भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका दुसरा टी-२० सामना आज

मालिकेत आघाडी घेण्यासाठी टीम इंडिया प्रयत्नशील : संघात बदल शक्य

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
09th November, 11:48 pm
भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका दुसरा टी-२० सामना आज

गकेबेहारा :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी २० मालिकेतील दुसरा सामना रविवारी खेळवला जाणार आहे. हा सामना सेंट जॉर्ज पार्क स्टेडियम, गकेबेहारा येथे होणार आहे. हा सामना जिंंकून मालिकेत आघाडी घेण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असणार आहे. तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिका मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करणार आहे.
 टीम इंडियाने मालिकेतील पहिल्या सामन्यात शानदार विजयाने मालिकेची सुरुवात केली. आता दुसऱ्या सामन्याची तयारी सुरू आहे. परंतु सेंट जाॅर्ज स्टेडियमवर भारताचा रेकाॅर्ड काही खास नाही. पहिल्या सामन्यात भारताने शानदार ६१ धावांनी विजय मिळवला. यामध्ये संजू सॅमसनने धमाकेदार खेळीने क्रीडाप्रेमींचे मन जिंकले. भारतीय संघाने दिलेले २०२ धावांचे लक्ष्य दक्षिण अफ्रिकेला पार करताना नाकीनऊ आले. द. अफ्रिकेची फलंदाजी पुरती ढासळली कर्णधार मार्करामपासून अगदी शेवटपर्यंत एकही फलंदाज क्रिझवर टिकू शकला नाही. लागोपाठ विकेट जात राहिल्या. आणि सामना टीम इंडियाने सहज खिशात टाकला यामध्ये भारतीय स्पीनर्सचे योगदानदेखील मोलाचे होते. वरुण चक्रवर्ती आणि रवी बिश्नोईने प्रत्येकी ३ गडी बाद केले.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या सामन्याच्या दिवशी हवामान थंड राहू शकते. हवामान खात्याच्या अंदाजानुसार तापमान १६ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. पावसाची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे सामन्यादरम्यान कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण होण्याची शक्यता नगण्य आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा सामना रविवारी सेंट जॉर्ज पार्क स्टेडियमवर होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होईल. तर पहिला सामना रात्री ८.३० पासून खेळवण्यात आला. पहिला सामना डर्बन येथे झाला. या कारणास्तव त्याची वेळ वेगळी असणार आहे.भारताने पहिल्याच सामन्यात ६१ धावांनी विजय मिळवला आहे. दुसरा टी २० सामना १० नोव्हेंबरला होणार असून सेंट जॉर्ज ओव्हल मैदानावर होणार आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात टीम इंडियात काही बदल अपेक्षित आहेत. सलामीवीर अभिषेक शर्मा वारंवार फेल गेला आहे. त्यामुळे त्याच्या जागी दुसऱ्या खेळाडूला संधी मिळू शकते. ही जागा भरून काढण्यासाठी भारताकडे रमणदीप सिंग आणि जितेश शर्मा हे दोन पर्याय आहे. त्यामुळे या दोघांपैकी एकाला संधी मिळू शकते. संजू सॅमसन सध्या फॉर्मात आहे. सलग दोन शतकानंतर त्याच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. दुसरे त्याच्यासोबत सलामीला कोण येते, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
या व्यतिरिक्त संघात इतर काही बदल होणे कठीण आहे. कारण पहिल्या सामन्यात गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती. वरुण चक्रवर्ती आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले होते. तसेच अर्शदीप सिंग आणि आवेश खानने चांगली गोलंदाजी केली होती. त्यामुळे गोलंदाजीत काही बदल होईल असे वाटत नाही.
सेंट जॉर्ज पार्कची खेळपट्टी गोलंदाज आणि फलंदाजांनाही मदत करणारी आहे. सुरुवातीला फलंदाजांना अनुकूल असते. पण नंतर गोलंदाजांना मदत करते. खास करून फिरकी गोलंदाजांना या खेळपट्टीवर चांगले यश मिळते, असे यापूर्वी पाहायला मिळालं आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ येथे प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतात.
टीम इंडिया : सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन, तिलक वर्मा, जितेश शर्मा/रमनदीप सिंग, रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, आवेश खान आणि अर्शदीप सिंग.
आजचा सामना
भारत वि. दक्षिण आफ्रिका

वेळ : सायं. ७.३० वा.
स्थळ : सेंट जॉर्ज पार्क स्टेडियम, गकेबेहारा
प्रक्षेपण : स्पोर्ट्स १८ नेटवर्क, जीओ सिनेमा