जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत तो सार्वजानिक मालमत्तेचा आणि पर्यायाने राष्ट्राचा ऱ्हास हा ठरलेलाच आहे.

गणेशप्रसाद गोगटे